Home » Marathi Katta » VALENTINES SPL : Priya Marathe's Love Story

VALENTINES SPL : प्रिया मराठेच्या 'प्रेमाची गोष्ट'

वैशाली करोले | Feb 14, 2013, 10:10AM IST

'तू तिथे मी' या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेलं मराठमोळं नाव म्हणजे प्रिया मराठे. प्रिया गेल्यावर्षी अभिनेता शंतनू मोघेबरोबर विवाहबंधनात अडकली. लग्नानंतरचा प्रिया आणि शंतनूचा हा पहिलाच व्हॅलेंटाइन डे आहे. याचेच औचित्य साधत आम्ही या दोघांचा मैत्रीपासून सुरु झालेला प्रवास लग्नाच्या स्टेशनपर्यंत कसा पोहोचला हे जाणून घेण्याच्या प्रयत्न केला आहे. प्रिया स्वतः आपल्या प्रेमाची गोष्ट चाहत्यांना सांगत आहे.


"हाय फ्रेंड्स... येत्या 24 एप्रिलला माझ्या आणि शंतनूच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होतंय. आमच्या दोघांची भेट ही कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली. मी मुळची ठाण्याची. मात्र शुटिंगच्या निमित्ताने अंधेरीला राहायचे. शर्वरी लोहकरे, मी आणि आमची आणखी एक मैत्रीण अशा आम्ही तिघी अंधेरीला रुम शेअर करायचो. शंतनू शर्वरीचा बेस्ट फ्रेंड आहे. शर्वरीनेच माझी ओळख शंतनूबरोबर करुन दिली होती. 'आई' मालिकेत हे दोघे एकत्र काम करत होते. ही मालिका संपत आली असताना 'आई' मालिकेच्या टीमने आमच्या फ्लॅटवर एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीच्या निमित्ताने पहिल्यांदाच शंतनू आणि मी खूप वेळ एकत्र घालवला. गप्पा मारण्यात रात्र कधी संपली हेसुद्धा आम्हाला कळले नव्हते. पुढे हळूहळू फोन आणि मेसेजेसच्या माध्यमातून आमच्या दोघांची फ्रेंडशिप वाढू लागली. एकेदिवशी शंतनूने मला लग्नाची मागणी घातली. मलाही तो आवडत असल्यामुळे त्याला नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता. मीही त्याला लग्नासाठी होकार दिला. पण आमच्या नात्याबद्दल आमच्या घरच्यांना काहीच ठाऊक नव्हते.

दोन वर्षांपूर्वी तुळजापूरला 'नव तारका' हा कार्यक्रम होता. शंतनू या कार्यक्रमाचा सुत्रसंचालक होता. माझा परफॉर्मन्स झाल्यानंतर शंतनूने मला, शर्वरी लोहकरे आणि प्रार्थना बेहरेला स्टेजवरच थांबायला सांगितले. या दोघींनाही आमच्याबद्दल ठाऊक असल्यामुळे शंतनूने प्रश्न विचारण्यापूर्वीच शर्वरीने त्यालाच आमच्या तिघींमध्ये तुला कोण जास्त आवडतं ? असा प्रश्न केला. शंतनूने बिनधास्तपणे माझे नाव घेतले. हा कार्यक्रम टेलिकास्ट झाल्यानंतर माझ्या घरच्यांना शंतनूला मी आवडते असं कळलं. सुदैवाने आमच्या दोघांच्याही घरातून आमच्या लग्नाचा मुळीच विरोध झाला नाही. अगदी आनंदात गेल्यावर्षी म्हणजे 24 एप्रिलला आमचे लग्न पार पडले. लव्ह मॅरेज करताना ब-याच जोडप्यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. सुदैवाने असे काहीही आमच्या वाट्याला आले नाही. .

यंदाचा हा व्हॅलेंटाइन डे आमच्या दोघांसाठीही खूप स्पेशल आहे. कारण आमचा हा लग्नानंतरचा पहिलाच व्हॅलेंटाइन डे आहे. हा व्हॅलेंटाइन शंतनूसाठी खूपच स्पेशल करायचे मी ठरवले आहे. शंतनूला नॉनव्हेज फार आवडतं. तर मी व्हेजिटेरियन आहे. पण मी खास त्याच्यासाठी नॉनव्हेज डिश बनवायचे शिकतेय. याबद्दल त्याला ठाऊक नाहीये. व्हॅलेंटाइन डेला शंतनूसाठी मी स्वतः त्याची आवडती नॉनव्हेज डिश बनवणार आहे आणि एक ब्रॅण्डेड वॉच त्याला गिफ्ट करणार आहे.

सो फ्रेंड्स ही आहे माझ्या प्रेमाची गोष्ट. हा व्हॅलेंटाइन मी खूप एन्जॉय करणार आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या व्हॅलेंटाइनसाठी हा दिवस स्पेशल करा. हॅपी व्हॅलेंटाइन डे."

Email Print
0
Comment