Home »Magazine »Rasik» Rasik Article On Maharashtra Society

जागृती आणि प्रगतीचा वसा

प्रा. भारती जोशी | Feb 23, 2013, 22:51 PM IST

  • जागृती आणि प्रगतीचा वसा

मराठ्यांचे राज्य खालसा झाल्यानंतर ब्रिटिश राजवटीत बेने इस्रायली समाज महाराष्ट्रातील इतर भागातही स्थायिक होऊ लागला. 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर बेने इस्रायली सैनिकांची कुटुंबे पुण्याच्या रास्ता पेठेत, विशेषत: लकेर्‍या मारुतीच्या समोरील रस्त्याच्या दुतर्फा स्थायिक झाली होती. त्याला ‘इस्रायली आळी’ असे नाव होते. त्यातील कित्येकांना खान बहाद्दुर, खानसाहेब अशा पदव्या मिळाल्या होत्या. ब्रिटिशकाळात सैन्यात नोकरी करणार्‍या बेने इस्रायलींप्रमाणेच सरकारी नोकरीत काम करणारे बेने इस्रायलीसुद्धा मोठ्या प्रमाणात दिसतात. सरकारी खात्यांपैकी रेल्वे, कस्टम, पोस्ट आणि टेलिग्राफ खात्यात अनेक बेने इस्रायली काम करत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील इतर भागात व भारतातील इतर शहरांत वास्तव्य केलेले दिसते. जसे राजस्थानात अजमेर, मध्य प्रदेशात इंदोर आणि जबलपूर, कर्नाटकात बेळगाव, दिल्ली, गुजरातमध्ये अहमदाबाद, याशिवाय महाराष्ट्रात पुणे, इगतपुरी, भोर, सातारा आदी. 1961 व 1971च्या जनगणनेतही मुंबई, ठाणे याप्रमाणेच पुणे, नाशिक, सोलापूर, सातारा, नागपूर, धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, भंडारा, वर्धा, नांदेड येथेही कमी प्रमाणात का होईना; पण ज्यूंची नोंद झाली आहे.
अर्थात, ब्रिटिश राजवटीच्या काळात बेने इस्रायलींचे सर्वाधिक स्थलांतर झाले ते मुंबईत. मुंबईत बेने इस्रायलींबरोबर बगदादी ज्यू, कोचीन ज्यू यांनीही स्थलांतर केले. 1746 मध्ये बेने इस्रायली समाजातील आवसकर घराण्यातील पुरुषाने मुंबईतील खडक भागात सर्वात प्रथम घर बांधले. त्यानंतर दिवेकर कुटुंबीय त्यांच्या शेजारी राहण्यास आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर बेने इस्रायली मुंबईत दाखल होऊन या भागात त्यांची स्वतंत्र घरे उभी राहिली. त्यामुळे ही वस्ती ‘इस्रायली मोहल्ला’ म्हणून ओळखली जाऊ लागली. मुंबईत बेने इस्रायली प्रार्थना मंदिर दिवेकर यांनी बांधले. या प्रार्थनालयात सेफेरतोरा आणण्यासाठी ते कोचीनला निघाले. प्रवासात त्यांचा अंत झाला. पुढे त्यांच्या वारसांनी सेफेरतोरा आणून प्रार्थनालय चालू केले. हेच मुंबईतील जुने शाआर हारा हमीम प्रार्थनालय. मांडवी सॅम्युएल स्ट्रीट येथे 1796ला स्थापन झाले. इंग्रजांनी म्हणूनच प्रार्थनालय असलेल्या रस्त्याला सॅम्युएल स्ट्रीट असे नाव दिले. या प्रार्थनालयाला मशीद म्हटले जाई. यावरून तेथून जवळ बांधलेल्या रेल्वे स्टेशनला ‘मशीद बंदर’ असे नाव देण्यात आले. मुंबईच्या इतर विभागातही शाआर रासोन, माळ्यावरची मशीद, मागेन हास्सीदीन, तिफरेथ इस्रायल, एत्स हाईम प्रेयर हॉल, रोडेफ शालोम प्रेयर हॉल, अशी प्रार्थनालये बांधली गेली. पुण्यात लाल देऊळ म्हणून प्रसिद्ध असलेले प्रार्थनालय ज्यूंचे आहे. अशी प्रार्थनालये ठाणे, पनवेल, अलिबाग, रेवदंडा अशा अनेक गावांत बांधली गेली. मुंबईतील महत्त्वाच्या अनेक इमारती त्या वेळच्या सधन बगदादी ज्यू कुटुंबीयांनी बांधलेल्या दिसतात. साधारण 1832च्या सुमारास ते मुंबईत आले. यातील अनेकांचा चीनबरोबर अफू व रेशीम व्यापारात सहभाग होता. त्यातून ही कुटुंबे सधन झाली. यापैकी ससून कुटुंबीयांचा मुंबईच्या औद्योगिक जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. 1920मध्ये ससून कुटुंबीयांच्या मालकीच्या 12 कापड गिरण्या होत्या. त्यातील सर डेव्हिड ससून यांनी मुंबईच्या गिरणी मालक संघाचे प्रतिनिधित्व भारतीय कायदे मंडळात केले. मुंबईतील डेव्हिड ससून इंडस्ट्रीयल अँड रेफोर्मेटरी इन्स्टिट्यूट व एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल, मसिना हॉस्पिटल, हाफकिन इन्स्टिट्यूट, डेव्हिड ससून लायब्ररी, व्हिक्टोरिया गार्डन, द गेट वे ऑफ इंडिया, हुतात्मा चौक, ससून डॉक, बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीज, याशिवाय पुण्याचे ससून हॉस्पिटल, अशा अनेक इमारती आजही त्यांची आठवण देत उभ्या आहेत. तर लेडी फ्लोरा ससून यांनी रशियन ज्यू असलेले डॉ. हाफकिन यांना पाठिंबा दिल्यानेच त्यांना कॉलरा रोगावरील लस शोधता आली. त्या काळी ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला’ रेल्वेने तयार केलेला ठाणे ते मुंबई हा रेल्वे मार्ग व पारसिकचा बोगदा यांच्या बांधकामातही ज्यू तंत्रज्ञानाचा सहभाग होता. भारतीय अर्थव्यवहारात बेने इस्रायली समाजातील सर ससून डेव्हिड बॅरोनेट यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे, कारण त्यांनीच बँक ऑफ इंडियाची स्थापना केली (1906). आज राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ही महत्त्वाची बँक म्हणून ओळखली जाते.

