Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Accused Arrest In Alandi Pune

खुनी किर्तनकाराला आळंदीतून अटक; भावजय, पुतण्यावर कोयत्याने केले होते वार

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 12:29 PM IST

  • हत्याकांडानंतर घटनास्थळी पोहोचलेले पोलिस अधिकारी आणि नागरिक.
शिऊर - शेतजमिनीच्या वादातून सख्खी भावजय व पुतण्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील जिरी येथे 6 जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली होती. यातील आरोपी राजेंद्र सूर्यवंशी हा खून करून घटनास्थळावरून फरार झाला होता. त्याला जेरबंद करण्यात अखेर बारा दिवसांनंतर पोलिस यंत्रणेला यश आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून त्याला ताब्यात घेतले आहे.
जिरी येथील गट क्रमांक 108 येथे सूर्यवंशी परिवाराची शेतजमीन असून शेतजमिनीची वाटणी करण्यात येऊन बांधावर सिमेंटचे खांबही रोवलेले होते. 6 जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास राजेंद्र सूर्यवंशी हा शेताच्या बांधावर रोवलेले खांब उखडून टाकत होता. दरम्यान, रूपाली सूर्यवंशी यांनी शेताकडे धाव घेऊन ‘माझ्या शेतातील खांब का काढता’ अशी विचारणा केली उखडलेले सिमेंट खांब रूपाली यांनी पुन्हा रोवण्याचा प्रयत्न केला असता राजेंद्र सूर्यवंशी याने धारदार कोयता आणून रूपाली यांच्या मानेवर वार करत खून केला. दरम्यान, आईच्या बचावासाठी पुढे आलेला त्यांचा 15 वर्षीय मुलगा गोकुळवरही राजेंद्रने शस्त्राने हल्ला केल्याने दोघे मायलेक जागीच ठार झाले. तर, आई भावाला मारहाण होत असताना मुलीने पळ काढल्याने ती बचावली. हे क्रूर कर्म करून किर्तनकार राजेंद्र सूर्यवंशी फरार झाला होता. तेव्हापासून पोलिस राजेंद्रच्या मागावर होते.

राजेंद्र हा महाराज असल्याने तो मंदिर किंवा मठातच असणार, असा पोलिसांचा अंदाज होता. यानुसार पोलिस यंत्रणेने नाशिक, पुण्याच्या दिशेने तपासकार्यात वेग वाढवला होता. त्याच्या मागावर दोन पथकेदेखील रवाना केली होती. अखेर पोलिस यंत्रणेला खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आळंदी येथे सापळा रचून आरोपी राजेंद्र सूर्यवंशीला बेड्या ठोकल्या. पोलिस अधीक्षक आरती सिंह, उज्ज्वला वनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक धनंजय फराटे, पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, रोहिदास तांदळे यांच्या सहकाऱ्याने स्थानिक गुन्हे शाखेच सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव, सहायक फौजदार गफ्फार पठाण, विक्रम देशमुख, गणेश मुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली
पाच दिवसांची कोठडी
आरोपी राजेंद्र सूर्यवंशी याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार यांनी दिली.

Next Article

Recommended