Home »Sports »From The Field» India Vs Australia, 3rd Test, Day 4 At Ranchi JSCA International Stadium

IND v AUS : पुजारा-साहाबरोबरच जडेजानेही केले कांगारुंना बेजार, भारताला आज विजयाची संधी

दिव्य मराठी न्यूज नेटवर्क | Mar 20, 2017, 08:48 AM IST

रांची -चेतेश्वर पुजाराच्या (२०२) अकरा तासांच्या मॅरेथॉन खेळीच्या बळावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ९ बाद ६०३ धावांवर डाव घोषित केला. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात १५२ धावांची आघाडी घेतली. दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २ बाद २३ धावा काढल्या होत्या. ऑस्ट्रेलियाला डावाने पराभव टाळण्यासाठी आणखी १२९ धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५१ धावा काढल्या होत्या. आता सामना भारताच्या हाती आहे.

पुजाराने विकेटकीपर वृद्धिमान साहासोबत (११७) सातव्या विकेटसाठी १९९ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातव्या विकेटसाठी ही भारताकडून सर्वात मोठी भागीदारी ठरली. पुजाराने आपल्या खेळीत ५२५ चेंडूंचा सामना करताना २१ चौकार मारले. ८५ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पुजारा पहिला भारतीय आहे, ज्याने ५०० पेक्षा अधिक चेंडू खेळले. यादरम्यान तो ६७२ मिनिटे खेळपट्टीवर होता. त्यानंतर शेवटी जडेजानेही वेगवान अर्धशतक पूर्ण केले. तसेच ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू झाल्यानंतर दोघांना बादही केले.

भारताने चौथ्या दिवशी ६ बाद ३६० धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्या वेळी पुजारा १३० आणि साहा १८ धावांवर होते. पुजाराने करिअरचे तिसरे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरे द्विशतक ठोकले. साहाने करिअरचे तिसरे शतक काढले. साहा कसोटीत १००० हजार धावांपासून १८ धावांनी मागे आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजाने ५५ चेंडूंत ५ चौकार, १ षटकारासह नाबाद ५४ धावा काढल्या. जडेजाच्यासुद्धा कसोटीत ९८८ धावा झाल्या आहेत. जडेजाने नंतर ऑस्ट्रेलियाने दोन गडी बाद करून कांगारूंना दबावात आणले. जडेजाने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला (१४) आणि नॅथन लॉयनला (२) त्रिफाळाचीत केले. खेळ संपला त्यावेळी रेनशॉ ७ धावांवर नाबाद होता.

पुजारा-साहाला रिव्ह्यूचा फायदा : पुजारा-साहा यांना रिव्ह्यूचा फायदा झाला. पॅट कमिन्सने साहाला पायचीत केले. पंचांनीही त्याला बाद दिले. साहाने रिव्ह्यू मागितले. रिव्ह्यूत साहा नाबाद ठरला. पुजाराला १५७ च्या स्कोअरवर लॉयनने पायचीत केले. त्यानेसुद्धा रिव्ह्यू मागितले. तोसुद्धा नंतर नाबाद ठरला.
११ तास खेळपट्टीवर राहून ठोकले द्विशतक
५२५ चेंडू खेळून काढल्या २०२ धावा
सर्वाधिक चेंडू खेळण्याचा पुजाराचा विक्रम
भारताच्या चेतेश्वर पुजाराने कसोटीच्या एका डावात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा भारतीय विक्रम केला. याआधी हा विक्रम राहुल द्रविडच्या नावे होता. पुजाराने रांची कसोटीत ५२५ चेंडूंचा सामना करताना २१ चौकारांसह ३८.४७ च्या स्ट्राइक रेटने २०२ धावा काढल्या.
- चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन द्विशतके झळकावली. हॅमंडने सर्वाधिक ४ द्विशतके काढली. ब्रायन लाराने ३ तर ग्रॅहम पोलॉक, सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी २ द्विशतके ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावली.
२००० धावांचा पुजाराचा विक्रम
एका सत्रात प्रथम श्रेणीत २००० पेक्षा अधिक धावा काढणारा पुजारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. एका सत्रात सर्वाधिक धावा काढण्याच्या विक्रमात त्याने २०१६-१७ सत्रात कोहलीला मागे टाकले. पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११ कसोटी सामन्यांत १००० धावांचा टप्पा गाठला.
कसोटीत सर्वाधिक चेंडू खेळणारे भारतीय असे
खेळाडू चेंडू धावा वि. संघ वर्षे
चेतेश्वर पुजारा ५२५ २०२ ऑस्ट्रेलिया २०१७
राहुल द्रविड २७० ४९५ पाकिस्तान २००४
नवज्योत सिद्धू ४९१ २०१ वेस्ट इंडीज १९९७
रवी शास्त्री ४७७ २०६ ऑस्ट्रेलिया १९९२
सुनील गावसकर ४७२ १७२ इंग्लंड १९८१
- पुजाराच्या ५३ वर्षांआधी १९६४ मध्ये अखेरीस कोणत्याही फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५०० पेक्षा अधिक चेंडू खेळून काढले होते. त्या वेळी केन बॅरिंग्टनने ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत ६२४ चेंडू खेळून काढताना २५६ धावा काढल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५०० चेंडू खेळणारा पुजारा केवळ चौथा फलंदाज ठरला. अशी कामगिरी विली हॅमंडने तीन वेळा केली आहे.
पुजाराचा प्रथमश्रेणीचा विक्रम
- प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पुजाराने सर्वाधिक ११ द्विशतके ठोकण्याच्या विजय मर्चंट यांच्या विक्रमाची बरोबरी केली. विजय हजारे, सुनील गावसकर, राहुल द्रविड यांनी प्रथम श्रेणीत १० द्विशतके ठोकली आहेत. पुजाराने ३ द्विशतके कसोटीत, ५ रणजीत, २ भारत अ संघाकडून, तर एक दुलीप ट्रॉफीत काढले.

