Home »Bollywood »Marathi Cinekatta» Aamir Khan Birthday Celebration In Chala Hawa Yeu Dya

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर साजरा झाला आमिरचा बर्थडे, बघा PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Mar 16, 2017, 00:28 AM IST

“महाराष्ट्रातील जनता कोणत्याही संकटाचा सामना खंबिरपणे करते. येथील प्रत्येक गावात आणि गावकऱ्यांत कठीण परिस्थितीशी लढण्याची ताकद आहे आणि यामुळेच दुष्काळाच्या संकटावरसुद्धा हे गावकरी एकत्र येऊन मात करतील” असा विश्वास हिंदी चित्रपटसृष्टीत मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या सुपरस्टार आमिर खानने व्यक्त केला. निमित्त होतं झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचं. महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती बघता भविष्यात उद्भवणा-या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमिर खान आपल्या ‘पानी फाउंडेशन’ या संस्थेद्वारे छोट्या छोट्या गावांमध्ये काम करतो आहे. गेल्यावर्षी तीन तालुक्यांमधील गावांमध्ये त्याने ‘वॉटर कप स्पर्धेचं’ आयोजन केलं होतं. या स्पर्धेला गावांगावांमधून मिळालेला उत्तम प्रतिसाद बघता यावर्षी ‘पानी फाउंडेशन’ 30 तालुक्यांमधील हजारो गावांमध्ये जाऊन तेथील गावक-यांना प्रशिक्षण देणार आहे. याच प्रकल्पाविषयीची माहिती देण्यासाठी आमिर खान आपली पत्नी किरण रावसह या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्याच्यासोबत ‘पानी फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकळ आणि ज्येष्ठ पाणीतज्ञ तथा प्रकल्प संचालक डॉ. अविनाश पोळ हे देखील उपस्थित होते. येत्या 27 आणि 28 मार्चला गुढीपाडव्याच्या निमित्ताने हे दोन्ही भाग झी मराठीवरुन रात्री 9.30 वा. प्रसारित होणार आहेत.
साजरा झाला आमिरचा वाढदिवस...
आमिर खानच्या वाढदिवशी म्हणजे 15 मार्च रोजी या खास भागाचे चित्रीकरण मुंबईत पार पडले. आमिरने मंगळवारी वयाची 52 वर्षे पूर्ण केली. यावेळी चला हवा येऊ द्याच्या टीमने आमिर खानचा वाढदिवस साजरा केला. आमिरसाठी खास केक यावेळी मागवण्यात आला होता.
आमिरने दिली प्रकल्पाविषयीची माहिती...
एक संवेदनशील अभिनेता आणि एक जागरुक नागरिक ही आमिर खानची ओळख सर्वश्रुत आहेच परंतु याही पुढे जाऊन केवळ चर्चा न करता थेट कार्य करण्यात आमिर विश्वास ठेवतो. यामुळेच महाराष्ट्रातील दुष्काळावर चर्चा किंवा काही भाष्य करुन तेवढ्यावरच न थांबता आमिर खानने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. येथील पाण्याच्या समस्येवर सखोल संशोधन करुन ती दूर करण्यासाठी एक प्रभावी, सहज अंमलात आणता येईल अशी योजना आखली आणि त्याची माहिती देण्यासाठी काही तालुक्यांची निवड केली. त्या गावांमध्ये जाऊन आमिरने आणि त्याच्या सहका-यांनी गावक-यांना याबद्दलची माहिती दिली आणि हा प्रकल्प जोमाने सुरु झाला. या सगळ्या प्रकल्पाची ही माहिती आमिर अतिशय उत्साहाने ‘चला हवा येऊ द्या’मध्ये सांगत होता आणि सर्व जण भारावून जाऊन ती ऐकतही होते.
“पाणी वाचवण्याची, ते साठवण्याची तथा जमिनीत मुरवण्याची सोपी पद्धत आम्ही लोकांना शिकवतो. या कार्यामध्ये मागील वर्षी सहभागी झालेले अनेक प्रशिक्षणार्थी गावकरी यावर्षी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत हे विशेष” अशी माहिती डॉ. पोळ आणि सत्यजीत भटकळ यांनी यावेळी दिली. या स्पर्धेत सहभागी झालेली महाराष्ट्रातील विविध गावांतील गावकरी मंडळीही या कार्यक्रमात उपस्थित होती ज्यांनी आपली यशोगाथाही यावेळी सांगितली.
दुष्काळाशी दोन हात
पाणी टंचाईवर मात करण्यासाठीच्या उपाय योजना सांगणारा आणि ‘पानी फाउंडेशनच्या’ कार्याची आणि प्रशिक्षणाची माहिती देणारा दुष्काळाशी दोन हात हा कार्यक्रम घेऊन आमिर आणि त्याची टीम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमातून पाणी वाचवण्याची माहिती आणि वॉटर कप स्पर्धेच्या घडामोडीही प्रेक्षकांना बघता येतील.
आमिरने उभारली मराठमोळी गुढी
मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. यावर्षी चला हवा येऊ द्या मध्ये गुढीपाडवा आणि आमिर खानचा सहभाग हा योग जुळून आला आणि या मंचावर आमिरने सपत्निक गुढी उभारत सर्वांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर झालेले आमिरचे बर्थडे सेलिब्रेशन आणि कार्यक्रमाची एक छोटीशी झलक छायाचित्रांमधून...

Next Article

Recommended