आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाघांवर भारी... सुपारी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

25 वाघांची शिकार करण्याकरिता 40 लाखांची सुपारी दिली, हे वृत्त ऐकले आणि मन अगदी सुन्न झाले! काय म्हणावे याला? सुपारी देणे हे आजपर्यंत मनुष्यजातीपर्यंत मर्यादित (!) होते; परंतु आता प्राण्याच्या जीवाचीही सुपारी दिली जाऊ लागली आहे. पैसा इतका महत्त्वाचा असू शकतो की, मुक्या जनावरांनाही त्याची शिकार करवू शकतो? हो... नक्कीच असावा, तेव्हाच ही सुपारी दिली गेली आणि घेतलीदेखील गेली!
सामान्य नागरिकांना हादरे बसतील असे हे वृत्त ऐकताच महाराष्ट्र सरकारने सर्व व्याघ्र प्रकल्पांना सतर्कतेचा इशारा दिला. अनेक वनाधिका-यांच्या सुट्या रद्द केल्या. पाणवठ्यांवर विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले. वाघांनी पाण्यासाठी जंगलाबाहेर जाऊ नये म्हणून जंगलातच अतिरिक्त पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली. एवढे असूनही हृदय हेलावून टाकणा-या या वृत्ताची लवकरच प्रचीती आली. गेल्या काही दिवसांत तीन वाघ मृत्यमुखी पडले आहेत... नव्हे, त्यांची निर्दयपणे आणि अत्यंत क्रूरतेने शिकार करण्यात आली. 18 मे 2012 रोजी चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ज्या पद्धतीने वाघाला मारले गेले ते ऐकून अंगावर शहारे आले. पूर्ण वाढ झालेल्या या पट्टेदार वाघाचे अक्षरश: 8-10 तुकडे करण्यात आलेले आढळून आले. मुंडके आणि पाय मात्र सापडले नाहीत! किती हे क्रौर्य!!
तसे वाघांचा (अ)नैसर्गिक मृत्यू हा वनाधिका-यांना नवीन नाही! मागील सहा महिन्यांत सात वाघांचा मृत्यू झाला आहे. कारणे काही (दर्शवली) असली तरी मृत्युमुखी पडलेल्या वाघांचा उत्तरीय अहवाल प्रसिद्ध होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. नेमके पाणी मुरते कुठे? गावकरी व वन विभागातील कर्मचारी यांना जंगलातील इत्थंभूत माहिती असते. एखाद्या माहितगाराशिवाय कुठल्याही जंगलात बिनदिक्कत फिरणे अशक्यच. असे असताना काही शिकारी येतात आणि वाघाची शिकार करून जातात, त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर ते हाती तर लागत नाहीच; परंतु त्यांच्याशी संलग्न पुरावाही सापडत नाही! याचा अर्थ सामान्य जनतेने काय लावायचा? सुरक्षा यंत्रणांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साहाय्य आणि सहभागाशिवाय वृक्षतोड किंवा जंगली प्राण्याची कत्तल शक्य नाही, हे आरशाइतके स्वच्छ आहे! दुर्दैवाने या दोन्ही घटना रोखठोकपणे चालू आहेत.
शिकार होते, चौकशीचे आदेश दिले जातात, समित्या बनतात, कधीतरी काही अहवाल प्रसिद्ध होतात, त्या अहवालातील खरे-खोटे तपासण्याची गरज वरिष्ठ अधिकार्यांना भासत नसते किंवा ते अहवालच खरेच वाटावे, असे बनवले असतात, अहवाल फाइलमध्ये बंद होतात अगदी कालांतराने नागरिकांचे तोंड बंद होतात तसे..! सराईतपणे सर्व गोष्टी घडत जातात. प्राण्यांना मात्र नाहक जीव गमवावा लागतो, हे निश्चित.
माणसाच्या क्रौर्याचे पडसाद आकाश, जमीन आणि पाणी सगळीकडे दिसू लागले आहेत. पशुपक्ष्यांच्या अनेक प्रजाती तसेच अनेक जलचर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. चिमण्या, कावळे यांचे शहरातील वास्तव्य जवळजवळ नष्टच झाले आहे. जंगली प्राण्यांकरिता सुपारी दिली जात आहे. वाघ, सिंह हे प्राणी निसर्गचक्राची महत्त्वाची कडी आहे. ते जर नाहीसे होऊ लागले तर जंगलाचा, पर्यायाने सृष्टीचा समतोल बिघडू शकतो. प्राण्यांचा शेवट हे एकप्रकारे सृष्टीचे नुकसान आहे; परंतु हे समजून घ्यायला तशी मनोवृत्ती हवी. भौतिक सुख हेच ज्यांचे ध्येय आहे, त्यांना या गोष्टीने फरक काय पडतो? वाघांची सुपारी दिल्याचे आज उघडकीस आले परंतु बिबट्या, मोर, हस्तिदंतासाठी हत्ती यांसारख्या प्राण्यांची शिकार होते, हे सर्वश्रुत आहे.
पैशाच्या मोहापुढे ज्यांना जिवंत प्राण्याच्या वेदना कळू शकत नाहीत, त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय करणार? शिवाय जिथे वनमंत्री सुरक्षित जंगलात चिंकाराची हत्या करून त्यावर ताव मारताना सापडतात, संसदेचे माजी सभापती गोंडस पक्ष्यांना भाजून खाताना आढळतात, चित्रपटात न पेलवणारे संवाद फेकून लाखो हृदयांवर राज्य करणारा चित्रपट नायक राजस्थानात काळविटासारखा सर्वसात्त्विक प्राणी मारताना पकडला जातो, तिथे शिका-यांवर कठोर कारवाई होऊन प्राण्यांना न्याय मिळेल, हे केवळ अशक्य आहे.
काही निसर्गप्रेमी, वन्यरक्षक संघटना वृक्षवल्ली व वन्यजीव वाचवण्यासाठी कार्यरत आहेत; परंतु शासनाने सर्वतोपरी पुढाकार घेतला तरच हे शक्य आहे, अन्यथा अशा घटनांकरिता वृत्तपत्रातील एक रकाना कायम राखीव राहिला तर नवल वाटणार नाही! वेळीच कारवाई न केल्यास हे जंगली प्राणी केवळ पुस्तकांत शोभेपुरते अस्तित्वात राहतील.