आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सत्‍यमेव जयते'मधुन यावेळी आमिरने मांडली हुंड्याची समस्‍या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'सत्‍यमेव जयते'च्‍या तिस-या भागात आमिर खान समोर आला तो समाजाला लागलेल्‍या आणखी एका किडीची समस्‍या घेऊन... ती म्‍हणजे 'हुंडा'. या भागातून आमिरने हुंड्याच्‍या प्रश्‍नाकडे समाजाचे लक्ष वेधण्‍याचा प्रयत्‍न केला.
आजच्‍या भागाच्‍या सुरुवातीला दिल्‍लीच्‍या कोमलने तिची व्‍यथा मांडली. कोमलच्‍या वडिलांनी राजेशाही थाटात लग्‍न लावून दिले. परंतु, अमेरिकेतील नव-याने तिचे जगणे मुश्किल करुन सोडले. कोमलने सांगितले, सुरुवातीला मुलाकडच्‍यांनी अतिशय सोज्‍वळपणा दाखविला. परंतु, हळूहळू त्‍यांच्‍याकडून मागण्‍यांना सुरुवात झाली. लग्‍न मंडपात बोहल्‍यावर चढायच्‍या क्षणी वरपित्‍याने सोनसाखळीची मागणी केली. त्‍याशिवाय वर मंडपात चढणार नाही, असा ताव दाखविला. माझ्या वडिलांनी ऐनवेळी करण्‍यात आलेली ती मागणी कशीतरी पूर्ण केली. त्‍यानंतर सासरी गेल्‍यावर सासरच्‍यांनी माझ्या घरच्‍यांनी दिलेल्‍या भेटवस्‍तूंची खिल्‍ली उडविणे सुरु केले. माझ्या आईने समजाविले होते की, काहीही झाले तरी भांडून, वाद करुन घरी येऊ नको. म्‍हणून मी गप्‍प राहिले. परंतु, सासरच्‍यांच्‍या मागण्‍या वाढतच होत्‍या. अमेरिकेला जाण्‍यासाठी माझ्या पतीने वडिलांना तिकीटासाठी पैसे मागितले. परंतु, तिकीटाचे पैसे तर त्‍याला त्‍याच्‍या कंपनीनेच दिले होते. अमेरिकेत गेल्‍यानंतरही त्‍यांच्‍या मागण्‍या कमी होत नव्‍हत्‍या. माझा छळ करणे सुरु केले. पती फक्त स्‍वतःचाच विचार करायचा. मी पुरेसे जेवतही नव्‍हती. त्‍यामुळे माझे वजन 36 किलोंपर्यंत घटले. त्‍यांना वार्षिक 35 लाख रुपये पगार होता. परंतु, त्‍यांना प्रत्‍येक वस्‍तू माझ्या वडिलांकडूनच हवी होती. लग्‍नाच्‍या पुर्वी कारची मागणी केली होती. त्‍यासाठी 7 लाख रुपये रोख दिले होते. परंतु, अमेरिकेत गेल्‍यावरही कारची मागणी करु लागले. मला तर मोलकरणीचाच दर्जा दिला होता. माझ्या वडिलांना त्‍यांनी स्‍वतःचे घर देण्‍याची नवीच मागणी केली. त्‍यावेळी मी विरोध केला. विरोध केल्‍यानंतर तर त्‍यांनी चक्‍क माझा गळा दाबला. मला 4 दिवस उपाशी ठेवले. अखेर मी तिथल्‍या महिला सेलला संपर्क करुन मदत मागितली. त्‍यांनी मदत करुन मला आईवडीलांकडे पाठविले.