Rasik Aritical on caligraphy Sulekhan by Palav

Home »Magazine »Rasik» Rasik Aritical On Caligraphy Sulekhan By Palav

मराठीची सुलेखनभरारी !

अच्युत पालव | Feb 23, 2013, 21:15 PM IST

  • मराठीची सुलेखनभरारी !

चाळीस बाय पाच फुटांचा कागद सुलेखनाच्या माध्यमातून अवघ्या दोन-तीन मिनिटांत पद्धतशीरपणे भरून टाकण्याची माझी ताकद आहे. ही ताकद मला मोडीने दिली. त्यातला एस्थेटिक सेन्स किती सुंदर आहे. प्रारंभाचे, मधले आणि शेवटाचे अशा प्रत्येक अक्षराचे सौंदर्य दिसते. येथे अक्षरांची तीन-तीन, चार-चार पद्धतीने गुंफण केलेली आहे. त्यातून माझ्यात एक सुलेखनकार म्हणून प्रगल्भता येत गेली. जेव्हा मी मोडी करायला लागतो, तेव्हा ती प्रगल्भता उपयोगात येऊ लागली. जाणकार रसिक विचारू लागले की, तुझी मराठी अक्षरे इतकी छान कशी येतात, वेगळी आणि फोर्सफुल का वाटतात किंवा त्या भाषेची अशी काय खासियत तुझ्याकडे आहे? माझ्या मते, यामागे केवळ वाचन नसते, तर भाषेच्या प्रभावाचा तो परिणाम असतो. हे साधल्यानंतर पुढे मी तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास सुलेखनाच्या माध्यमातून पेश केले. जो माझ्या आयुष्यातला नि:संशय महत्त्वाचा टप्पा होता.
त्या वेळी आयआयटीला मी एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी काम करत होतो. तेव्हा माझे सुलेखनकलेतील ऋषितुल्य शिक्षक र. कृ. जोशींनी मला पहिली संधी दिली. ते म्हणाले, तुझी मोडी लिपी या प्रदर्शनातील लोकांसमोर सादर कर. प्रदर्शनात एक लांबलचक बोट ठेवलेली होती. त्यावर मी माझे सर्व काम मांडून ठेवले. तुम्ही जर चांगले काम करत असाल तर लोक तुमच्यापर्यंत येतात, यावर माझा ठाम विश्वास आहे. या प्रदर्शनात लंडन व अन्य देशांमधून डिझायनर आले होते. त्या वेळी माझे काम बघून एक जण मला म्हणाला, वुड यू लाइक टू जॉइन मी? मला ती भंकस वाटली. मला इंग्रजी धड बोलता येत नव्हते. जर्मन भाषा येत नव्हती. तरीही केवळ मराठीच्या बळावर हा माणूस मला आमंत्रण देत होता. त्या वेळी माझ्या मनात विचार आला की, इंग्रजी, जर्मन ही आपली भाषा नाही; तर अक्षर ही आपली भाषा आहे. त्या भाषेला आपण किती वेगळ्या प्रकारे मांडू शकतो, हे महत्त्वाचे आहे. क, ख, ग, ट, ठ, ढ, ण... आपली भाषा फोनेटिक आहे. हे सगळे परभाषकांना शिकवणे महत्त्वाचे आहे.
सुलेखनयात्रेतला जर्मनी हा माझा पहिला टप्पा पर्यायाने पहिला परदेश प्रवास होता. केवळ ‘मराठी’च्या झेंड्यामुळे ही झेप मी घेतली होती. मला आठवते की, जर्मनीत त्या वेळी असह्य उन्हाळा जाणवत होता. माझे सर म्हणाले की, आज काही खरे नाही, वर्कशॉप बंद करू. तर मी उत्तरलो, तसे कशाला करायचे; त्यापेक्षा मी तुम्हाला एक कविता शिकवतो. असे सांगून ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा’ ही कविता उपस्थित विद्यार्थ्यांना ऐकवून दाखवली. मी म्हणालो, हे पावसाचे गाणे आहे. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना बाराखडी शिकवलेलीच होती. कविता ऐकून त्यांनी पावसाचे गाणे चितारायला सुरुवात केली. एका महिलेने माझ्याकडे लांबलचक कागद मागितला. प्रिंटरचा पेपर घेऊन त्यावर कविता लिहिण्यास सुरुवात केली. पण पाऊस आला मोठा यातील ‘मोठा’ या शब्दाच्या जवळ येऊन ती थांबली. प्रश्नार्थक मुद्रेने म्हणाली, मि. अच्युत, व्हॉट डू यू मीन बाय ‘मोठा’? मी म्हणालो, मोठा म्हणजे खूप मोठा. एक मोठी सर येते... पण सगळे तिला समजावून सांगणे खूप कठीण गेले. कारण असा प्रश्न कोणी विचारेल, याची तयारीच मी केली नव्हती. तशातच तिने एक बादली घेतली आणि त्यातील पाणी जोराने फेकले. मी त्यावर म्हणालो, अगदी असेच आहे ते. जे मला अपेक्षित होते, तेच त्या सुलेखन कार्यशाळेत आलेल्या महिलेने केले. याचा अर्थ शब्दार्थ तिला कळला. मग एका जर्मन मुलीने फुलपाखरावरची कविता साकारली. त्यासाठी त्यांना फुलपाखरू म्हणजे नेमके काय, याच्या काही नोट्स दिल्या. त्यानंतर त्या मुलांमध्ये झालेले ट्रान्सफॉर्मेेशन अनुभवले होते. गंमत म्हणजे, त्या मुलांनी अभ्यासासाठी देवनागरी लिपी निवडली होती आणि तिचा सखोल अभ्यास सुरू केला होता. मग अक्षरे, आकार, उकार, जोडाक्षरे, रु कुठून आला, साहित्य उलगडून बघण्यासही त्यांनी सुरुवात केली. तुकाराम कोण आहे, ज्ञानेश्वर कोण आहे, पु. ल. देशपांडे कोण, हे सगळे त्यांच्या समोर उलगडायला लागले. खरे तर 1986पासून जर्मनीमध्ये कॅलिग्राफीसाठी मराठी भाषा शिकवण्यास सुरुवात झाल्याचे मला कळले; पण सगळ्यात गंमत म्हणजे, जर्मनीमध्येच एक विदुषी तेथील मुलांना ज्ञानेश्वरी शिकवत असल्याचे बघून तर मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. आपल्या भाषेवर सातासमुद्रापार कोणी तरी प्रेम करतेय, ही भावनाच खूप भारावून टाकणारी होती, त्या वेळी. मराठीमध्ये आणखी जोराने काम केले पाहिजे, याची प्रेरणा अनुभवातून मला मिळाली.

