Home »Editorial »Columns» Kiran Moghe Article On Laxmi Sehagal

परिवर्तनावर विश्वास असलेली ‘लक्ष्मी’

किरण मोघे | Jul 25, 2012, 02:42 AM IST

  • परिवर्तनावर विश्वास असलेली ‘लक्ष्मी’

23 जुलै रोजी सकाळीच दूरचित्रवाणीवर कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या दु:खद निधनाची बातमी बघताना मन खिन्न झाले. जनवादी महिला संघटना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची एक कार्यकर्ती या नात्याने त्यांच्या सहवासात घालवलेल्या अनेक क्षणांच्या आठवणी उजळून आल्या.
हस्तांदोलनाच्या त्यांच्या कोमल स्पर्शातून, प्रेमळ आवाजातून त्या आम्हा सामान्य कार्यकर्त्यांना आपलेसे करून घेत; पण कोणत्याही प्रकारच्या अन्याय-अत्याचाराला मात्र अतिशय कणखरपणे प्रखर विरोध करत असत. 2010मध्ये कानपूर येथे संघटनेचे 10वे राष्ट्रीय अधिवेशन झाले तेव्हा आपल्या उद्घाटनाच्या संदेशात सर्व प्रतिनिधींना ‘रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत अन्यायाविरुद्ध लढत राहा’, असे आवाहन त्यांनी केले, तेव्हा सभागृहात प्रचंड स्फूर्तिदायक आणि रोमांचकारी झालेले वातावरण अजूनही मला आठवते.
कॅप्टन लक्ष्मी यांचा जन्म मद्रास (चेन्नई) येथे 24 ऑक्टोबर 1914 रोजी झाला. त्यांचे वडील एस. स्वामीनाथन हे मद्रास उच्च न्यायालयाचे प्रख्यात वकील होते, तर त्यांची आई अम्मूकुट्टी या महिलांच्या हक्कांसाठी लढणा-या समाजसेविका आणि स्वातंत्र्यसेनानी होत्या. अशा आर्थिक-सामाजिकदृष्ट्या संपन्न कुटुंबात स्वातंत्र्य आंदोलनाचे बाळकडू त्यांना मिळाले. तरुण वयातच लक्ष्मी स्वामीनाथनने उत्साहाने ब्रिटिश साम्राज्यवादाविरोधी राष्ट्र ीय चळवळीत उडी घेतली. परकीय वस्तूंची होळी करताना स्वत:चे महाग कपडे व खेळणी जाळताना त्यांना अजिबात वाईट वाटले नाही.
पैसे कमावण्याचे साधन म्हणून नव्हे, तर गरिबांची आणि विशेषकरून गरीब स्त्रियांची सेवा करता यावी म्हणून त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला आणि 1938मध्ये एम.बी.बी.एस.ची पदवी घेतली. 1940मध्ये 26व्या वर्षी लक्ष्मी सिंगापूरसाठी रवाना झाल्या. तिथे गरीब स्थलांतरित भारतीय मजुरांसाठी दवाखाना सुरू केला. स्वातंत्र्य आंदोलनाशी आणि विशेषकरून आय.एन.ए.शी संबंधित तिथल्या नेत्यांशी त्यांचा संपर्क आला. 1943मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरला भेट दिली. नेताजींना आझाद हिंद सेनेमध्ये महिलांना भरती करायचे आहे हे लक्ष्मींच्या कानावर आले होते. आणि दोघांची ऐतिहासिक भेट झाली. तिथून लक्ष्मीच्या आयुष्याने एक वेगळे आणि क्रांतिकारक वळण घेतले. आझाद हिंद सेनेच्या ‘राणी झांसी रेजिमेंट’ची स्थापना करून त्याचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले. आज जणू एक दंतकथा बनलेल्या झुंजार ‘कॅप्टन लक्ष्मी’ जगासमोर आल्या. डिसेंबर 1944मध्ये बर्माच्या जंगलात ब्रिटिश साम्राज्यशाहीविरोधी सशस्त्र लढ्यात त्या सक्रिय सहभागी झाल्या. 1945मध्ये त्यांना ब्रिटिश सैन्याने ताब्यात घेतले व काही काळ बर्माच्या जंगलातच कैदेत ठेवले. 4 मार्च 1946 रोजी त्यांना भारतात आणले गेले; परंतु जनतेने ज्या पद्धतीने त्यांचे स्वागत केले ते पाहून त्यांना कैदेत ठेवण्याचा धोका ब्रिटिशांनी ओळखला व त्यांना मुक्त केले.
