आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपयाचे अवमूल्यन: सोने होणार स्वस्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: गेल्या सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या किमतीत पुन्हा थोडीशी वाढ झाली आहे. काही सराफांनी खालच्या पातळीवर केलेली खरेदी तसेच किरकोळ खरेदीदारांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव किरकोळ 15 रुपयांनी वाढून 28, 400 रुपयांवर गेला आहे; परंतु जागतिक बाजारात अन्य चलनांच्या तुलनेत डॉलर सशक्त होत असल्याने गुंतवणूकदारांनी सोने विकून चांगला परतावा मिळण्यासाठी अमेरिकन रोख्यांची खरेदी करणे पसंत केले आहे. याचा परिणाम भारतीय बाजारावर होऊन सोन्याच्या किमती येणार्‍या काळात किमान 500 रुपयांनी कमी होण्याचा अंदाज बुलियनतज्ज्ञ अश्विन देरासरी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.
अर्थमंत्र्यांनी सोन्याच्या दागिन्यांवरील अबकारी कर कमी करूनही त्याचा फारसा फायदा झालेला नाही, कारण युरोझोनच्या आर्थिक समस्येने पुन्हा डोके वर काढल्यामुळे ग्रीसमधील राजकीय अनिश्चिततेची वाढती भीती गुंतवणूकदारांना जास्त सतावत आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याची मानसिकता बदलत आहे. इतर चलनांच्या तुलनेत डॉलर बळकट होत असल्याने गुंतवणूकदारांनी आणि साठेबाजांनी सोने विक्रीवर भर दिला आहे.

लग्नसराईचा हंगाम जवळपास संपल्यामुळे सोन्याची मागणी कमी झाली आहे. सध्या ग्राहक सोने विकत असले तरी चढय़ा भावामुळे खरेदी करणारा ग्राहक नाही. त्यामुळे सलग चार आठवडे सराफ बाजारात आलेल्या विक्रमी तेजीनंतर आता सराफ बाजारात सोन्याची झळाळी फिकी पडली आहे. त्यामुळे येत्या 10 जूनपर्यंत सोन्याचा भाव 27,200 रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे; पण दिवाळीनंतर सोन्याचा भाव पुन्हा 30 हजार रुपयांपर्यंत जाणार असल्याने ग्राहकांना या कमी होणार्‍या किमतीला सोने खरेदी करण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे ग्राहकांनी किमान एक ग्रॅम तरी सोने खरेदी करावे, असेही देरासरी यांनी सांगितले. मागील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत 90 टन सोने आयात झाले होते; परंतु चढय़ा भावामुळे सोने खरेदी करणे ग्राहकांनी टाळल्याने यंदा पहिल्या तिमाहीत केवळ 17 टन सोने आयात झाल्याकडे देरासरी यांनी लक्ष वेधले. केवळ सोनेच नाही, तर औद्योगिक मागणी घटल्यामुळे चांदीचे भावही गडगडले आहेत.