आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णांची चळवळ भरकटतेय का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकपाल विधेयक मंजुरीकरिता अण्णा हजारे यांनी सुरू केलेली चळवळ कुठे तरी भरकटत तर चालली नाही ना, असा संभ्रम सध्या सर्वत्र निर्माण झाला आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यात गुंतत या चळवळीतून लोकपाल विधेयकाचा मुद्दा बाजूलाच पडत चालला आहे. टीम अण्णाने पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरच शरसंधान केले; पण पंतप्रधानांची प्रतिमा मलिन झाल्यास त्या गोष्टीचा आर्थिक परिस्थितीवर तसेच जागतिक पातळीवर विपरीत परिणाम होईल, ही बाब विचारातच घेतली गेली नाही. तसेच मंत्रिमंडळातील 15 जणांची चौकशी व्हावी याकरिताही या टीमने आग्रही भूमिका घेतली आहे. दुस-या बाजूला बाबा रामदेव काळ्या पैशांच्या विरोधात रणांगणावर उतरले आहेत. या सर्व बाबींमुळे सामान्य भारतीयांत मात्र चळवळीबद्दल प्रतिकूल मत होत चालले आहे, याचे भान त्यांनी बाळगणे महत्त्वाचे आहे. संपूर्ण क्रांतीची चळवळ लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी सुरू केली. परिणामी कॉँग्रेसेतर पक्ष सत्ताधारी झाले. मात्र, परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. ब-याच वर्षांनंतर भ्रष्टाचाराविरोधात अण्णांंनी रणशिंग फुंकले. चळवळ जोर धरू लागली. मात्र, चळवळीची (अण्णांची) वैचारिक बैठक ठाम नसल्याने जोर ओसरायला वेळ लागला नाही. त्याचाच परिपाक म्हणजे अण्णांनी राज्यभर केलेल्या दौ-याला मिळालेला प्रतिसाद.
अण्णांची सामाजिक प्रतिमा उंचावण्यासाठी शासनाने वेळोवेळी सकारात्मकच भूमिका घेतली, हे अण्णा विसरतात. अण्णांमुळेच माहितीच्या अधिकारासाठीचा कायदा अस्तित्वात आला असला तरी त्यामुळे भ्रष्टाचार निर्मूलनामध्ये कितीसा फरक पडला, हा एक संशोधनाचा विषय आहे. केवळ कायदा आणून भागत नाही तर त्याची अंमलबजावणी होते की नाही, तो कायदा प्रभावीपणे राबवला जातो की नाही, याबाबत अण्णा व त्यांच्या सहका-यांनी अजिबात लक्ष घातलेले नाही. आताच्या चळवळीचेही असेच होत चालले आहे. चळवळीला फाटे फुटत चालले आहेत. केवळ मिरवण्यासाठी ‘मी अण्णा हजारे’ अशी गांधी टोपी घालून कथित चळवळीमध्ये सहभागी होणे उपयोगाचे नाही, तर त्याग भावनेने याबाबत कार्यरत राहणे महत्त्वाचे आहे. केवळ प्रसिद्धी माध्यमांसमोर आपली प्रतिमा यावी याकरिता उलटसुलट वक्तव्य करणे, बेलगाम आरोप करणे हे चळवळीला घातक आहे.
तुम्ही-आम्ही भ्रष्टाचाराबाबत चर्चा, वादविवाद करतो. या चर्चेमध्ये जी माणसे भ्रष्ट आहेत, अर्थात लाच घेतात, लाच देतात, ती माणसे हिरीरीने भाग घेतात. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कायदा आहे. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जो कायदा आहे, त्या कायद्याअंतर्गत ज्या काही न्यायालयीन लढाया झाल्या, त्या अंतर्गत केवळ 7 ते 9 टक्के लोकांना न्यायालयाने दोषी ठरवले. भ्रष्टाचारास केवळ राजकारणी अथवा प्रशासकीय अधिकारी जबाबदार नाहीत, तर आपण भ्रष्टाचाराबाबत तक्रार दाखल करण्यास पुढे येत नाही वा कुठलीही कारवाई करण्यास धजावत नाही. आजपर्यंत लाच देणा-या कुठल्या व्यक्तीला न्यायालयाने दोषी ठरवले आहे? भ्रष्टाचारामध्ये तुम्ही, आम्ही, तपास अधिकारी, तसेच तांत्रिक बाबींचा विचार करून दोषमुक्त करणारे न्यायालयीन अधिकारी जबाबदार आहेत. मात्र, या सर्व बाबी विचारात कोण घेतो? शासनाने बरेच कायदे केलेले आहेत. जमवलेली संपत्ती व ती मिळवण्याचा मार्ग पाहता अवैध मार्गाने संपत्ती जमा झाली असल्यास शासनाला संपत्ती शासनजमा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपण केवळ राजकीय व्यक्तींचा उमेदवारी अर्ज भरताना त्यांचे उत्पन्न प्रसिद्धी माध्यमांद्वारे लक्षात घेतो. शासनाचा आयकर विभाग आहे. मात्र, शासकीय अधिकारी याबाबत आयकर अधिनियमाप्रमाणे योग्य कारवाई का करत नाहीत? परदेशातील काळा पैसा भारतात येईल तो सुदिन. मात्र, आज तमाम राजकीय क्षेत्रातील व्यक्ती व प्रशासनातील अधिकारी यांनी गैरमार्गाने संपत्ती मिळवली आहे, त्यांच्याकडे आयकर विभाग दुर्लक्ष का करतो?
