आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौडबंगाली ममता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर्मन तत्त्वज्ञानात ज्याला ‘वेल्टआनशाऊंग’ म्हणतात, म्हणजेच जगाकडे पाहण्याचा सम्यक दृष्टिकोन नावाचा जो प्रकार असतो तो जर एखाद्याच्या ठायी नसेल तर हिमालयाइतके कर्तृत्व असले तरी त्याची किंमत शून्य होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबतीत नेमके हेच झाले आहे. निम्न मध्यमवर्गात जन्म घेऊनही त्यांनी स्वत:चे नेतृत्व तेव्हाच्या काँग्रेस पक्षाला व पक्षाबाहेर कम्युनिस्टांच्या मजबूत तटबंदीला धडका देत सिद्ध केले होते. त्यांच्या तापट व प्रसंगी अतिरेकी स्वभावाकडे दुर्लक्ष करूनही विरोधक त्यांच्या या कर्तृत्वाला सलामच करतात.
मात्र मनुष्याकडे केवळ कर्तृत्वच असून चालत नाही तर कर्तृत्वातून मिळालेले यश पचवण्यासाठी लागणारी क्षमता त्याच्याकडे असावी लागते आणि ती सम्यक दृष्टिकोनातूनच मिळू शकते. प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीला विरोध करून ममतांनी केवळ पश्चिम बंगालमधील जनतेमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात स्वत:चे हसे करून घेतले आहे, ते त्यांच्याकडे नसलेल्या या व्यापक अथवा जागतिक दृष्टीच्या अभावामुळेच. त्यातसुद्धा प्रणवदांऐवजी त्यांनी नाव कुणाचे सुचवावे तर माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे. कलाम यांचे नाव सुचवण्यामागे ममता यांचा नक्की हेतू कोणता आहे, हे केवळ त्यांनाच माहीत असावे. आपल्या देशात टूथपेस्टला ‘कोलगेट’, चॉकलेटला ‘कॅडबरी’ म्हणण्याचा प्रघात आहे. त्याच नियमानुसार कलाम यांनाही बेधडकपणे ‘शास्त्रज्ञ’ म्हणून गौरवण्यात अनेक महाभागांना धन्यता वाटते.
वास्तविक न्यूटन, आइन्स्टाइन वगैरे सोडाच; पण जयंत नारळीकरांनी आजवर जितके विज्ञानाच्या क्षेत्रात योगदान दिले आहे, तितकेही योगदान कलाम यांचे नाही. भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला गती देण्यात त्यांचे योगदान नक्कीच होते. मात्र याचा अर्थ विद्यापीठाचे कुलगुरू होणे व ते पद अत्यंत कार्यकुशलतेने हाताळणे म्हणजे विद्यापीठात शिकवल्या जाणा-या सर्व विषयांमध्ये पारंगत असणे असे नव्हे. कलामांच्या बाबतीत ही अतिशयोक्ती वारंवार केली जात असते. असो. ममता यांचा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा विषय ‘इस्लामिक हिस्ट्री’ हा होता. याचा अर्थ बंगालमध्ये 11 टक्क्यांपेक्षाही अधिक असलेल्या मुस्लिम जनमानसावर, कलाम यांच्या उमेदवारीचा सकारात्मक परिणाम होणार आहे, असे नाही. त्यामुळे दररोज ‘सरस्वती वंदना’ करणा-या कलाम यांच्यामुळे मुस्लिम मतांचे राजकारण करता येणे अशक्य आहे.
मग खुद्द कलाम यांची राष्ट्रपतिपदासाठी उभे राहण्याची तयारी नसताना त्यांचेच नाव घेऊन स्वत:चा हेका कायम ठेवण्याचे कारण काय, हा प्रश्न उरतोच! ममता बॅनर्जी या साधारण 1970 मध्ये राजकारणात आल्या. पश्चिम बंगालमधील काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेत त्या सक्रिय झाल्या. बेधडक व निर्भीड स्वभावामुळे त्या लवकरच संघटनेत लोकप्रिय झाल्या व राजकारणाच्या शिड्या चढू लागल्या. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचे सरकार आल्यानंतर डाव्यांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन बरगा’ व इतर अनेक कल्याणकारी योजनांमुळे बंगालमधील काँग्रेसच्या सरंजामी नेतृत्वाला घरी बसणे भाग पडले होते. एका बाजूला जनतेचा प्रचंड पाठिंबा व दुस-या बाजूला कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची गावपातळीपासून असलेली भक्कम फौज याला तोंड द्यायचे असेल तर ते कम्युनिस्टांच्याच स्टाइलमध्ये द्यावे लागेल, हे काँग्रेस नेतृत्वाला कळत असले तरी वळत नव्हते.
