आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड फॉर बॅड न्यूज : अफू, स्त्रीभ्रूणहत्या, दहशतवाद आणि ...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड शहरातील बातमी आहे म्हटल्यानंतर ती वाईटच असणार, असा आता ठाम समज होत चालला आहे आणि त्याला बीड शहर-जिल्ह्यातील घटना वेळोवेळी दुजोरा देत आहेत. बीड हा दुष्काळी आणि रोजगाराची वानवा असलेला जिल्हा. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणूनही बीडची ओळख आहे. राज्यातील सर्व साखर कारखान्यांवर ऊस तोडीसाठी बीडचाच कामगार असतो. मराठीतील आद्य कवी मुकुंदराज येथीलच आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ हे देखील बीड जिल्ह्यातीलच. मात्र, आता ही सगळी ओळख पूसून बीड हा क्रुरकर्म्यांचा जिल्हा म्हणून समोर येऊ लागलाय.
नुकताच लष्करे तैयबाचा दहशतवादी सईद जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू जिंदाल याला दिल्लीत अटक करण्यात आली. जबीउद्दीन मुळचा बीडचा आहे. त्यामुळे बीड राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले. त्याआधी जन्माला येऊ पाहणा-या मुलींचा आईच्या गर्भातच जीव घेण्याचा कारखाना देखील बीडमध्येच सुरु असल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. राज्यातील पाच जिल्ह्यांत उघडकीस आलेली अफूच्या शेतीचा पहिला मळा बीडमध्येच फुलला. भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा गड म्हणून बीडकडे पाहिले जात होते. मात्र, मागील वर्षाच्या शेवटी मुंडेचा पुतण्या धनंजय याने बंड पुकारून राज्याचे लक्ष बीडकडे वेधून घेतले. यासोबतच दलित अत्याचारातही बीड वरच्या क्रमांकावर आहे. यामुळे बीडमध्ये काही चांगलं होतयं की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीडचे दहशतवादाशी कनेक्शन - मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पडद्यामागून सूत्र हलविणारा सईद जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबु हमजा उर्फ अबु जिंदाल दिल्ली पोलिसांच्या हाती लागला. दिल्ली विमानतळावरुन त्याला ताब्यात घेण्यात आले. जबीउद्दीन अन्सारी हा मुळचा बीड जिल्ह्यातील गेवराईचा आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याचे कुटूंब बीडला स्थलांतरित झाले आहे. बीडमधील हत्तीखाना भागात ते राहतात. अन्सारीने बीडच्या आयटीआयमधून शिक्षण घेतले आहे. २००२ मधील गुजरात दंगलीनंतर तो 'सीमी'च्या संपर्कात आला. इथेच त्याने दशतवादाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर इंडियन मुजाहिद्दीनचा तो सक्रीय सदस्य झाला. २००५ मध्ये तो बीडमधून फरार झाला. नंतर लष्करे तैयबासाठी तो काम करु लागला. औरंगाबादच्या वेरुळ लेण्याजवळ २००६ ला मोठा शस्त्रसाठा सापडला होता. येथून त्याचे दहशतवाद्यांशी असलेले कनेक्शन समोर आले. जुलै २००६ मध्ये मुंबई लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. यात अन्सारीचा हात असल्याचे तपासादरम्यान सिद्ध झाले होते.
मुंबईवर २६ नोव्हेंबरला (२६/११) अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या हल्यातही अन्सारीचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबईवर हल्ला करण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांना हिंदी शिकवण्यापासून त्याचा यात सहभाग होता. हल्ल्यावेळी दहशतवाद्यांना फोनवरुन सुचना देणारा दुसरा तिसरा कोणी नसून अबु हमजा उर्फ अन्सारीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अन्सारीचे काही साथीदार त्याच्या आधीच जेलमध्ये आहेत. विशेष म्हणजे तेही मराठवाड्यातीलच आहेत. अब्दुल अजीज, अब्दुल समद, मोमीन मोहंमद (बीड), अफरोज खान (माजलगाव, जि. बीड) खतीब इम्रान शेख विखार (परळी, जि. बीड). पुण्याच्या जर्मन बेकरी स्फोटातील अरोपीही मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यामधील उदगीरचा आहे. सीमीला मोठ्या प्रमाणात मुस्लीम तरुणांची फौज ही मराठवाड्यातूनच मिळाली.
डॉ. मुंडेचा गर्भपाताचा कारखाना - राज्यात गाजत असलेल्या स्त्रीभ्रूण हत्येचे मूळही बीडमध्येच आहे. बीडचे डॉ. सुदाम मुंडे आणि डॉ. सरस्वती मुंडे या दाम्पत्याने तर स्त्रीभ्रूण हत्येचा जणू काही कारखानाच सुरु केला होता. कोणत्याही रोग्याला जीवदान देण्याची शपथ घेतलेले डॉक्टर असेही काम करु शकतात, यावर चटकन विश्वास बसत नाही. मात्र, या डॉक्टर दांम्पत्याने चार हजारांहून अधिक कळ्या उमलण्यापूर्वीच खूडल्या आहेत, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. मुंडे हॉस्पीटलमध्ये राज्यातील कानाकोप-यातून महिला गर्भपातासाठी येत होत्या. तसेच शेजारच्या आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातही यांचे एजंट होते.
