आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर इंडियाच्या महाराजावर 454 कोटी सेवा कराचा बोजा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अनेक अडचणींची घरघर मागे लागलेल्या एअर इंडिया या सरकारी विमान वाहतूक कंपनीवरील सेवा कराचा बोजा 454 कोटींपर्यंत वाढला आहे. एअर इंडियाकडून हा कर लवकरच भरण्यात येईल, असे स्पष्टीकरण आले आहे. विशेष म्हणजे, विविध कर आणि शुल्कांच्या थकबाकीपोटी पाच महिन्यांपूर्वी एअर इंडियाची सर्व खाती गोठवण्यात आली होती. कर्जाचा बोजा, सेवा कराची वाढती थकबाकी त्यातच पायलटांचा संप यामुळे कधीकाळी दिमाखाने आसमंतात विहार करणार्‍या एअर इंडियाच्या महाराजाची मान खाली गेली आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या एअर इंडियावर 395 कोटी रुपयांचा सेवा कर थकलेला आहे. त्यावर 15 टक्के व्याज आकारून त्याची वसुली केली जाणार आहे. सरकारकडून भांडवलाचा पुरवठा झाली की, लगेच सर्व देणी फेडण्यात येणार असल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात येत आहे. थकलेल्या सेवा करावर 15 टक्के व्याज लावल्यास हा बोजा 454 कोटी रुपयांवर जातो.
गेल्या महिन्यातच एअर इंडियासाठी 30 हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा सरकारने केली होती. हा मदत निधी आगामी नऊ वर्षांत वेगवेगळ्या टप्प्यांत देण्यात येणार आहे. सूत्रांनी सांगितले की, सरकारकडून कंपनीला जसजसा निधी येईल त्याप्रमाणे एअर इंडिया आपल्या देणेदारांचे देणे देणार आहे.
कर भरणा न केल्यामुळे डिसेंबर 2011 मध्ये केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळाने (सीबीईसी) एअर इंडियाची 11 बँक खाती गोठवली होती. त्याच वेळी विजय मल्या यांच्या किंगफिशरकडे 50 कोटी रुपयांचा कर थकला होता. त्यामुळे किंगफिशर एअरलाइन्सची 10 बँक खाती घोठवण्यात आली होती. लवकरच ही रक्कम फेडण्याच्या आश्वासनानंतर ही खाती पुन्हा खुली करण्यात आली होती.