ममतांनी कम्युनिस्टांची लढाऊ वृत्ती, दैनंदिन जीवनातला साधेपणा, प्रामाणिकपणा जसाच्या तसा उचलला. मात्र त्यांनी त्यांचा व्यापक दृष्टिकोन घेतला नाही. 1997 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून ममतांनी ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ची स्थापना करून कम्युनिस्टांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली. सत्ताधारी कम्युनिस्टांबरोबर लढताना अनेकदा बेदम मार खात व कधी मार देत त्या ठामपणे उभ्या राहिल्या. त्यातून बंगाली जनतेत त्यांची प्रतिमा लढाऊ बाण्याच्या नेत्या अशी झाली. मात्र या बाण्याबरोबरच दृष्टिकोनाच्या अभावामुळे त्यांचे संपूर्ण जग स्वत:भोवतीच फिरू लागले. त्यांच्या डोक्यात जे काही येईल तीच त्यांची विचारधारा, त्यांना जाणवतील तेच अत्याचार, त्या म्हणतील तोच प्रामाणिक व बाकी सगळे टुकार असा त्यांचा ठाम समज झाला. त्यांचा हा स्वभाव कालांतराने संपूर्ण देशाच्या समोर आला. मग रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना पश्चिम बंगालसाठी काहीच नाही, असे म्हणत रेल्वेमंत्री रामविलास पासवान यांच्यावर शाल फेकून मारणे, समाजवादी पार्टीचे खासदार अमरसिंग आणि दरोगा प्रसाद सरोज यांची कॉलर खेचणे, असे आक्रस्ताळी प्रकार त्यांनी थेट संसदेतच केले.
कधी एनडीए तर कधी यूपीए अशा बेडूकउड्या मारताना प्रमुख पक्षाला वारंवार अडचणीत आणण्यात त्यांना आसुरी आनंद मिळू लागला. मात्र 2009 च्या लोकसभा निवडणुकीत 19 जागा जिंकल्यावर व 2011 ला थेट विधानसभेत कम्युनिस्टांना चारी मुंड्या चीत केल्यावर ममतांच्या कानात भलतेच वारे शिरले. स्वत:च्याच सरकारच्या धोरणांवर जाहीर टीका करणे, स्वत:च्याच मंत्र्याचा अर्थसंकल्प नाकारणे, स्वत:च्याच सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणे, असे प्रकार नित्याचेच झाले. त्यांनी निवडून आणलेले इतरेजनही इतके खुजे होते की ते ‘दीदी जा बॉलेन शेताई शोत्ती’ म्हणजे ‘दीदी बोलतात तेच खरे’ असे म्हणत त्यांची आरती ओवाळत राहिले. शेवटी प्रणवदांना कडाडून विरोध आणि कलाम यांच्या नावाचा हेका असे टोक त्यांनी गाठले. ममतांची जडणघडण काँग्रेस पक्षातच झालेली आहे.
काँग्रेस कायमचीच बुडून जावी, असा लोहियावाद्यांचा काँग्रेसद्वेष त्यांच्या मनात भरलेला नाही. तरीही त्यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत स्वत:चा हट्ट सोडलेला नाही. सम्यक जागतिक दृष्टिकोन नसला की काय होते हे ममतांच्या वागणुकीतून दिसत आहे. आवडत्या पोपटाच्या मृत्यूनंतर अकबर बादशहाची अवस्था अशी झाली होती. त्यामुळेच त्याला सत्य परिस्थिती सांगण्याचे धाडस कुणाला होत नव्हते. दुर्गेची कृपा होवो आणि ममतादीदींना लवकरच कुणी धाडसी बिरबल मिळो!