आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत सोने 30,420 या आजवरच्या विक्रमी पातळीवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सकारात्मक जागतिक संकेत आणि लग्नसराई यामुळे मागणी वाढल्याने सोन्यात मोठी तेजी आली. तेजीच्या झळाळीने तोळ्यामागे 270 रुपयांची वाढ होऊन सोन्याने 30,420 ही आतापर्यंतची उच्चांकी भावपातळी गाठली. मुंबई सराफ्यातही सोन्याच्या भावात तोळ्यामागे 270 रुपयांची वाढ होऊन भाव 30,100 रुपयांवर पोहोचले.
मागणीमुळे देशभरातील सराफ्यात सोने तेजीत होते. कोलकाता, चेन्नई सराफ्यात सोन्याच्या भावात तोळ्यामागे 255 रुपयांची वाढ दिसून आली. तेथे भाव अनुक्रमे 30,300 रुपये आणि 30,240 रुपये प्रतितोळा झाले. ज्वेलर्स आणि स्टॉकिस्ट्सकडून प्रचंड मागणी आल्याने सोन्याची झळाळी अधिकच वाढल्याचे सराफांनी सांगितले. त्यातच जागतिक बाजारातही सोन्याचे भाव चढेच राहिल्याने देशातील तेजीला अधिकच बळ मिळाले.
युरोच्या तुलनेत डॉलर कमजोर झाल्याने गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा पुन्हा सोन्याकडे वळवल्याचे चित्र आहे. लंडन बाजारात सोन्याच्या भावात 0.2 टक्के वाढ होऊन भाव औंसमागे 1613.29 डॉलर्सवर पोहोचले. वायदा बाजारातही सोने तेजीत राहिले. आॅक्टोबर डिलिव्हरीसाठीच्या सौद्यात सोने 0.14 वधारून प्रतितोळा 30,340 रुपयांवर आले. औद्योगिक क्षेत्रातून चांगली मागणी आल्याने चांदीही तेजीने चकाकली. चांदीचे भाव किलोमागे 600 रुपयांनी वाढून 55,600 रुपयांवर पोहोचले.
औरंगाबादेत सोने 30,600 - देशभरातील सोन्यातील तेजीचे प्रत्यंतर औरंगाबादेतही दिसून आले. येथे सोन्याच्या भावात तोळ्यामागे 200 रुपयांची वाढ होऊन भाव 30,600 रुपयांवर पोहोचले. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळेच सोने झळाळल्याचे राज्य सराफा महामंडळाचे संचालक दत्ता सावंत यांनी सांगितले. आगामी काळात सोन्यात थोडी तेजी दिसून येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.