- पुजाराने या डावात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू स्टीव्ह ओकिफेने तब्बल २१५ चेंडू खेळून काढले. २००० नंतर एखाद्या गोलंदाजाचे इतके चेंडू खेळण्याची ही पहिली वेळ आहे. २००० मध्ये महेला जयवर्धनेने निकी बोयेचे २२१ चेंडू खेळले होते.

या डावात स्टीव्ह ओकिफेने तब्बल ७७ षटके गोलंदाजी केली. २००० वर्षांपासून कसोटीच्या एका डावात सर्वाधिक गोलंदाजी करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. २००० मध्ये बुलावायो कसोटीत झिम्बाब्वेच्या रे प्राइसने ७९ षटके गोलंदाजी केली होती.
हेही आहे महत्त्वाचे
- वृद्धिमान साहाचे हे करिअरचे तिसरे शतक ठरले. भारताचा विकेटकीपर फलंदाज म्हणून सर्वाधिक शतके ठोकण्याच्या यादीत तो महेंद्रसिंग धोनीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- भारताने पहिल्या डावात तब्बल २१० षटके खेळून काढली. कसोटीत एका डावात सर्वाधिक षटके खेळण्याचा हा भारतीय विक्रम आहे. याआधी २००१ कोलकाता कसोटीत भारताने १७८ धावा ठोकल्या होत्या. मागच्या २० वर्षांत कोणत्याही डावात ऑस्ट्रेलियाने टाकलेली ही सर्वाधिक षटके आहेत.
- भारताने कसोटीत २१० षटके खेळून काढली. कसोटीच्या इतिहासात भारताची ही चौथी प्रदीर्घ इनिंग ठरली.
- कसोटीच्या इतिहासात प्रथमच दोन्ही संघाच्या तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या फलंदाजाने ३०० पेक्षा अधिक चेंडू खेळून काढण्याचा विक्रम घडला. ऑस्ट्रेलियाकडून स्मिथने तिसऱ्या क्रमांकावर ३६१ चेंडू खेळले, तर भारताकडून पुजाराने ५२५ चेंडू खेळून काढले.
धावफलक
आॅस्ट्रेलिया पहिला डाव ४५१ धावा.
भारत पहिला डाव धावा चेंडू ४ ६
(कालच्या ६ बाद ३६० धावांवरुन पुढे)
पुजारा झे. मॅक्सवेल गो. लॉयन २०२ ५२५ २१ ०
साहा झे. मॅक्सवेल गो. ओकिफे ११७ २३३ ०८ १
रवींद्र जडेजा नाबाद ५४ ५५ ०५ १
उमेश झे. वॉर्नर गो. ओकिफे १६ ३३ ०२ ०
इशांत शर्मा नाबाद ०० ०४ ०० ०

अवांतर : १९. एकूण : २१० षटकांत ९ बाद ६०३ धावा. डाव घोषीत. गडी बाद होण्याचा क्रम : १-९१, २-१९३, ३-२२५, ४-२७६, ५-३२०, ६-३२८, ७-५२७, ८-५४१, ९-५९५. गोलंदाजी : जोश हेझलवूड ४४-१०-१०३-१, पॅट कमिन्स ३९-१०-१०६-४, स्टिव ओकिफे ७७-१७-१९९-१, नॅथन लॉयन ४६-२-१६३-१, ग्लेन मॅक्सवेल ४-०-१३-१.
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव धावा चेंडू ४ ६
वॉर्नर त्रि.गो. जडेजा १४ १६ ०३ ०
रेनशॉ नाबाद ०७ २१ ०१ ०
लॉयन त्रि. गो.जडेजा ०२ ०७ ०० ०
अवांतर : ०. एकूण : ७.२ षटकांत २ बाद २३ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-१७, २-२३. गोलंदाजी : आर. अश्विन ४-०-१७-०, रवींद्र जडेजा ३.२-१-६-२.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended