आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास चालू आहे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगाच्या पाठीवर वर्ण, धर्म, भाषा, संस्कृती जरी बदलत जाणारी असली तरी मानवी प्रवृत्ती मात्र सारख्याच असतात आणि म्हणूनच गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे म्हणजे काही अमुक एका देशाचीच मक्तेदारी असं काही नाही. आता गुन्हेगार आले म्हणजे त्यांचा शोध आलाच. त्यांचा शोध अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने, आधुनिक तत्त्वावर निरनिराळ्या माध्यमांमधून घेणं ही काळाची गरज होऊ लागली आहे. म्हणूनच फोरेन्सिक सायन्ससारखं दालन आपल्यापुढे उभं राहू शकलं. फोरेन्सिकचा खरा अर्थ कायद्याच्या बाजूने जाणारा असा घेतला जाऊ शकतो. न्यायालयामध्ये गुन्हा सिद्ध करताना पुरावा सादर करण्यासाठी फोरेन्सिक एक्स्पर्टने दिलेला शेरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गुन्हा केल्यानंतर गुन्हेगाराचे हातांचे ठसे विविध वस्तूंवर, कागदपत्रांवर पडण्याची शक्यता असते तेव्हा अशा ठशांमधून किंवा त्या नमुन्यांवरून गुन्हेगाराचा तपास करणं सुलभ होऊ शकतं. आपल्याकडे भारतामध्ये गेल्या काही वर्षांपासूनच फोरेन्सिक सायन्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. याचे दोन अर्थ निघू शकतात. एक म्हणजे गुन्हेगारीचे प्रमाण तुलनेने वाढलेले आहे आणि दुसरे म्हणजे तेवढ्याच प्रमाणात आपल्याकडील सुरक्षा यंत्रणा अधिकाधिक सक्षम होत आहे. मग या सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत करिअरचे एक नवे दालन तयार झाले आहे. काहीतरी हटके, वेगळं, आव्हानात्मक करायची प्रत्येकाचीच कुठेतरी एक सुप्त इच्छा असते, पण ब-याचदा पुरेशा संधी मिळत नाही किंवा संधी समोर दिसत असली तरी त्याबद्दलची जागरुकता तेवढीशी नसते. अशा परिस्थितीमध्ये करिअर म्हणून फोरेन्सिक सायन्सची निवड करायला काहीच हरकत नाही. मुख्य म्हणजे स्त्री-पुरुष असा भेदभाव यात नाही. त्यामुळे ज्यांना इच्छा आहे, आवड आहे, वेगळं करण्याची, शिकण्याची, सामाजिक सुधारणांमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी अवश्य या क्षेत्रामध्ये यावं. या क्षेत्रासाठी शिक्षणाची तशी फारशी अट नाही. फक्त कुठल्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी इथे पात्र ठरू शकतात.
एक किंवा दोन वर्षांचा पदव्युत्तर चालणारा कोर्स काही वर्षांपर्यंत पूर्ण वेळ होता. म्हणजेच रेग्युलर किंवा नियमित कॉलेजला जावं लागणं, हजेरी किमान 80 टक्के तरी लावायलाच हवी अशा पद्धतीची शिस्त असणं यामुळे अर्थार्जनासाठी अर्धवेळ काम करणा-या मुलांना मात्र या कोर्सपासून वंचित राहावं लागत असे, पण सुदैवाने भारतामधील काही विद्यापीठांमध्ये दुरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा या कोर्सची सोय केली गेली आहे. खरं तर आयएफएस अर्थात इंटरनॅशनल फोरेन्सिक सायन्स ही अशी एक संस्था आहे जिथे फोरेन्सिकचे ऑनलाइन कोर्सेस चालतात. संपूर्ण भारतामधली ही एकमेव प्रमुख संस्था आहे की जिथून ऑनलाइन अभ्यासक्रम चालू करण्यात आला. येत्या काही वर्षांमध्ये ब-याचशा विद्यापीठांमध्ये सुद्धा कदाचित ऑनलाइन अभ्यासक्रम येईल, परंतु सध्या तरी आयएफएसचे अत्यंत उपयुक्त आणि करिअरला वेगळीच कलाटणी देणारे कोर्सेस आहेत. सर्टिफिकेट कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस, अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इत्यादीसारखे अनेक उपयुक्त कोर्सेस आहेत. विद्यार्थ्यांना पुढे किती व कसं शिकायचंय यावर हे कोर्सेस उपलब्ध असतात. शिवाय हा कोर्स पूर्ण केल्यानंतर भारतामधील सरकारी, निमसरकारी, गैरसरकारी, खासगी कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध होऊ शकते. पोलिस महामंडळ किंवा गुन्हेगारी शाखा, खासगी डिटेक्टिव्ह फर्म्स अशा ब-याच ठिकाणी नोकरीच्या उत्तम संधी मिळू शकतात.
आयएफएस अर्थात इंटरनॅशनल फोरेन्सिक सायन्सचा शैक्षणिक विभाग हे कोर्सेस चालवतो. भारत सरकार तसेच महाराष्टÑ राज्यातून मान्यताप्राप्त, नोंदणीकृत झालेली ही संस्था आहे त्यामुळे इथून मिळणा-या सर्टिफिकेटला सगळीकडे मान्यता प्राप्त झालेली आहे. महाराष्‍ट्रामध्ये धनकवडी पुणे इथे आयएफएसचे कार्यालय असून support@forensic.co.in किंवा education@forensic.co.in या ई-मेलवर संपर्क साधल्यास विस्तृत माहिती प्राप्त होऊ शकेल. भारतामध्ये उत्तर प्रदेशातील झाशी येथील बुंदेलखंड युनिव्हर्सिटी, हैदराबाद येथील उस्मानिया युनिव्हर्सिटी, गुजरात युनिव्हर्सिटी, मद्रास युनिव्हर्सिटी या ठिकाणी हा कोर्स राबवला जातो. तुम्ही तपास केल्यास तुम्हाला आणखी विद्यापीठांचा पत्ता निश्चितच लागेल.