Home »Magazine »Rasik» Article On Book Of Al Qaida

‘अल कायदा’च्या मुळांचा शोध!

विश्‍वास दांडेकर | Feb 16, 2013, 21:21 PM IST

  • ‘अल कायदा’च्या मुळांचा शोध!

पाकिस्तानमध्ये लष्कर-राजकारणी आणि दहशतवादी संघटनांच्या घुसळणीतून काय घडत आहे, हे जाणून घेणे भारतासाठी अत्यावश्यक ठरते. मात्र इस्लाम, त्यांचा अर्थ लावणारे घटक, त्यांच्या परस्परांत टकरा, आंतरराष्ट्रीय पवित्र्यांचे परिणाम अशा प्रवाहांचीही नीट माहिती आपल्याकडे करून घेतली जात नाही. मुख्य धाराच नीट माहीत नाहीत, मग बारीकसारीक तपशील कोण पाहणार? मात्र पाकव्याप्त काश्मीरचा अफगाण सीमाप्रदेश, त्याचे सात विभाग, तिथला भूगोल, टोळ्या, आर्थिक-भौतिक मागासलेपण-त्यातून पाय रोवण्यास दहशतवाद्यांना अनुकूल भूमी याची विलक्षण तपशिलात जाऊन माहिती पाकिस्तानी पत्रकार इम्तियाज गुल यांनी गोळा केली. स्वत:चा जीव अनेकदा धोक्यात घालून पायी हिंडणे, भेटीगाठी, एखादा धागा पकडून त्या संघटनेच्या नेत्याला भेटणे, मिळालेली माहिती विवेकाने तपासणे, त्याआधारे आणखी तपशील असा हा विस्मयकारी प्रवास आहे. त्याचेच प्रत्यंतर रेखा देशपांडे अनुवादित ‘अल कायदाचे धागेदोरे’ हे पुस्तक वाचताना येतो.

अल कायदा, तालिबान वहाबी इस्लाम, दहशतवाद, आयएसआय... आदी शब्दमालिका भारतात उच्चारली म्हणजे, अशिक्षित सामान्य जनांपासून वर्तमानपत्रांचे वाचक, दूरचित्रवाणीचे प्रेक्षक ते आपापसात शांत चर्चा करणा-यांपासून हमरीतुमरीपर्यंत जाणा-या सर्वांच्या मनात एक शब्द उमटतो, ‘पाकिस्तान’! बहुविध संस्कृतीचा आलेख मान्य नाही, अशा अतिरेकी भूमिकेतून जन्माला आलेला हा देश. याला जन्म देण्यासाठी जे काय उपाय योजले गेले त्यात ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’ या नावाखाली दहशतवादी प्रवृत्तींना आवाहन केले गेले. 1971 नंतर हा मूलतत्त्ववाद अधिक विखारीपणे जोपासण्यात आला. शाळांच्या क्रमिक पुस्तकांपासून पुढच्या पिढ्या याच मानसिकतेत घडवण्याचे प्रयत्न राज्यकर्त्यांनी केले. केवळ लष्करशहा झिया-उल-हक नव्हेत तर तथाकथित ‘सेक्युलर’ झुल्फिकार अली, बेनझीर भुत्तो व नवाज शरीफ यांनीही तेच केले. जेव्हा रशियन सेना अफगाणिस्तानात उतरल्या, तेव्हा आपल्या व्यूहात्मक बांधणीला ‘खतरा’ या नावाखाली अमेरिकेच्या आर्थिक-शस्त्र मदतीच्या पाठिंब्यावर दहशतवादी तयार करून जोपासले गेले.