मी दुसर्‍या वेळी जर्मनीला गेलो तेव्हा तर 80 वर्षांच्या आजीबाईने सुंदर मराठी लिहून मला दिले. इतर अनेक जणांनीही मराठीतून खूप सुंदर लिहिले होते. चांदणी, चंद्र, आई अशा शब्दांची सुंदर कॅलिग्राफी करून मला दिली. हे सगळे बघितल्यानंतर मन भरून आले होते. माझा पुढचा प्रवास रशियाचा होता. मी गेलो, त्या वेळी कलेच्या अंगाने एक प्रकारची उदासीनता रशियन समाजात पसरलेली होती. याची त्वरित दखल घेऊन रशियन सरकारच्या वतीने वेगवेगळ्या देशांतील कलावंतांना त्यांची कला सादर करण्यासाठी तेथे आमंत्रित केले होते. त्या प्रदर्शनात एका ठिकाणी प्रचंड गर्दी जमली होती. त्या कलाकाराचे काम सगळे जण निरखून बघत होते. मला आश्चर्य वाटले. माझ्याबरोबर असलेल्या इंटरप्रिटर बार्इंना विचारले की, ही इतकी गर्दी कशासाठी आहे? ती म्हणाली की, ते एका खूप मोठ्या कलाकाराचे काम असून ते बघण्यासाठी गर्दी झाली आहे. त्याचे काम खूप छान आहे, असे येथील प्रेक्षकांचे मत आहे. कुतूहल म्हणून त्या गर्दीत पुढे जाऊन मी जरा डोकावलो, तर आश्चर्याचा धक्का बसला. जेथे प्रेक्षकांनी गर्दी केली होती, ते माझेच काम होते. मी त्या बार्इंना म्हणालो, हे तर माझेच आर्टवर्क आहे. ते ऐकून तर ती आश्चर्यचकित झाली. या प्रदर्शनात जगभरातील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. त्याचे कारण म्हणजे, या सगळ्या प्रदर्शनात मराठी असलेला मीच एकमेव होतो. माझ्यासाठी तो अभिमानाचा क्षण होता.
भारताची देवनागरी लिपी आहे, हे तेथील लोकांना ठाऊक होते. पण मनातले भाव व्यक्त करताना त्या अक्षराचा केवढा मोठा व्याप आपण वापरतो याची त्यांना कल्पना नव्हती. त्या वेळी मी माझ्या सादरीकरणात सांगितले की, आम्ही जे बोलतो ते लिहितो. इंग्रजी वेगवेगळ्या प्रकारे लिहिली जाते; पण मराठीत तसे नसते. लिपी विशिष्ट अँगलने लिहिताना लय, सौंदर्य या सगळ्या गोष्टी त्यात येत असतात. ब्यूटिफुलला आम्ही सौंदर्य म्हणतो; पण सौंदर्य हा शब्द त्याच्या अर्थाप्रमाणेच दिसेल. पाऊस शब्द असेल तर तो पावसासारखाच दिसेल. किंबहुना माऊली, पाऊस असे काही शब्द घेऊन मी ते प्रदर्शनात मांडले होते; पण ते नुसतेच शब्द नव्हते, तर त्यात अर्थ होता, भावना होत्या. त्यातील आकृतिबंध फार सुंदर होता. माझी मराठी भाषा, देवनागरी लिपी व्यासपीठावर आणणे महत्त्वाचे होते आणि आमच्या देशातली सुलेखन संस्कृती समृद्ध आहे, हे मला सिद्ध करून दाखवायचे होते.