गर्भलिंगनिदान व चाचणी कायद्याला मुठमाती देऊन आणि आरोग्य तसेच पोलिस, महसूल खात्याला खिशात घालून या डॉक्टर दाम्पत्याचा गोरखधंदा सुरु होता. कोल्हापूरच्या अँड. वर्षा देशपांडे यांनी २०१० मध्ये स्टिंग ऑपरेशन करुन हे कंसकृत्य चव्हाट्यावर आणले. मात्र, तोंडाला रक्त लागल्यानंतर जनावर शांत राहात नाही, तसा पैशांना चटावलेल्या डॉ. मुंडे याने अँड. देशपांडे यांच्या कारवाईनंतरही आपला धंदा बंद केला नाही. १८ मे २०१२ रोजी विजयमाला पेटकर या महिलेचा गर्भपातानंतर मृत्यू झाला आणि गर्भपाताचा कारखाना चालवणा-या डॉ. मुंडेविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यानंतरही २६ दिवस प्रशासनाला गुंगारा देत हे डॉक्टर दाम्पत्य फरार होते.
गुरुवारी (२८ जून) स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणीच बीडच्या डॉ. सुनिता बारकोल आणि संतराम राठोड या दोन भुलतज्ज्ञांना अटक करण्यात आली आहे. याचाच अर्थ कळ्यांचा कर्दनकाळ असलेल्या या डॉक्टरने बीडला गर्भपाताचे हबच करुन टाकले होते म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
पैसे कमावण्यासाठी अफूच्या शेतीचा शॉर्टकट - या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात राज्यात प्रतिबंधीत असलेल्या अफुलागवडीरुन बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील मोहा येथील शेतक-यांना अटक करण्यात आली. त्यानंतर राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि राज्याच्या गृहमंत्र्याच्या सांगली जिल्ह्यातही अफू पिकवला जात असल्याचे आढळले. मात्र, याचीही सुरुवात झाली ती बीडमधूनच. राज्यातील पाच जिल्ह्यांत ७० एकराहून अधिक अवैध अफू शेती पैकी ५० एकराहून अधिक एकट्या बीडमध्ये आढळली. राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अफू शेती केली जात असल्याचे उघडकीस आल्यानंतर गृहमंत्र्यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. परळी तालुक्यातील मोहा परिसरात बीड गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शेतावर धाडी टाकून पन्नास एकरातील अफूची शेती उघडकीस आणली आणि संपूर्ण राज्याचे लक्ष बीडने वेधून घेतले. बीड जिल्ह्यात एवढ्यामोठ्या प्रमाणात अफूची शेती केली जात आहे, आणि याची माहिती कृषी किंवा महसूल खात्याला नाही याबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले. तपासादरम्यान पाच वर्षांपासून अफूची लागवड केली जात असल्याचे समोर आले. केवळ मोहा या गावातच नव्हे तर, आसपासच्या वंजारवाडी, गर्देवाडी परिसरातील बहुतांश शेतकरी अफूची लागवड करतात. नांदेड येथील व्यापारी शेतात येऊनच खरेदी करत असल्यामुळे शेतक-यांना बाजारपेठेपर्यंत अफू घेऊन जाण्याचा धोका पत्करण्याची आणि तसदी घेण्याचीही गरज नव्हती. पैशाचा हव्यास आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे अफूची शेती बीडमध्ये जोरात होती.
मुंडेच्या घरात दुफळी - बीड जिल्हा परिषदेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा असला, तरी बीड म्हणजे मुंडेचा गड अशीच या जिल्ह्याची ओळख होती. मात्र, गोपीनाथ मुंडे यांनी परळी विधानसभा निवडणुकीत भाजपचा सक्रीय कार्यकर्ता असलेला पुतण्या धनंजय याला डावलून मुलगी पंकजाला उमेदवारी दिली आणि काका-पुतण्यात दरी निर्माण झाली. हा वाद शेवटी आमदार धनंजयने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुनच संपवला. दरम्यानच्या काळात काका गोपीनाथराव आणि पुतण्या धनंजय यांनी एकमेकांवर टीकास्त्र सुरु केले होते. एकमेकांना संपवण्याची (राजकारणातून) भाषा केली गेली. आमच्या घरात फूट पाडणारे बारामतीकरच असल्याचेही थोरल्या मुंडेनी म्हटले. यावर बारामतीच्या दादांनीही मुंडे काका-पुतणे काय दुधखूळे आहेत का, असे जोरदार प्रत्युत्तर दिले. या काका- पुतण्यांमुळे बीडच्या राजकारणाकडे राज्याचे लक्ष वेधले गेले.
थोरा मोठ्यांची पुण्याई गेली कुठे... - साधारण दर दोन महिन्यांनी मराठवाड्याची मान शरमेने खाली घालणा-या घटना बीडमध्ये होत आहेत. स्वामी रामानंद तीर्थांपासून प्रमोद महाजनांसारख्यांचा बीडला राजकीय वारसा आहे. वैजनाथ हे बार ज्योतिर्लिंगापैकी एक देवस्थान बीडमध्ये आहे. असे असतांना राज्यातील वाईटातील वाईट घटना या बीड मध्येच का घडतात, याचा सर्व सामान्य बीडकरांनी विचार करण्याची वेळ आली आहे.
unmesh.khandale@dainikbhaskar.com
तुम्हाला या घटनांबद्दल काय वाटते, तुमचे मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा...