आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने गुंतवणुकीला येणार सोन्याचे दिवस

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सोन्याच्या भावाने अलीकडच्या काळात अनेक विक्रम स्थापन केले आहेत. तेजीने दिवसेंदिवस सोने झळाळत चालले आहे. अनेक गुंतवणूकदार या तेजीमुळे सोन्यापासून दूर जाताहेत, मात्र या गुंतवणूकदारांना पुन्हा एकवार विचार करायला लावणारा एक अहवाल फोर्ब्जने जाहीर केला आहे. जगातील दिग्गज देशांसह अनेक देश सध्या आर्थिक हलाखीत आहेत. त्यामुळे सोन्याला खरोखरच सोन्याचे दिवस येणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. सोन्यासारखा परतावा तुम्हाला इतर कोणत्याही साधनातून मिळणार नाही, असे या अहवालात आवर्जून नमूद केले आहे.
या अहवालानुसार, सोन्यात सध्या दिसणारी तेजी आगामी काळातही अशीच सुरू राहील. अमेरिका आणि युरोपातील वित्तीय संकटाचे ढग आणखी दाट होत आहेत. युरोपातील अनेक देश आर्थिक संकटात आहेत. युरोपातील जर्मनी आणि फ्रान्ससारख्या दिग्गज देशांनाही कर्ज संकटाची झळ बसली आहे. आता तर युरोपातील परिस्थिती एवढी चिघळली आहे की, युरोपीय समुदायाचे (युरोझोन) चलन युरोवरही आता प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. युरोपला या संकटातून उभारी घेण्यास मोठा कालावधी लागणार आहे. यामुळे गुतंवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळत आहेत. या पिवळ्या धातूने गुंतवणूकदारांना चांगलीच मोहिनी घातली आहे. युरोपएवढी गंभीर नसली तरी आर्थिक हलाखीची स्थिती जगभर आहे. यामुळे आगामी काळातही गुतंवणूकदार सोन्यालाच प्राधान्य देणार आहेत. त्यामुळे सोन्यातील गुंतवणुकीद्वारे मिळणारा परतावा वाढणार आहे.
वाढत्या महागाईमुळेही सोन्यात दीर्घकाल तेजी दिसून येत आहे, असे मत अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. भारतासह अनेक देशांत महागाईचा आगडोंब उसळल्यानंतर गुंतवणूकदारांनी सोने खरेदीस प्राधान्य दिले आहे. गुंतवणूकदारांचा हा कल आगामी कालातही तसाच राहणार आहे. सोन्यातील तेजीला चीनने मोठा हात दिला आहे. चीनमध्ये ग्राहकांकडून सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ होत आहे. यंदा चीनमधील सोन्याच्या मागणीने 612 टनाचा आकडा पार केला आहे. याबरोबरच चीनने 2010 मधील सोन्याच्या खपाची पातळी ओलांडली आहे. देशाअंतर्गत मागणी वाढल्याने चीनमध्ये सोन्याची आयात 400 टनांवर पोहोचण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोन्याच्या मागणीत वाढ होत आहे. यामुळे या आर्थिक वर्षाच्या तिस-या तिमाहीत सोन्याचे भाव प्रतिऔंस सरासरी 1700 डॉलर असे चढे राहिले आहेत. गेल्या वर्षी याच काळातील किमतीपेक्षा हे भाव 39 टक्के अधिक आहेत. यंदाच्या दुस-या तिमाहीच्या तुलनेत हे भाव 13 टक्के अधिक आहेत. भारतातही नोव्हेंबर 2010 मध्ये 20,381 रुपये प्रतितोळा असणारे भाव यंदा 28 हजारांच्या वर आहेत.