आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maruti Suzuki Q2 Profit Down 59.8%, Board Approves Gujarat Plant ‎

मारुती-सुझुकीची झेप गुजरातमध्ये

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मोटार निर्मिती उद्योगात आघाडीवर असलेल्या मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीने आपला नवीन मोटार निर्मिती प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेतला. याच बैठकीमध्ये दुस-या तिमाहीतील आर्थिक निकालही जाहीर करण्यात आले.
मारुती सुझुकीने अंदाजे 18 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरवले असून त्यामध्ये गुजरात प्रकल्पातील अ‍ॅन्सिलरी विभागाच्या विस्तारासाठी असलेल्या 6 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा समावेश आहे.
सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे अध्यक्ष ओसामू सुझुकी, मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर. सी. भार्गव आणि व्यवस्थापकीय संचालक शिन्झो नाकानिशी यांनी याअगोदरच गुजरातमध्ये नवीन वाहन उत्पादन प्रकल्प उभारण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा केली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये गुजरातमध्ये तिसरा प्रकल्प उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली. त्यामुळे हरियाणाच्या बाहेर होत असलेली मारुती सुझुकीची पहिलीच मोठी झेप ठरणार आहे.
गुजरातसाठी ही तर नवीन वर्षाची भेट : मुख्यमंत्री मोदी - मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीने आपला नवीन मोटार निर्मिती प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्याचा निर्णय घेतल्याने आनंद झाल्याचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले असून गुजरातसाठी ही नववर्षाची भेट असल्याचे ते म्हणाले.
दुस-या तिमाहीत नफाही घटला - मनेसर प्रकल्पातील कामगारांच्या संपाचा परिणाम कंपनीच्या नफ्यावरही झाला आहे. 30 सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत मारुतीच्या नफ्यामध्ये 59.81 टक्क्यांची घसरण होऊन तो अगोदरच्या वर्षातल्या याच कालावधीतील 598.24 वरून 240.44 कोटी रुपयांवर आला आहे. एकूण उत्पन्नात देखील 14.38 % घसरण होऊन ते 3,13,654 कोटींंवरून 2,52,307 कोटी रुपयांवर आले.