» England Won Series Against Newzealand

इंग्लंड टीमने न्यूझीलंडविरुद्ध मालिका जिंकली

वृत्तसंस्था | Feb 16, 2013, 09:46 AM IST

  • इंग्लंड टीमने न्यूझीलंडविरुद्ध मालिका जिंकली

वेलिंग्टन - इंग्लंडने शुक्रवारी न्यूझीलंडवर मालिका विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने तीन टी-20 सामन्यांची मालिका 2-1 ने खिशात घातली. शेवटच्या व तिस-या सामन्यात इंग्लंड टीमने न्यूझीलंडचा 10 गडी व 44 चेंडू राखून पराभव केला. मायकल लंब (53) व अ‍ॅलेक्स हेल्स (80) यांच्या अभेद्य 143 धावांच्या भागीदारीच्या बळावर इंग्लंडने बाजी मारली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 8 बाद 139 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 12.4 षटकांत लक्ष्य गाठले.

लंब-हेल्सची अभेद्य भागीदारी- धावांचा पाठलाग करताना सलामीवीर मायकल लंब व अ‍ॅलेक्स हेल्सने इंग्लंडला दमदार सुरुवात करून दिली. किवीच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत या जोडीने अभेद्य 143 धावांची भागीदारी केली. 12.4 षटकांत या दोघांनी तुफानी फटकेबाजी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. लंबने 34 चेंडूंत नाबाद 53 धावा काढल्या. त्याला साथ देणा-या हेल्सने 42 चेंडूंत नाबाद 80 धावा काढल्या. यासाठी त्याने 9 चौकार व 4 षटकार ठोकले.

गुप्तिलचे अर्धशतक व्यर्थ
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणा-या न्यूझीलंडकडून मार्टिन गुप्तिलने (59) केलेली अर्धशतकाची खेळी व्यर्थ ठरली. त्याने 55 चेंडूंत दोन चौकार व 1 षटकाराच्या साहाय्याने 59 धावा काढून संघाच्या धावसंख्येला गती दिली. सलामीवीर रुदरफोर्ड 11 धावा काढून तंबूत परतला. कर्णधार मॅक्युलम (26), एलियट (15), जेम्स फ्रॉकलिन (15) यांनीही चांगली खेळी केली. गोलंदाजीत इंग्लंडच्या ब्रॉड व डर्नबचने प्रत्येकी तीन बळी घेतले. ट्रेडवेल व रूटला प्रत्येकी एक बळी घेता आला.

Next Article

Recommended