Home » Marathi Katta » Martathi Celebrities VALENTINES SPL

VALENTINES SPL : सेलिब्रिटींची प्रेमाची व्याख्या

दिव्य मराठी वेब टीम | Feb 14, 2013, 11:03 AM IST
 • VALENTINES SPL : सेलिब्रिटींची प्रेमाची व्याख्या

  मराठी चित्रपटसृष्टीत व्हॅलेंटाइन डे विषयी वेगवेगळी मते आहेत. विशेष म्हणजे प्रेम करण्यासाठी एका दिवासाची गरज नसल्याच्या बहुतांश कलावंतांचा सूर आहे. प्रेम हे चिरकाल टिकणारे असावे. शिवाय ते फक्त प्रियकर-प्रेयसीपुरते मर्यादित न ठेवता त्याच्या कक्षा विस्तीर्ण असाव्यात, असेही त्यांचे म्हणणे आहे.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या मराठी सेलिब्रिटींच्या मते प्रेमाची व्याख्या आहे तरी काय...

 • VALENTINES SPL : सेलिब्रिटींची प्रेमाची व्याख्या

  वर्षभर प्रेम करावे - आदेश बांदेकर, अभिनेता

  व्हॅलेंटाइन डे एकच दिवस का साजरा करायचा? माझ्या मते प्रत्येकाने आपल्या पत्नीवर वर्षभर प्रेम करायला पाहिजे, म्हणजेच व्हॅलेंटाइन डे वर्षभर साजरा करावा. माझे माझ्या पत्नीसह माझ्या घरच्यांवरही तेवढेच प्रेम आहे. मी एकीकडे शूटिंगमध्ये व्यस्त असतो आणि सुचित्रा दुसरीकडे चित्रीकरणात व्यस्त असते. त्यामुळे माझा व्हॅलेंटाइन डे हा माझ्यासाठी लग्नाचा वाढदिवस आहे.

 • VALENTINES SPL : सेलिब्रिटींची प्रेमाची व्याख्या

  मनसोक्त प्रेमाचा वर्षाव व्हावा - सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री

  आजच्या तरुणाईला कोणते ना कोणते ओकेजन शोधून एकत्र यायला आवडते. व्हॅलेंटाइन डेसुद्धा त्यापैकीच एक. या निमित्ताने तरुण वर्ग एकत्र येत असेल आणि आपले अव्यक्त प्रेम व्यक्त करत असेल तर त्यात गैर काय? असे मत प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने व्यक्त केले. सोनालीच्या मते, जगभरात अशांतता पसरली आहे. लहान सहान कारणांवरून भांडणे होतात. जीव जातात. अशा परिस्थितीत व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तरुण वर्ग एक होतो हे काय कमी आहे. विशेष म्हणजे हे लढाईचे नव्हे तर प्रेमाचे सेलिब्रेशन आहे. त्याला प्रत्येकानेच पॉझिटिव्हली घ्यायला हवे. मात्र, हे सेलिब्रेशन करताना जबाबदारीचे भान ठेवण्याचा सल्लाही ती देते. बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडपुरताच हा उत्सव मर्यादित न ठेवता आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रिणी एवढेच काय तर बॉस आणि त्याचे कलीग्सही आपल्या एकमेकांबाबतच्या भावना या दिवशी शेअर करू शकतात, असे सोनाली सांगते. या दिवसाबाबत एवढे मोकळे विचार असतानाही सोनालीने स्वत: कधीच व्हॅलेंटाइन डे साजरा केलेला नाही. माझा अजून तरी कोणी व्हॅलेंटाइन नाही, असे ती सांगते.

 • VALENTINES SPL : सेलिब्रिटींची प्रेमाची व्याख्या

  अंधानुकरण नको - प्रशांत दामले, अभिनेता

  प्रसिद्ध नाट्य आणि सिनेकलावंत प्रशांत दामले यांच्यासाठी अभिनय खासकरून नाटक हेच प्रेम आहे आणि हेच प्रेम ते रोज व्यक्त करतात. त्यामुळे कोणत्याही विशिष्ट दिवसाची त्यांना गरज वाटत नाही. विशेष म्हणजे हे दिवस युरोपियन देशांची मजबुरी असल्याचेही ते स्पष्ट करतात. हे लोक सोमवार ते शुक्रवार खूप काम करतात. शनिवार हा त्यांचा व्हॅलेंटाईन डे समजा. रविवार त्यांचा कपडे धुण्यात जातो. त्यामुळे माणसांना भेटणेही त्यांना शक्य नाही. त्यामुळे मदर्स डे, फादर्स डे आणि व्हॅलेंटाईन डे येतात. हा त्यांच्या व्यवस्थेचा आपण मेंढरे बणून अंगीकार करत आहोत, असेही दामले परखडपणे सांगतात.

 • VALENTINES SPL : सेलिब्रिटींची प्रेमाची व्याख्या

  मुहूर्त पाहून प्रेम होत नाही - संदीप खरे, गीतकार

  प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या विशिष्ठ दिवसाची गरज आहे असे आपल्याला वाटत नसल्याची भावना प्रसिद्ध कवी संदीप खरे यांनी व्यक्त करत नाही. प्रेम करणारी व्यक्ती मुहूर्त पाहून प्रेम करत नाही. मनापासून प्रेम करणार्‍याला व्यक्तीला प्रत्येक क्षण याची अनुभव येत असते आणि तो प्रत्येक क्षण साजरा करत असतो. हा दिवस साजरा करत असताना याचा दुसर्‍याला त्रास होणार नाही याची प्रेमींनी काळजी घ्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले.

 • VALENTINES SPL : सेलिब्रिटींची प्रेमाची व्याख्या

  प्रेमा तुझा दिवस कसला? - मंगेश देसाई, अभिनेता

  प्रेम द्या, प्रेम करा, प्रेम वाटा, असा संदेश संत व्हॅलेंटाइन याने दिला होता. याचा अर्थ व्हॅलेंटाइन डेलाच प्रेम करा, असा होत नाही. खरंतर दररोजच प्रेमाचा दिवस असतो. 364 दिवस हाणामार्‍या, द्वेष करायचा आणि एक दिवस प्रेमाच्या गप्पा मारायच्या यात काहीच अर्थ नाही. त्याऐवजी दररोज प्रेम करायला हवे, असे मत चित्रपट व टीव्ही अभिनेता मंगेश देसाई याने व्यक्त केले.

  मंगेश याच्या मते, तरुण वर्गाने या दिवसाचा चुकीचा अर्थ काढला आहे. व्हॅलेंटाइन डेलाच प्रपोज करा, अफेअर करा, असे त्यांचे मत झाले आहे, पण ते चुकीचे आहे. एखादे कपल या दिवशी प्रपोज करूनही प्रेमाने राहत नाही. मग व्हॅलेंटाइन डेचे मुहूर्त पाहून घेतलेल्या प्रेमाच्या आणाभाका मातीत मिळतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी मुहूर्त हवाच कशाला, असा सवालही मंगेशने उपस्थित केला. मंगेश कॉलेजमध्ये असताना अशा डेजचे फॅड नव्हते. यामुळे तो यास फार महत्त्व देत नाही. अनेक जण मेसेज करतात, फोन करून व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा देतात, पण त्याच्यासाठी याचे फार महत्त्व नाही. असे असले तरी मंगेशचा व्हॅलेंटाइन डेकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे. तो म्हणतो, सध्या जगभरात माणूस माणसाचा शत्रू झाला आहे. अशा परिस्थितीत प्रेम वाटण्याची नितांत आवश्यकता आहे. मग व्हॅलेंटाइन डेमुळे याची सुरुवात होत असेल तर त्यात काहीच गैर नाही, असे तो सांगतो.

 • VALENTINES SPL : सेलिब्रिटींची प्रेमाची व्याख्या

  मुलीचा जन्म हेच व्हॅलेंटाइन गिफ्ट - प्रतीक्षा लोणकर, अभिनेत्री

  प्रतीक्षा लोणकर यांनी कधीच अशा प्रकारचे डे साजरे केलेले नाही. त्यावेळी शाळा-कॉलेजमध्ये अशा डेचे फॅड नव्हते. त्यामुळे लोणकर अशा डेला फार महत्त्व देत नाही. तरीही त्यांच्या दृष्टीने व्हॅलेंटाइन-डेला वेगळे महत्त्व आहे. त्याचे कारण म्हणजे या दिवशीच त्यांच्या मुलीचा रूंझीचा जन्म झाला. ती आता चार वर्षांची झाली आहे. तिचा जन्म हा नवरा-बायकोतील नाते घट्ट करणारा दुवा आहे. यामुळेच व्हॅलेंटाइन डेला त्यांच्या घरात वाढदिवसाचे जबरदस्त सेलिब्रेशन असते. रूंझीने सांगितल्याप्रमाणेच हे सेलिब्रेशन होते. यात जिगीषा ग्रुपचे सदस्य सहभागी होतात. प्रतीक्षा यांनी व्हॅलेंटाइन डे कधीच साजरा केला नसला तरी हा दिवस सेलिब्रेट न करण्याचेही त्यांना कारण दिसत नाही. जर एखाद्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एखादा दिवस, निमित्त हवेच असेल तर हा दिवस काही वाईट नाही, पण एखाद्याने ठरवलेच तर दररोज, वर्षभर प्रेमाचा दिवस साजरा करता येऊ शकतो. कारण प्रेमाला मर्यादा नसतात.

Email Print
0
Comment