रशियानंतर मी चीनला गेलो, त्या वेळी माझे उत्सव हे मी शब्दातून मांडले होते. मी विठ्ठल उभा केला आणि तो शब्दांतून समजावून सांगितला. पाऊस परत लावला. गोविंदा केला आणि गोविंदांचा थर अक्षरातून मांडला. हे करत असताना चीनमधील विद्यार्थी-कलावंतांना ‘एकत्र काम करूया सुलेखनावर’ असे सांगितले. पण ते म्हणाले की, आम्हाला मराठी येत नाही. मी म्हणालो, मला चिनी भाषा येत नाही. मग तुम्ही तुमच्या, मी माझ्या पद्धतीने काम करू, असे म्हणून काम सुरू झाले. एकीकडून चिनी शब्दांचे जाड फटकारे येत होते, तर दुसरीकडून लयबद्ध मराठी शब्द येत होते. मग अक्षरांचा एक सुंदर माहोल तयार झाला. त्या वेळी अक्षरे माणसे जोडतात, असे कुठे तरी जाणवले. अगदी ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ असेही त्यांनी लिहिले. अगदी तेथील दूरचित्रवाहिनीवरील मुलाखतदेखील अस्सल मराठी भाषेतच झाली. असाच एक वेगळा प्रयोग मी नंतर ‘ओम’ आणि ‘अल्ला’ बाबतही केला होता. ओम आणि अल्ला जर एकाच नाभीतून येत असतील तर आपण भांडतोय कशासाठी, असा प्रश्न मला पडला आणि ते मी मांडण्याचा प्रयत्न केला. कलाकृती आणि सामाजिक बांधिलकी म्हणून लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला मिळाला. दुबईत गेलो असताना तेथे हमीद नावाची एक व्यक्ती म्हणाली, पालव, तुमचे काम खूप छान आहे. तुमच्याविषयी दुबईत मी खूप ऐकलेय. मग मी त्यांना म्हणालो, आपण दोघे एकत्रित काम करू. मी उर्दूत लिहितो, तुम्ही मराठीमध्ये लिहा. मग दोन भाषा, दोन आकार, दोन धर्म अशा आम्ही दोघांनी दुबईत सुलेखनाच्या माध्यमातून एकच धमाल उडवून दिली. भाषा-धर्म-देश यांना जोडणारी एक भाषा संगीताची असेल तर दुसरी तितकीच प्रभावी भाषा सुलेखनाची आहे, हे मला जणू त्यातून सगळ्यांना दाखवून द्यायचे होते...
माझ्या ध्यानीमनी नसतानाही हा सगळा प्रवास घडला. खरं सांगतो, मी दहावी नापास विद्यार्थी आहे. नापास झाल्यावर बाबा फक्त एवढंच म्हणाले, अरे, हे घे पैसे आणि पुन्हा एकदा दहावीला बस; पण एकाही शब्दाने रागावले नाहीत. त्यांनी मला जो आत्मविश्वास त्या वेळी दिला, तो खूप मोठा होता. त्यानंतर पुन्हा दहावीला बसलो आणि 60 गुणांचा पेपर सोडवला आणि त्यात 54 गुण मिळाले; पण हा क्षण असा होता की येथून माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आज मला अभिमानाने सांगावेसे वाटते की, जर्मनीतल्या काही म्युझियममध्ये माझे आर्टवर्क आहे. आणखी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे, याच कॅलिग्राफीमुळे 86 वर्षांच्या मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच या वर्षी चित्रकारांना संमेलनात स्थान देण्यात आले होते. मराठी सुलेखनाला वैश्विक स्तरावर दाद मिळालीच; पण घरच्या अंगणातही यथोचित सन्मानस्थान मिळाले.