भारताबाहेरील काळा पैसा हा मुद्दा प्रथमत: लालकृष्ण अडवाणी, अ‍ॅड. राम जेठमलानी यांनी उचलून धरला. तोच मुद्दा सध्या रामदेवबाबा राबवत आहेत व त्यांचे आशीर्वाद नितीन गडकरी घेत असल्याचे आपण प्रसिद्धी माध्यमांत बघतोच आहोत. मुळातच रामदेवबाबांनी शासनाचे आर्थिक नुकसान केले असताना त्यांना याबाबत जनजागृती करण्याचा नैतिक अधिकार कोणी दिला? योगविद्येच्या माध्यमातून कोट्यवधींची माया जमवणारे बाबा काळ्या पैशांविरुद्ध आवाज उठवत आहेत. हे हास्यास्पद नाही का? देशात आज नैतिकतेचे अधिष्ठान असलेली व्यक्तीच जनसामान्यांसमोर नाही. त्यांना अण्णांमध्ये काही स्पार्क दिसले. युवावर्गाने भरघोस पाठिंबाही दर्शवला. मात्र, नंतरच्या घडामोडी पाहता त्यांची चळवळ ओस पडू लागली. मूलत: अण्णा हजारे यांना वैचारिक बैठकच नाही. त्यांचे नेतृत्व प्रगल्भ नाही. म्हणूनच सुरुवातीला काही जणांनी त्यांच्या चळवळीला हातभार लावला. मात्र, आज महाराष्‍ट्रातील कुठलीही ख्यातनाम व्यक्ती त्यांच्यासोबत नाही. जोपर्यंत बुद्धिवंत या चळवळीत सहभागी होत नाहीत, तोपर्यंत चळवळ भरकटत राहणार आहे. मात्र, त्यामुळे भविष्यात चांगल्या चळवळी उभ्या राहणार नाहीत, ही धोक्याची घंटा आहे. केवळ काँग्रेसला टार्गेट करून ही चळवळ यशस्वी होणार नाही. ही चळवळ वाईट प्रवृत्तीच्या विरोधात असायला हवी. तिला नैतिकतेचे अधिष्ठान असावे, वैचारिक कोलांटउडी नसावी. आज अण्णांबरोबर प्रशांत भूषण आहेत. त्यांनी काही मंत्र्यांच्या विरोधात, तसेच काश्मीरबद्दल केलेले वक्तव्य त्याचप्रमाणे अलाहाबाद येथील स्थावर मिळकतीबाबतचे कर चुकवण्याचा प्रयत्न पाहता त्यांच्या वक्तव्यास प्रसिद्धी माध्यमांनी कितपत महत्त्व द्यावे हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.
अण्णांनी केवळ लोकपाल विधेयक हाच प्रश्न हाताळावा. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी टीम अण्णांकडून घेतलेल्या मसुद्यावर चर्चा केली ही गोष्ट टीम अण्णा सोइस्कररीत्या विसरतात. देशाच्या लोकशाहीत अण्णांचा विचार व मसुदा लोकसभेने विचारात घेण्याची गरजच काय? तरीही अण्णांच्या काही मुद्द्यांचा शासनाने आपल्या लोकपाल विधेयकात समावेश केला आहे. हे विचारात न घेता टीम अण्णातील सदस्य बेछूट आरोप करत सुटले आहेत. त्यामागील शक्ती कोण, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. केवळ आरोप-प्रत्यारोप करून चळवळीत यश प्राप्त होणार नाही, तर खुल्या मनाने विचारविनिमय करून जनसामान्यांचे हित कसे साधले जाईल याचा गांभीर्याने अण्णांनी विचार करायला हवा. मुळातच वैचारिक बैठक नसल्यास त्याचा गैरफायदा त्यांचे सहकारी घेत आहेत. अण्णांच्या चळवळीची व्याप्ती वाढत का नाही, याचाही विचार होणे गरचेचे आहे. या देशात अराजकता माजावी, देशात अस्थैर्य निर्माण व्हावे याकरता काही शक्ती कार्यरत आहेत, म्हणूनच अण्णा केवळ प्रवृत्तीच्या विरोधात न लढता एकांगीपणे काँग्रेसला लक्ष्य करत आहेत. काहीही असो, देशातील जनता आगामी लोकसभा निवडणुकीत तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत योग्य तो कौल देईल. कारण भारतीय जनता सुज्ञ आहे.