आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिग्दर्शक व्हायचे स्वप्न पूर्ण झाले'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'झुलवा', 'ती फुलराणी', 'कथा अरुणाची' यांसारखी लक्षवेधी नाटके आणि 'नॉट ओन्ली मिसेस राऊत', 'नटरंग', 'पारध' अशा तब्बल पंचवीसहून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजे मिलिंद शिंदे. मिलिंद मुळचा अहमदनगरचा. शालेय जीवनापासून अभिनयाची आवड असणारा मिलिंद अभिनेता म्हणून चांगला नावारुपास आला आहे. मिलिंदने दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनय तसेच दिग्दर्शनाचे धडे गिरविले आहेत. अभिनेता म्हणून नावारुपास आल्यानंतर आता मिलिंद दिग्दर्शकही बनला आहे. 'नाच तुझंच लगीन हाय' हा मिलिंदने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. एक अभिनेता म्हणून स्थिरस्थावर होत असताना अचानक दिग्दर्शनाकडे वळल्याबद्दल मिलिंदने सांगितले की, मुळात मला दिग्दर्शनाची खूप आवड होती. मी मूळचा नगरचा असल्यामुळे तेथील सर्वजण मला दिग्दर्शक म्हणूनच ओळखतात. काही नाटकांचे दिग्दर्शन मी केले आहे. एफटीआयमध्ये एक वर्षाचा दिग्दर्शनाचा बेसिक कोर्स शिकलो आहे. परंतु इथे आल्यानंतर मला माझे पहिले नाटक मिळाले. वामन केंद्रे यांचे 'ती फुलराणी' हे माझे पहिले नाटक आहे. या नाटकानंतर गजेंद्र अहिरेचा 'नॉट ऑन्ली मिसेस राऊत' हा सिनेमा केला. त्यानंतर सगळे मला कलाकार म्हणून ओळखू लागले आणि एकापाठोपाठ एक ऑफर मिळू लागल्या. त्यामुळे दिग्दर्शनाची आवड थोडीशी बाजुला सारावी लागली. मुळात माझा पिंडच दिग्दर्शनाचा आहे. मात्र अभिनय ही माझी मुख्य बाजारपेठ आहे. तिला मी कधीही विसरू शकणार नाही. पहिले प्राधान्य मी अभिनयालाच देतो. मात्र मला माझ्या सिनेमासाठी चांगला निर्माता मिळाल्यामुळे माझे दिग्दर्शक व्हायचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे मी चित्रपट दिग्दर्शक बनलो. तब्बल दहा वर्षांपासून या चित्रपटाचा विचार माझ्या मनात होता. सिनेमाचे ड्राफ्टही खूप आधीच तयार करुन ठेवले असल्याचे मिलिंद सांगतो.'नाच तुझंच लगीन हाय' या चित्रपटात स्वतः मिलिंदनेही काम केले आहे. मिलिंदशिवाय सुरेश शिंदे, छाया कदम, नम्रता आपटे, वैशाली साळवी या एफटीआयच्या कलाकारांनीही या सिनेमात काम केले आहे. सिनेमाबद्दल सांगताना मिलिंद म्हणाला की, या चित्रपटाची कथा स्मशानभूमीत काम करणा-या कुटुंबाभोवती फिरणारी आहे. त्यांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी अतिशय गंभीर असते. कठीण परिस्थितीला हे कुटुंब कसे तोंड देतात, समाजाबद्दल त्यांची मानसिकता काय तयार होते हे या चित्रपटाचं कथासूत्र आहे. यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात हा सिनेमा रिलीज करण्याचा मिलिंदचा विचार आहे. विशेष म्हणजे 'नाच तुझचं लगीन हाय' या सिनेमानंतर आणखी एक सिनेमा दिग्दर्शित करण्याच्या विचारात मिलिंद शिंदे आहे, मात्र या सिनेमात मिलिंदने स्वतः अभिनय करणार नसल्याचे ठरवले आहे.यावर्षी मिलिंदचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'बाबू बॅण्ड बाजा' हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्याला सर्व स्तरातून पसंतीची पावती मिळत आहे. आता मिलिंदचे तब्बल पाच चित्रपट यावर्षी रिलीजच्या मार्गावर आहेत. 'डोंबारी' या सिनेमात मिलिंद डोंबा-याच्या भूमिकेत झळकणार आहे. शिवाय 'घाणवट' हा आणखी एक वेगळ्या धाटणीचा सिनेमाही रिलीजच्या मार्गावर आहे. या सिनेमाविषयी मिलिंदने सांगितले की, पारधी समाजावर या सिनेमात प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. कर्जापायी बायकोला गहाण ठेवणा-या व्यक्तीची भूमिका मिलिंदने या सिनेमात साकारली आहे. या सिनेमात मिलिंदबरोबर आदिती सारंगधर झळकणार आहे.नायकाबरोबर खलनायकाच्या रुपातही मिलिंदचं दर्शन घडणार आहे. 'ईश्वरी' या आगामी मराठी सिनेमात गावातल्या सावकाराची ग्रे शेड असलेली भूमिका मिलिंदने साकारली आहे. शिवाय हिंदी सिनेमातही व्हिलनच्या भूमिकेत तो झळकणार आहे.विनोदी भूमिकांपेक्षा गंभीर धाटणीच्या भूमिका करण्यावर मिलिंद जास्त भर देतो. रंगभूमी असो, मोठा पडदा किंवा छोटा पडदा या सगळ्या माध्यमांमध्ये मिलिंदने साकारलेल्या भूमिका गंभीर धाटणीच्या आहेत.मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळण्याचा विचारही मिलिंदने केला आहे.