मोडी प्रभाव

मुंबईतल्या लालबाग परिसरात असलेली राजकोटवाला चाळ हे माझे घर. या परिसरात कबड्डी हा खेळ त्या वेळी अतिशय प्रसिद्ध होता. राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू कबड्डी स्पर्धांमध्ये भाग घेत असत. देवनागरी लिपीच्या सौंदर्याची पहिली ओळख, या सामन्यांच्या प्रसिद्धीसाठी लिहिल्या जाणार्‍या फलकांमुळे झाली. अतिशय सुवाच्य आणि देखण्या मराठी भाषेत हे फलक लिहिले जात. तेथूनच जवळ असलेल्या शिरोडकर विद्यालयात दाखल झाल्यानंतर दरदिवशी लिहिल्या जाणार्‍या सुविचारांमुळे या भाषेकडे मी अधिक आकर्षित झालो.

माझे अक्षर वळणदार असल्याने कालांतराने ते फलक लिहिण्याचे कामही ओघाने माझ्याकडे आले. खरे तर फळा आणि खडूचा पहिला स्पर्श या फलक लेखनामुळे झाला. फळ्यावरचे शब्द कागदावर उतरले, ते मी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश केल्यावर. पेन, बोरू, शाई या नव्या सवंगड्यांची ओळख येथे झाली. याच काळात नामवंत सुलेखनकार र. कृ. जोशींचा सहवास लाभला.

मोडी लिपीच्या अभ्यासासाठी र. कृ. जोशींनी शिष्यवृत्ती जाहीर केली होती. इतर भाषा या भारतीय असल्या तरी मराठीच्या तुलनेत मला तशा परक्याच होत्या. त्यामुळे मातृभाषा म्हणून मराठी हा माझा ‘ स्ट्रॉँग पॉइंट’ असल्याने मोडीच्या अभ्यासाची तयारी सुरू केली.

त्यामुळे मोडीमध्ये बंगाली, कानडी, उर्दू, तेलगू या सगळ्या लिपींचे बेमालूम मिश्रण असल्याचे लक्षात आले. पेशवेकालीन, मोगलकालीन अशी मोडीची वेगळी ओळख असल्याचेही समजले. या भाषेमुळे देवनागरीच्या कॅलिग्राफीमध्ये खूप उपयोग झाला.

अक्षरांनी मने जोडली

जालंधरमध्ये काम करून रात्रीच्या गाडीने श्रीनगरला जाणार होतो; पण त्याच वेळी तिकडे बॉम्बस्फोट झाले होते. मग सकाळी जावे, असा विचार केला. सकाळी दोन गाड्या आल्या. त्याबरोबर एक सिक्युरिटीची गाडी होती. त्यांनी आम्हाला थेट मोटारीने श्रीनगरपर्यंत सोडले, पण एक पैसाही घेतला नाही.
अक्षरे माणसाला जोडतात, हा अनुभव मला येथे पुन्हा एकदा आला. काश्मीरला गेल्यावर आमच्या कामात तेथील लोकांनी फारसा रस सुरुवातीला दाखवला नाही; पण आम्ही सरळ कागद काढून काम सुरू केले.
ते बघून सगळे पार वेडे झाले. ती मंडळी म्हणाली की, इथे दहशतीचे वातावरण इतके आहे की, सकाळी कामावर जातो ते थेट संध्याकाळी परत येतो. घरी परत येऊ की नाही याचीदेखील शाश्वती नसते. पण तुमचे सुलेखनातील काम बघितल्यावर असे वाटते की, निदान यासारख्या कलेसाठी तरी जगले पाहिजे...

पुतीन यांची दाद

रशियातील प्रदर्शनात सादरीकरणासाठी जी काही पाच मिनिटे मिळाली, त्यात मी लोकांना अक्षरश: वेडे करून टाकले. पाच फूट बाय चाळीस फुटांचा एक लांबलचक कागद जाताना सोबत घेऊन गेलो होतो.

लोकांना वेडे करायचे तर आपल्या पद्धतीनेच केले पाहिजे, त्यामुळे या व्यासपीठाचा वापर करून अख्खा रामदासच थेट मराठी भाषणातून समजावून सांगितला. योगायोगाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हे सगळे टीव्हीवर बघितले. मराठी कॅलिग्राफीचा वेगळा प्रकार त्यांना खूपच आवडला. त्यांनी आयोजकांकडे माझ्याबद्दल चौकशी करून, प्रदर्शनादरम्यान मी काय बोललो, लिपी कोणती आदी माहिती घेतली.

मला खूप बरे वाटले की, एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष इतक्या छोट्या गोष्टीत लक्ष घालतो. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीदेखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर मला 20 मिनिटे दिली होती. त्यांनी तर पान अन् पान जाणून घेतले. हादेखील एक सुखद अनुभव होता.
achyutpalav@gmail.com

Gujarati News સાથે જોડાયેલા અન્ય અપડેટ જાણવા માટે અમને Facebook અને Twitter પર ફોલો કરો
Web Title: Rasik Aritical on caligraphy Sulekhan by Palav
(News in Gujarati from Divya Bhaskar)

Next Article

Recommended

      PrevNext