बेने इस्रायली समाजात शिक्षणाचा प्रसार प्रथमपासूनच झालेला दिसतो. सुरुवातीला ब्राह्मण वर्गाने चालवलेल्या शाळांमधून त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर ख्रिश्चन मिशनर्‍यांनी काढलेल्या शाळांमध्ये बेने इस्रायली मुले व मुली शिक्षण घेत. तसेच या शाळांमध्ये शिक्षक म्हणून बेने इस्रायली काम करत. महत्त्वाचे म्हणजे, ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकूनही बेने इस्रायली ख्रिश्चन धर्म स्वीकारत नसत. जोसेफ इझिकेल राजपूरकर यांनी हिब्रू व इंग्रजी पुस्तकावरून महत्त्वाच्या धर्मग्रंथांची मराठी भाषांतरे करून ती समाजाला दिली. त्यामुळेही ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या धर्मप्रसारास आळा बसला. त्यासाठी ख्रिश्चन मिशनरी शाळेतून बेने इस्रायली मुलांना दिले जाणारे शिक्षण थांबवण्यात आले. 1875मध्ये मुंबईत हाईम सॅम्युएल कीहिमकर यांनी बेने इस्रायलींसाठी खडक विभागात स्वतंत्र शाळा स्थापन केली. नंतर ती माझगाव विभागात हलवली. यात नेहमीच्या शिक्षणाबरोबर धार्मिक शिक्षणही दिले जाई. त्या वेळेस या शाळेचे नाव इझरलाइट हायस्कूल होते. पुढे हाँगकाँग येथील श्रीमंत इराकी ज्यू एली कदूरी यांनी दिलेल्या देणगीतून आजची शाळा बांधली गेली. ती आजही सर एली कदूरी स्कूल म्हणून ओळखली जाते. या शाळेचे माध्यम मराठी आहे. याच शाळेत काम करणार्‍या रेचल गडकर व मुख्याध्यापिका फ्लोरा सॅम्युएल या दोघींनी बेने इस्रायली समाजाचा परिचय करून देणारी पुस्तके मराठीत लिहिली. यापैकी ‘संस्कृती संगम’ या पुस्तकाच्या लेखिका फ्लोरा सॅम्युएल (अष्टमकर) आज इस्रायलला स्थलांतरित झाल्या असल्या तरी मराठी भाषक समाजाशी त्यांनी संपर्क ठेवला आहे. समाज जागृतीच्या क्षेत्रात वृत्तपत्रे, नियतकालिकांचे स्थान महत्त्वाचे असते. बेने इस्रायली समाजाला आपला धर्म, धर्मभाषा याचे ज्ञान देणे जरुरीचे झाले. कारण ख्रिस्ती मिशनरी आपल्या धर्मप्रसारार्थ नियतकालिकांचा वापर करत होते. त्याला उत्तर म्हणून 1877 मध्ये ‘सत्यप्रकाश’ या पहिल्या नियतकालिकाची सुरुवात झाली. त्याचे संपादक होते रेऊबेने व अब्राहमजी कोर्लेकर.
1877 मध्ये ‘इस्रायलाश्रम’ हे मासिक प्रसिद्ध होऊ लागले. त्याचे संपादक होते डेव्हिड हाइम दिवेकर. 1950 पर्यंत बेने इस्रायली समाजात 22 वृत्तपत्रे सुरू झाली. त्यातील काही दीर्घकाळ, तर काही अल्पकाळ चालली. त्यापैकी 1947 पासून प्रकाशित होणारे ‘मक्काबी’ हे नियतकालिक दीर्घायुषी ठरले. या मराठी नियतकालिकामुळे बेने इस्रायली समाजातील घडामोडी समजण्यात मदत होते. 1986पासून सुरू झालेले ‘शायली’ हे बेने इस्रायलचे त्रैमासिक आजही सुरू असून ठाण्याच्या ‘इव्हज असोसिएशन’मार्फत चालवले जाते. सुझी गडकर व नॉमी भोरपकर या त्याच्या संपादक असून इस्रायल व भारत यांच्यात समन्वय साधण्याचे श्रेय या मासिकाला द्यावे लागेल. वृत्तपत्रातून समाजात धर्मजागृती करण्याचे जसे काम झाले; तसे सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या अनेक प्रश्नांवर चर्चाही घडवून आणली. बेने इस्रायली वृत्तपत्रांनी या विषयावर लेखन करून समाजातील हा भेद समूळ नष्ट करण्यात यश मिळवले. आज भारत व इस्रायल यांच्यातील सुसंवाद साधण्याचे काम ‘शायली’ या त्रैमासिकाबरोबरच ‘मायबोली’ हे इस्रायलमधून प्रसिद्ध होणारे मराठी नियतकालिक करत असून महाराष्ट्राच्या संस्कृती-परंपरेचे प्रतिबिंब त्यात उमटत असते.
bsj286@yahoo.co.in

Next Article

Recommended

      PrevNext