article on farmer

Home »Magazine »Rasik» Article On Farmer

अधोगती आणि प्रगतीच्‍या सीमारेषांवरचे बोरकुंड

दीपक पटवे | Feb 16, 2013, 23:27 PM IST

  • अधोगती आणि प्रगतीच्‍या सीमारेषांवरचे बोरकुंड

शिक्षणातून प्रतिष्ठा, प्रतिष्ठेतून अस्मिता आणि अस्मितेतून बदल कधी जन्म घेतो हे कळतच नाही. आपण सहजपणे या बदलालाच प्रगती म्हणत पुढे चालत राहतो. हा बदल म्हणजे खरंच प्रगती असते की प्रगतीचा तो भास असतो? मुळात प्रगती म्हणजे तरी खरं काय? अशा अनेक प्रश्नांनी गेल्या आठवड्यात मनात घर केले होते. निमित्त होते, धुळे तालुक्यातल्या बोरकुंड नावाच्या गावात झालेल्या ‘सालदारां’च्या सत्काराचे. शेतमालकाकडून शेतीची जी कामे होत नाहीत, विशेषत: जी कामे करण्यासाठी आपल्याकडे ‘नोकर’ असावा असे शेतमालकाला वाटत असते, ती सर्व कामे करण्यासाठी वार्षिक करारावर ज्याची नियुक्ती केली जाते, तो असतो ‘सालदार’. शेतात राबणा-या बैलांनाही वर्षातून एक दिवस विश्रांती दिली जाते, त्यांच्या कामाला सुटी दिली जाते, त्याच्यासाठी म्हणून खास स्वयंपाक केला जातो, आणि त्याला नैवेद्य दाखवल्याशिवाय शेतकरी आणि त्याचे कुटुंब अन्न घेत नाही; पण सालदाराच्या आयुष्यात तर असा एकही दिवस कधी येत नाही. तो यावा म्हणून हा सत्काराचा सोहळा सुरू केला आहे, असे कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या शिवसेना आमदार शरद पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले. ही गुलामगिरीवजा सालदारकी संपवण्यासाठी काही विशेष प्रयत्न करायची आवश्यकता आता राहिली आहे का? असाही प्रश्न कामगार नेते कॉम्रेड एम. जी. धिवरे यांच्या भाषणानंतर मनात उभा राहिला. कार्यक्रमाच्या निमित्ताने काही सालदारांशी गप्पा मारताना समोर आले ते चित्र ‘खेडी बदलताहेत’ हे सांगणारे तर होतेच; पण प्रगती आणि अधोगती यांच्यातली सीमारेषा खेड्यात किती धूसर होत चालली आहे, यावरही प्रकाश टाकणारे होते.

शहरांच्या जवळ असलेल्या अनेक गावांपैकीच बोरकुंड हे बोरी नदीच्या काठावर वसलेले गाव. धुळे शहरापासून अवघ्या 10-12 किलोमीटर अंतरावरचे. पूर्वी, म्हणजे सुमारे 1992पर्यंत बोरी ही ‘नदी’ होती. म्हणजे त्यातून पाणी वाहत असे. पावसाळ्यात तर पूर आला की गावाचा धुळ्याशी असलेला संपर्कच तुटून जाई. नदीवर कानोली धरण झाले आणि नदीपात्राचे तेव्हापासून मैदान झाले. वर्षभर बोरकुंड आणि शेजारच्याच रतनपुरा गावासह प्रवाहातल्या अनेक गावांची तहान भागवणारी ही नदी आता धरणातल्या पाण्यानेही 15 गावांची तहान भागवायला पुरी पडेनाशी झाली आहे.

सुमारे 20 वर्षांपूर्वी या गावात अशाच एका कार्यक्रमासाठी गेलो होतो, तेव्हाचे बोरकुंड गाव अजूनही आठवते. रस्ते कच्चे होते आणि घरेही जुन्या पद्धतीचीच होती. आता गावात पक्के रस्ते झाले आहेत. आमदार निधीतून गावातच एक मोठ्ठा हायमास्ट दिवा बसवण्यात आला आहे. त्याचा प्रकाश थेट शेजारच्या रतनपुरा गावातही जातो आहे. पूर्वी रात्री आठ वाजले की गाव काळोखात घट्ट डोळे मिटल्यागत गडप होऊन जाई. गावातल्या, विशेषत: पंचक्रोशीतल्या राजकीय स्पर्धेतून तिथे या सुधारणा झाल्या आहेत, असेच गावातला प्रत्येक माणूस सहज सांगतो. त्यांना मोठी खंत मात्र ग्रामीण रुग्णालय होत नसल्याची आहे. जिल्हा रुग्णालयापासून आवश्यक तेवढे अंतर नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालय मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. साधारण 1993 पर्यंत जगन्नाथ पाटील नावाचे एक डॉक्टर गावात रुग्णालय चालवायचे. आजारपण वाढले तर त्यांच्या या रुग्णालयात रुग्ण सहज भरती होऊन जात. कारण धुळ्यापर्यंत जायला पुरेशा सोयी नव्हत्या आणि बरे होण्यासाठी लागणारा वेळ देण्याची तयारीही बोरकुंडकरांची होती. आता प्रगतीच्या खुणा काय? तर गावात आज एकही खासगी रुग्णालय नाही. असेल कसे? धुळ्यातल्या मोठमोठ्या रुग्णालयांत जाऊन चटकन बरे व्हायची घाई सगळ्यांना झाली असताना आणि अवघ्या 20 मिनिटांत धुळ्यात पोहोचण्याच्या सुविधा उपलब्ध असताना बोरकुंडमध्ये कोणाचे रुग्णालय चालणार आहे?