अर्थात ‘दहशतवाद’ हा मानवाच्या इतिहासात नवा नाही. भारताच्या संदर्भात महाभारतातला बकासुर हा त्या काळचा ‘दहशतवादी’च आहे. तसेच पांडवांनी वनवास काळात मारलेला ‘किर्मिर’ हा बकासुर आपला भाऊ होता, असे म्हणतो. किर्मिर ठार झाल्याची बातमी कौरवांना राजसभेत हेरांनी सांगितली तेव्हा दुर्योधन हताश झाला, धृतराष्ट्राने निराश होऊन सुस्कारे सोडले, या महाभारतातल्या उल्लेखांवरून पांडवांना मारण्याची ‘सुपारी’ दुर्योधन-धृतराष्ट्राने किर्मिराला दिली होती, हे उघड होते. मध्ययुगात ब्रिटन-फ्रान्स यांच्यात युरोपात तणातणी तर आशिया-आफ्रिकेत साम्राज्यनिर्मितीची स्पर्धा होती. त्या वेळी ‘फ्रान्सची व्यापारी जहाजे लुटा, आमची सुरक्षित ठेवा’ अशा करारासाठी भूमध्य समुद्रातल्या सागरी चाच्यांना ब्रिटन पैसे चारत असे. मात्र फ्रान्सचा पराभव झाल्यावर ‘गरज सरो’ या चालीवर ब्रिटनने हे सर्व चाचे संपवले. याशिवाय अमेरिकेतला माफिया प्रसंगी अमेरिकन शासनानेही वापरल्याची उदाहरणे ज्ञात आहेत. तर दुस-या महायुद्धात फ्रान्समध्ये तिथला माफिया दोस्त राष्ट्रांनी वापरला होता. त्यामुळे दहशतवाद व राजसत्तांनी त्याचा केलेला वापर हे जगाला नवे नाही.
नवा घटक आहे आज तो या प्रवृत्तीला राज्ययंत्रणेने पूर्ण पाठबळ देणे व हे सर्व एका तत्त्वज्ञानाच्या चौकटीत बसवणे. परंतु हा भस्मासुर आता पाकिस्तानमध्ये मात्र मोकाट सुटला आहे. अशा वेळी ‘शासन’ (स्टेट) यांचे नियंत्रण स्वत:च्याच अंगोपांगांवर राहत नाही. म्हणूनच भारतात, भारताबाहेर, खुद्द पाकिस्तानात रोज घडत असलेले दहशतवादी हल्ले हे प्रत्येक वेळी शासनाच्या आशीर्वादानेच घडवले जातात, असे नव्हे. अनेक गट, त्यांच्या आपसातल्या लढाया, काही कृत्यांना शासकीय संस्थांची छुपी मदत यामागे सत्तास्पर्धा उभी असते - अंतर्गत व आंतरराष्ट्रीयसुद्धा. हे सर्व नेस्तनाबूत करणे, किमान आटोक्यात आणणे, यासाठी जी इच्छाशक्ती (पोलिटिकल विल), राज्ययंत्रणेवर पकड लागते ती आज पाकिस्तानात अस्तित्वात नाही, हे उघड आहे.


यात दोन घटक आणखी आहेत. पाकव्याप्त काश्मीरचा टोळीप्रदेश आणि पूर्वीचा वायव्य सरहद प्रांत, बलुचिस्तान असा जो अफगाणिस्तान-इराणला लगत ‘टोळी’ वाल्यांचा पट्टा आहे, तिथे कुठलीच राज्ययंत्रणा आधुनिक शासन अमलात आणू शकत नाही. हा सर्व भाग शस्त्रोपजीवी आहे. वंश, भाषा, बोली या निरनिराळ्या आहेत. ब्रिटिश राजवटीत या टोळीप्रमुखांना पैसे देऊन आटोक्यात ठेवले जात असले तरी ‘संपर्क जेवढा कमी तेवढे संबंध चांगले’ असे ब्रिटिश धोरण होते. या टोळ्यांच्या आपापल्या परंपरा, सवयी, नीतिमूल्ये, पंचायती आहेत. त्यात हस्तक्षेप सहन होत नाही.

ओसामा-बिन-लादेनची अल-कायदा आणि इतर दहशतवादी संघटना या पार्श्वभूमीवर हालचाली करतात. शिवाय याला शिया-सुन्नी, पॅलेस्टाइन, मध्यपूर्वेचे राजकारण, तेलाचे महत्त्व या सर्व घटकांचा संदर्भ आहेच. शीतयुद्धाच्या काळात तर हा रक्तरंजित आखाडाच होता, याचेच दर्शन आपल्याला प्रस्तुत पुस्तकाद्वारे होत राहते. पुस्तक पत्रकार, प्रशासन, विद्यापीठे यांना अतिशय उपयोगी आहे. या ग्रंथाचा रेखा देशपांडे यांनी केलेला अनुवाद सुरेख झाला आहे. छपाई उत्तम. अशा ग्रंथात नकाशे फार आवश्यक असतात. ‘फटा’ भागाची भौगोलिक माहिती समजून घेण्यासाठी समोर मानचित्र असेल तर सोयीचे असते. परंतु योग्य ते नकाशे नसणे ही ग्रंथाची मोठी त्रुटी म्हणायला हवी.
‘अल कायदा’चे धागेदोरे -
लेखक-इम्तियाज गुल (‘द अल कैदा कनेक्शन’)
अनुवाद- रेखा देशपांडे. अक्षर प्रकाशन
पृष्ठ- 287, किंमत- रु. 300)

Next Article

Recommended

      PrevNext