आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंटो समजून घेताना...

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंटोबद्दल काय सांगावे, किती सांगावे आणि का सांगावे, असे प्रश्न त्या सर्वांनाच पडत असतील, ज्यांच्यावर कधी न कधी ही जबाबदारी पडली असेल. मंटो समजून घेणे म्हणजे जीवन समजून घेण्यासारखे आहे. मंटो समजण्यासाठी त्यांचे लिखाण वाचणे आवश्यक आहे आणि ते वाचल्यानंतर मंटो आपोआपच तुमच्या मनावर गारूड करतो. मंटो यांनी आयुष्यभर प्रखर वास्तव मांडणा-या कथा लिहिल्या. सत्याचे दुसरे नावच मंटो आहे.
सत्याबाबत किती लिहिता येईल, काय लिहिता येईल? सत्य तर फक्त सत्यच असते. सत्य ब-याचदा बेचैन करते. मात्र कधी-कधी शांतताही प्रदान करते. 12 एप्रिल 1942 रोजी खुद्द मंटो यांनीच स्वत:बाबत लिहिले होते की, ‘लोक मला ओळखतात, त्यामुळे माझा परिचय करून देण्याची गरज नाही.’ मंटो समजून घेणे म्हणजे त्याचे लिखाण समजून घेणे. म्हणजेच जीवनातील सत्यांशी नजर भिडवणे.
मंटोच्या लिखाणाला विणकाम, शिवणकाम, शिल्प किंवा फोटोग्राफी म्हणता येणार नाही. खरे तर ते चित्रकार होते. समाजाचे वास्तव चित्रण करताना ते जराही संकोचत नसत. त्यांनी जे पाहिले आणि त्यांना जे जाणवले तेच त्यांची लेखणी लिहीत राहिली. कथा रचण्यासाठी अंदाजपंचे गोष्टींचा किंवा कल्पनाविलासाचा आधार त्यांनी कधीच घेतला नाही. उलट डेरे, कोठे, वेश्यागृहे आणि कुजलेल्या गल्लीबोळांतील जीवनानुभवाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणजे मंटोचे साहित्य. मंटोच्या लेखनातून अनेकदा स्टिंग ऑपरेशनचा भास होतो. समाजाचे नागवेपण उजेडात आणण्यासाठी साठ-सत्तर वर्षांपूर्वी एका कथालेखकाने हे स्टिंग ऑपरेशन केले. त्या बदल्यात समाजाने त्यांच्या कथांवर अश्लीलतेचा आरोप करून कोर्टात खेचले. इतके छळले की त्यांचे मानसिक संतुलन ढासळले. काही दिवस वेड्यांसोबत राहून बरे झाल्यानंतर जेव्हा ते बाहेर आले तेव्हा कुणीतरी विचारले की, आता कसे वाटते? मंटोंनी उत्तर दिले की, वेड्यांच्या छोट्या रुग्णालयातून मोठ्या रुग्णालयात आलो, एवढाच फरक आहे. अशी स्पष्टोक्ती मंटोच करू जाणे. कारण चिखलातून कमळ वेचण्यासाठी चिखलातून जावे लागते... आणि मंटोंची नजर कमळांवर नव्हती. ते तर वा-यासारखे होते...सर्वत्र व्यापलेले...!
28 ऑक्टोबर 1951 रोजी सआदत हसन मंटो म्हणाले होते की, मी चालती-बोलती मुंबई आहे. मंटोंचे मुंबईशी जुने नाते होते. तेथील वास्तव्यात त्यांनी अनेक प्रसिद्ध कथा लिहिल्या. मंटो यांनी आपले एक चतुर्थांश आयुष्य मुंबईत घालवले. ते 1937 मध्ये मुंबईत आले आणि 1948 पर्यंत तेथेच राहिले. दरम्यान, 1941 मध्ये सुमारे 16 महिने ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये नोकरी करण्यासाठी ते दिल्लीला आले होते; पण मुंबईच्या प्रेमापुढे एआयआरची आरामशीर नोकरी आणि दिल्लीचे सौंदर्यही त्यांना बांधून ठेवू शकले नाही आणि जेथे रोज नवनव्या कथा जन्म घेत होत्या, अशा मायानगरीत 1942 मध्ये ते पुन्हा परतले. 1948 पर्यंत ते येथे राहिले आणि नंतर पाकिस्तानात निघून गेले. तेथे आयुष्यातील अखेरची काही खळबळजनक वर्षे त्यांनी घालवली. जीवनाचीच चित्तरकथा असलेले कथालेखक म्हणजे मंटो.