जुनी घरे पाडून सिमेंट-काँक्रीटच्या किमान दुमजली इमारती गावात वाढल्या आहेत. त्यात आवश्यकतेपेक्षा स्पर्धेचीच भावना अधिक आहे, असे एक म्हातारे गृहस्थ सांगत होते. घराघरांत रंगीत दूरदर्शन संच आले आहेत. बोरकुंड हे स्वातंत्र्य चळवळीचा मोठा वारसा असलेले गाव. एक काळ असा होता की गावात 25 ते 30 स्वातंत्र्यसैनिक होते. त्यामुळे अलीकडच्या काळापर्यंत युवक चळवळींच्या माध्यमातून गावात देशसेवेचा तो वारसा सुरू होता, किंबहुना काही प्रमाणात आजही आहे. दोन वर्षांपूर्वी ओंकार पाटील आणि दिवाण पाटील हे शेवटचे दोन स्वातंत्र्यसैनिक निवर्तले आणि गाव एका अर्थाने पोरके झाले. त्यांच्या इतिहासाच्या अभिमानाचे ताईत आजच्या पिढीच्या गळ्यातून अजून निघालेले नाहीत. या वारशामुळेच असेल कदाचित, पण गावाचे शैक्षणिक प्रगतिपुस्तक चांगले आहे. बोरकुंड-रतनपुरा या शेजारी असलेल्या गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या चार आणि खासगी दोन अशा शाळा आहेत. या शाळांतून सालदारांची पोरेही शिकली आणि शहाणी झाली. त्याची जाणीव एका माजी सालदाराशी झालेल्या अनौपचारिक गप्पांमधून झाली. त्याचा मुलगा शहरात नोकरी करतोय आणि आज त्या सालदाराच्या नावावर सात बिघे जमीन आहे.

माळी समाजाच्या या सालदाराने दिलेल्या माहितीनुसार, आता गावात नवे सालदार मिळतच नाहीत. सालदारांची पोरे शिकली आहेत आणि नोकरीसाठी शहरांकडे पळाली आहेत. काही सालदारांच्या पोरांनी प्रवासी वाहतुकीची वाहने घेतली आहेत आणि स्वतंत्र व्यवसाय करताहेत. ‘सालदारकीकडे कोणीच वळत नाही?’ असे आश्चर्याने विचारल्यावर तो माजी सालदार म्हणाला, ‘कशी वळतील? आमच्या वेळी आम्हाला मालकाच्या घरी रात्री अंथरुणे टाकून द्यावी लागायची. आता अशी कामे कोण करणार आहे? आम्ही पहाटे चार वाजता उठून मालकाकडे जायचो. गुरांचे चारापाणी करणे, शेण आवरणे, गोठा आणि परिसर साफ करणे, अशी कामे करून न्याहरीच्या वेळेआधी शेतात जायचो. रात्री मालकाकडची अंथरुणे टाकूनच घरी परतायचो. नवे नवे लग्न झाले असले तरी शेतातून घरी यायची सालदाराची टाप नव्हती. मालकालाच काय, घरच्यांनाही कळणार नाही, असा चोरून लपून सालदार घरी येऊन जायचा. आता नवी पोरेच काय, जुनी माणसेही ऑफिस वेळेसारखी शेतात जातात आणि येतात. त्यांच्या आधी शेतमालकच शेतात पोहोचलेला असतो. बिचारा मालक काय करणार? आहे तोही सालदार निघून गेला, तर दुसरा आणायचा कुठून, असा प्रश्न त्याच्यासमोर असतो.’

सालदार मिळत नाही आणि मिळाला तरी पूर्वीसारखे काम करत नाही, म्हणून अनेक शेतमालकांच्या शेतीचे दिवाळे निघाले आहे. त्यामुळे अनेकांनी शेती विकून शहरात जायचा मार्ग पत्करला आहे. ज्या शेतक-यांना सालदाराबरोबर शेतात जाऊन राबायची सवय होती त्यांची निभावले खरे; पण ज्यांनी सालदाराच्याच जिवावर शेती केली, त्यांचे हाल आहेत. सालदाराची पोरे शिकली, नोकरीला लागली, त्यातून अनेक सालदार जमीनमालक झाले, ही प्रगतीच म्हणायची; पण या प्रगतीतून बरीचशी शेती लयाला चालली आहे, हेही सत्य आहेच. म्हणून तर म्हटले, खेड्यात प्रगती आणि अधोगतीची सीमारेषा पुसट होत चालली आहे...

Next Article

Recommended

      PrevNext