आझाद हिंद सेनेतील त्यांचे सहकारी कर्नल प्रेमकुमार सहगल यांच्याशी 1947मध्ये लाहोर येथे त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर दोघांनी कानपूर येथे बिºहाड केले. फाळणीच्या पार्श्वभूमीवर भारतात मोठ्या संख्येने येणा-या निर्वासितांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. कानपूरच्या कष्टक-यांच्या वस्तीत त्यांनी छोटेसे प्रसूतिगृह सुरूकेले, ज्याच्याशी त्यांचा शेवटपर्यंत रोजचा प्रत्यक्ष संपर्क राहिला. कानपूर शहरात गरिबांप्रती त्यांचा कनवाळूपणा प्रख्यात होता. गरज पडेल तिथे त्या आपली सेवा देण्यासाठी धावून जात. बांगलादेश युद्धाच्या काळात त्यांनी कलकत्त्याला जाऊन तेथील निर्वासितांमध्ये काम केले, तर भोपाळ दुर्घटनेनंतर त्यांनी स्वत: एका वैद्यकीय पथकाचे नेतृत्व करून विषारी वायूचे गर्भवती स्त्रियांवर किती भीषण परिणाम झाले आहेत, याचा सविस्तर अहवाल सादर केला.
कोलकात्यात असताना त्यांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध आला आणि त्या डाव्या चळवळीत सक्रिय झाल्या. सुरुवातीला कामगार चळवळ आणि नंतर महिला आंदोलनात त्या काम करू लागल्या. 1981मध्ये अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची स्थापना झाली, तेव्हा त्या त्याच्या उपाध्यक्ष झाल्या व संघटनेच्या सर्व लढ्यांमध्ये आणि मोहिमांमध्ये त्यांचा अतिशय सक्रिय सहभाग होता. स्त्री-देहाचे बाजारीकरण करणा-या 1996च्या बंगळुरूच्या जागतिक सौंदर्य स्पर्धेला विरोध करण्यासाठी त्यांनी अटकसुद्धा करून घेतली होती. 1988मध्ये त्यांना पद्मविभूषण देऊन भारत सरकारने सन्मानित केले. 2002मध्ये डाव्या पक्षांनी त्यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रा.लो.आ.चे उमेदवार ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विरोधात आपला उमेदवार म्हणून उतरवले. आपण ही निवडणूक जिंकू शकत नाही, याचे पूर्ण भान असताना त्यांचा उत्साह किंचितही डळमळला नाही. अन्याय आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याची आणि पर्याय मांडण्याची एक संधी म्हणून त्यांनी त्याकडे पहिले आणि झंझावती प्रचार केला. स्वतंत्र भारतात लोकशाही आणि समाजवाद बळकट करण्याची हाक देऊन साम्राज्यवादविरोधी धर्मनिरपेक्ष परंपरा जागवून त्यानी देशभरातून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला.
शेवटच्या श्वासापर्यंत लोकशाही अधिकार, समानता आणि स्त्री-मुक्तीसाठी लढा चालू ठेवण्याचा त्यांचा निर्धार चकित करणारा होता. परिवर्तनावर त्यांचा अढळ विश्वास होता. आमच्या पिढीच्या कार्यकर्त्यांना चटकन निराश व्हायला होते. अशा वेळी कॅप्टन लक्ष्मी सहगल यांची आठवण डोळ्यात आणि हृदयात साठवून पुढील वाटचाल करायला हवी.

Next Article

Recommended

      PrevNext