Home »Bollywood »Marathi Cinekatta» Actor Sangram Samel Interview On Gudipadawa

सेलिब्रिटींचा गुढीपाडवा : संग्राम समेळ साजरा करणार लग्नानंतरचा पहिला पाडवा

समीर परांजपे | Mar 25, 2017, 12:31 PM IST

संग्राम समेळ हा नायक असलेला 'ब्रेव्हहार्ट' हा मराठी चित्रपट येत्या 7 एप्रिल रोजी झळकतो आहे. हा चित्रपट आहे वास्तवातील एका घटनेवर आधारित. सच्चिदानंद गोपीनाथ कारखानीस या गृहस्थांचा अतिशय गुणी मुलगा निखिल. निखिलला असाध्य आजार झाला. त्याची जी सेवाशुश्रुषा सच्चिदानंद यांनी केली त्यातून वडील व मुलाच्या नात्यामध्ये किती गहिरे स्नेहबंध असतात याचेही दर्शन झाले. याच सत्यघटनेवर आधारित 'ब्रेव्हहार्ट' या दासबाबू दिग्दर्शित चित्रपटात निखिलची भूमिका करणारा संग्राम समेळ याचा यंदाचा गुढीपाडवा खास आहे. त्याचे गेल्या डिसेंबर महिन्यात लग्न झाले आहे. लग्नानंतरचा त्याचा हा पहिलाच पाडवा.
आपली पत्नी व अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्या समवेत गुढीपाडवा साजरा करण्याचे त्याचे काय प्लॅन्स आहेत असे विचारले असता तो म्हणाला की, लग्नानंतरचा पहिला पाडवा असल्याने मीही एक्सायटेड आहे. आम्ही घरी साध्या पद्धतीने हा पाडवा साजरा करु. त्यातच माझी नायकाची भूमिका असलेला पहिलावहिला चित्रपट ब्रेव्हहार्ट पाडव्यानंतर काही दिवसांनी रिलिज होत आहे. त्यामुळेही या पाडव्याचा आनंद काही वेगळाच असणार आहे.
गुढीपाडव्याच्या त्याच्या आठवणींविषयी बोलताना तो म्हणाला, ''मी लहान असताना आम्ही दादरला राहायचो. त्यावेळी गुढीपाडव्याच्या दि‌‌‌वशी त्या घरी गुढी उभारायचे. त्या गुढीला जी बत्ताशांची माळ लावलेली असते त्यावर माझे लक्ष असायचे. त्या माळेतील बत्तासे हळुच एक एक करुन खात राहायचो. बिचारी ती माळ मग एक-दोन बत्ताशांपुरतीच उरायची. कोणताही सण असला की घरात आनंदी वातावरण असते. गुढीपाडव्याच्या दिवशीही तोच फिल असतो. म्हणून सण म्हटला की माझ्या अंगात उत्साह संचारतो. ब्रेव्हहार्ट चित्रपटातील निखिलची भूमिका साकारताना माणुसकी काय असते याचे खूप जवळून दर्शन मला झाले.''
मराठी रंगभूमीवर नट, निर्माता आणि नाटककार अशी अष्टपैलू ओळख असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे अशोक समेळ. संग्राम समेळ हा त्यांचा मुलगा. त्यामुळे त्याला अभिनयाचे बाळकडू पहिल्यापासूनच मिळालेले आहे. 'ब्रेव्हहार्ट' असलेला संग्राम आता पाडव्याच्या सेलिब्रेशनसाठी सज्ज झाला आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा, पत्नी पल्लवीसोबतची संग्रामची निवडक छायाचित्रे...

Next Article

Recommended