मंटो यांचा जन्म 11 मे 1912 रोजी पिढ्यान्पिढ्या बॅरिस्टर असलेल्या कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील स्वत: एक नामवंत बॅरिस्टर आणि सत्र न्यायाधीश होते. लहानपणापासूनच मंटो खूप हुशार, पण खोडकरही होते. हा विख्यात उर्दू कथालेखक प्रवेश परीक्षेत दोनदा नापास झाला आणि उर्दू कच्चे असणे हे त्यामागील कारण होते. गोष्टीवेल्हाळ असल्यामुळेच कदाचित ते आगा हश्र कश्मिरींचे इतके मोठे चाहते होते की त्यांचे नाटक बसवण्यासाठी त्यांनी एक नाटकाचा क्लबही स्थापन केला. मात्र ही धुंदी 10-12 दिवसच राहिली. जालियनवाला बागेतील हत्याकांड 1919 मध्ये झाले. तेव्हा मंटो यांचे वय फक्त 7 वर्षे होते, पण त्यांच्या बालमनावर त्याची गहिरी छाप होती. मंटो स्वतंत्र वृत्तीचे होते आणि स्वातंत्र्य चळवळीत सहभाागी होऊ इच्छित होते; परंतु वडिलांच्या कडक शिस्तीमुळे तसे होऊ शकले नाही. शेवटी त्यांनी साहित्यजगतात क्रांती केली. 42 वर्षे, 8 महिने आणि 7 दिवसांच्या आयुष्यात मंटो यांना लिहिण्यासाठी फक्त 19 वर्षे मिळाली आणि या 19 वर्षांमध्ये त्यांनी 230 कथा, 67 नभोनाट्ये, 22 शब्दचित्रे आणि 70 लेख लिहिले. ही आकडेवारी फारशी महत्त्वाची नाही, तर त्यांनी 60-70 वर्षांपूर्वी जे काही लिहिले, त्यात आजच्या वास्तवाचे प्रतिबिंब दिसते आणि हे वास्तव त्यांनी अशा काही कटू भाषेत व्यक्त केले की, त्यामुळे समाजाचे पुढारपण करणा-यांची झोपच उडाली. परिणामी त्यांच्या पाच कथांवर खटले दाखल करण्यात आले. त्यांची क्रमवार शीर्षके अशी आहेत- ‘काली शलवार’, ‘धुआँ’, ‘बू’, ‘ठंडा गोश्त’ आणि ‘ऊपर नीचे और दरमियां’. या खटल्यांदरम्यान मंटो यांना बरीच मानहानी सोसावी लागली. मात्र त्यांना आपल्या लिखाणाबाबत कधीच पश्चात्ताप झाला नाही.
त्यांची पहिली कथा होती ‘तमाशा’. त्यात जालियनवाला हत्याकांडाकडे एका सात वर्षांच्या मुलाच्या दृष्टीने पाहण्यात आले आहे. त्यानंतर क्रांतिकारी चळवळींच्या प्रभावातून त्यांनी आणखी काही कथा लिहिल्या. 1934 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठात प्रवेश घेतला. मुंबईत मंटो यांनी साहित्यलेखनाशिवाय फिल्मी पत्रकारिता केली आणि चित्रपटांसाठी कथा, पटकथा लिहिल्या. यात ‘अपनी नगरिया’, ‘आठ दिन’ व ‘मिर्झा गालिब’ यांची विशेष चर्चा झाली. फारच कमी लोकांना माहीत असेल की, के. आसिफ आधी ‘अनारकली’ची निर्मिती करीत होते. त्यांच्याबरोबर मंटो यांनी कथेवर बरीच मेहनत घेतली होती. नंतर त्याच थीमवर ‘मुगले आझम’ या नावाने काम सुरू झाले तेव्हा देशाची फाळणी झाली होती. हा एक योगायोगच आहे की, 18 जानेवारी 1955 रोजी लाहोरमध्ये मंटो यांचे निधन झाले तेव्हा त्यांनी लिहिलेला ‘मिर्झा गालिब’ हा चित्रपट दिल्लीत हाउसफुल गर्दी खेचत होता. जागतिक साहित्यातील हे महान व्यक्तिमत्त्व, ज्याचे नाव सआदत हसन मंटो आहे, त्याचे नाते भारताशी आहे यावर विश्वासच बसत नाही. मंटो आपल्यातून कुठेच गेले नाहीत. उलट आपल्या प्रसिद्ध कथांमधील ओळखीच्या पात्रांच्या रूपाने आजही ते आपल्यातच आहेत. ‘काली शलवार’मधील सुल्ताना आणि खुदाबख्श किंवा शंकर आणि मुख्तार. ‘धुआँ’ कथेतील कुलसुम आणि मसऊद यांना कोण विसरू शकेल? ‘बू’मधील रणधीर आणि घाटावरील मुलगी, ‘ठंडा गोश्त’मधील ईशरसिंह आणि कुलवंत कौर किंवा ‘खोल दो’मधील सकीना आणि म्हातारा सिराजुद्दीन ही सर्व पात्रे. आपण एकदा जरी मंटो वाचला तरी हे सर्वजण आयुष्यभर आपल्या मनात घर करून राहतील.
(मंटोच्या आयुष्यातील घटनांची माहिती बलराज मेनरा आणि शरददत्त यांच्या दस्तऐवजावर आधारित आहे.)
w_ajit@dainikbhaskargroup.com