आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि गोपीनाथ मुंडेंचा चालक मुरली बनला गायक

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारणातले बडे प्रस्थ असलेल्या नेत्याच्या गाडीवर चालकाचे काम करणारा एक सर्वसामान्य माणूस चक्क गायक बनला. मुळात आवड असेल तर सुप्त गुण कधी ना कधी उफाळून येतात.
ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीवर चालक असलेला मुरली कुटे हा दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर गायक झाला. लहानपणीची आवडच त्याच्या चरितार्थाचे साधन बनली आहे. त्याने स्वत:चे सात अल्बम काढले आहेत. मुरलीच्या सुरावटीची चाल कानावर पडावी म्हणून आता पंचक्रोशीतले लोक गर्दी करतात. हा मुरली मुळचा औरंगाबाद जिल्ह्यातील चौका गावचा रहिवासी. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात तो बारावीपर्यंत शिकला नंतर आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने जास्त शिक्षणाच्या मागे न लागता त्याने ड्रायव्हिंगची कला मित्राच्या गाडीवरच अवगत केली. प्रसिद्ध उद्योजक विवेक देशपांडे व माजी आमदार श्रीकांत जोशी यांच्या गाडीवर तो योगायोगानेच चालक म्हणून लागला. एकदा भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांना आणण्यासाठी मुरलीला जावे लागले. पुढे तो अनेकदा त्याने मुंडे यांच्यासाठी गाडी चालवली. त्याचा प्रामाणिकपणा व गाडी चालवण्याचे कसब पाहून मुंडे यांनी मुरली याला स्वत:च्या गाडीचा चालक म्हणून नेमले आणि मुरलीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. २००० पासून तो मुंडे यांची १२१२ नंबरची मर्सिडीज गाडी चालवतो.
मुंडेंची मदत- मुंडे औरंगाबादला आले की, आपल्या गायक मुरलीची आवर्जून चौकशी करतात. बीड येथील संत भगवान बाबा यांच्यावर मुरलीने भक्तिगीतांची एक व्हिडिओ सीडी तयार केली आहे. त्यासाठी मुंडे यांनी एक लाख रुपयांची मदत केल्याचेही मुरली सांगतो.
गाण्याची आवड बालपणापासूनच
मुरलीला बालपणापासूनच गाण्याचा छंद होता. गावाकडे अनेक कार्यक्रम गाजवलेला हा गडी मोटार ड्रायव्हिंगसारख्या रुक्ष क्षेत्रात आला खरा; पण त्याचे एक मन त्याला सतत गाण्याकडे ओढत असे. गाडीवर कोणी नसले की मुरली मोठ्या आवाजात भक्तिगीतं, भावगीतं म्हणायचा. सोबतच्या मित्रांनाही मुरलीच्या आवाजात जादू आहे, याची जाणीव झाली. एकदा मुंबईत जाऊन स्वत: रचलेल्या गीतांना मुरलीने चाली लावल्या अन चक्क गोपीनाथ मुंडे यांच्यावरच गाण्यांचा अल्बम काढला. मुंडेंंना मात्र तोवर मुरलीची ही कला माहीतच नव्हती. दुस-या एका चालकाने मुंडे यांना ही सी.डी. ऐकवली. मुरलीची कला पाहून खुद्द गोपीनाथ मुंडे यांनाही खूप आनंद झाला एकदा ते मुरलीसाठी त्याच्यासोबत मुंबईला स्टुडिओतही जाऊन आले. आता मुरली पूर्णवेळ गायन करतो. त्याने स्वत:चा आॅर्केस्ट्रा काढलाय. प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना दीपाली सय्यद, वर्षा उसगावकरसोबतही त्याने अनेक कार्यक्रम केले आहेत. एवढे यश मिळवूनही जमिनीवर पाय असलेला मुरली मुंडे यांचे सतत आभार मानतो.