आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौजन्याची ऐशीतैशी (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वत:ला सभ्य नि सुसंस्कृत म्हणवणा-या, उठता-बसता संस्कृती-परंपरांचे दाखले देणा-या आत्ममग्न समाजगटाला चपराक देणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. ‘लाफ्टर क्लब’च्या उपक्रमाचा आपणास मनस्ताप सहन करावा लागत असून या क्लबच्या सदस्यांना आपल्या घरासमोर हा उपक्रम राबवण्यास मनाई करावी, अशा आशयाची याचिका मुंबईतील कुर्ला उपनगरातील एका कुटुंबाने दाखल केली होती. त्या याचिकेवर मत नोंदवताना न्यायमूर्ती शरद बोबडे आणि न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने, हसणे हा गुन्हा नाही, पण कुठे आणि किती भडकपणे हसायचे याचे भान ठेवावे, अशी समज संबंधितांना दिली आहे. खंडपीठाने आपल्या सुनावणीत असेही म्हटले आहे की, ‘लाफ्टर क्लब’च्या नावाखाली कुणाच्याही घरासमोर जमून मोठमोठ्याने हसणे योग्य नव्हे. या संदर्भात स्थानिक पोलिसांनी कारवाई करावी आणि त्याची माहिती न्यायालयास सादर करावी.’ खरे तर न्यायालयाने कुणा एका ‘लाफ्टर क्लब’कडे नव्हे, तर भडकपणा हेच व्यवच्छेदक लक्षण बनत चाललेल्या एकूण समाजाकडेच या निमित्ताने अंगुलिनिर्देश केलेला आहे. बारसे-मुंज-लग्न-अंत्यसंस्कार-सण-उत्सव आदी धार्मिक-सार्वजनिक कार्यांत सहभागी होणे हीच आपली संस्कृती आहे, असा संकुचित समज असणा-यांसाठी तर या निकालाचे महत्त्व काकणभर अधिकच आहे. आपल्याकडे भौतिक सुख-समृद्धी आली, सोबत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ची दीक्षा घेऊन झाली, तरीही चेह-यावर हसू आणि मनात आनंद दाटला नसल्यानेच कदाचित मधल्या काळात कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे हसण्याचा व्यायाम करवून घेणा-या ‘लाफ्टर क्लब’चेही पेवच फुटले आणि नवतरुणांपासून वयोवृद्धांपर्यंतच्या सगळ्यांनाच सुखी जीवनाचा मंत्र गवसल्यासारखे झाले. मुळात ‘लाफ्टर क्लब’ ही संकल्पना अभिनव खरी. त्यातून शरीर-मनाला तजेला आणि ऊर्जा मिळवून देण्याचा, चित्तवृत्ती प्रफुल्लित करण्याचा उद्देशही एक वेळ पटण्यासारखा; परंतु आपण खुश म्हणजे जग खुश, आपण आनंदी म्हणजे सर्व जग आनंदी, असा एकांगी विचार करणा-यांना जेव्हा सभ्य वर्तनाचे भान असत नाही, तेव्हा ती कृती कितीही उदात्त नि विधायक असली तरीही प्रत्यक्षात अर्थशून्य ठरते. नेमके हेच ‘लाफ्टर क्लब’च्या सदस्यांनी केलेल्या बेजबाबदार वर्तनातून समोर आले आहे.
अर्थातच, या सगळ्याच्या मुळाशी अलीकडच्या काळात समाजात मुरत चाललेली असंवेदनशीलता दडलेली आहे. भडकपणा हे त्या असंवेदनशीलतेचे बायप्रॉडक्ट आहे. हा भडकपणा फक्त आपल्याकडील नाटक -सिनेमा आणि भरजरी मालिकांमधून नव्हे, तर प्रत्यक्ष जगण्यातही पावला-पावलांवर झळकत आहे. सत्यनारायणाच्या सार्वजनिक महापूजेपासून ते दांडियापर्यंत आणि सार्वजनिक गणेशोत्सवापासून ते विजयी मिरवणुका-लग्न समारंभापर्यंतच्या कार्यक्रमांत सढळ हस्ते ढणढणाटी संगीताचा वापर, फटाक्यांची आतषबाजी ही आता नित्याची बाब झाली आहे. त्यात बहुतेकांना फारसे वावगे वाटत नाही. पण जे कुणी याविरोधात आवाज उठवतात, त्यांना संस्कृतीविरोधी ठरवून सर्रास झिडकारले जाते. कुणा आजारी माणसाच्या कुटुंबातील व्यक्तीने तक्रार केलीच तर सहसा आयोजकांचा अपमान होतो. अहंकार दुखावतो. अशा वेळी ना पोलिसांची मात्रा लागू पडते, ना न्यायालयाचे आदेश कामी येतात. पण अनेकदा परिस्थिती हाताबाहेर जाऊन लाऊडस्पीकर लावण्यावरून, रात्री-बेरात्री फटाके उडवण्यावरून भांडण-तंटेही होतात, ते विकोपाला जाऊन दोन गटात वितुष्ट येते. पण बहुमत लाऊडस्पीकर आणि फटाक्यांच्या बाजूने असल्याने अल्पसंख्य तक्रारदारांचे म्हणणे बहुतांश वेळा हवेतच विरते. जी बाब सार्वजनिक कार्यक्रमांतून दिसणा-या भडकपणाची, तीच बाब सार्वजनिक ठिकाणच्या वर्तनाचीसुद्धा. संस्कृती म्हणजे काय, सभ्य वर्तन कशास म्हणायचे, याबाबत आपल्याकडे इतके गैरसमज आहेत की संस्कृती-सभ्यपणाचा खराखुरा अर्थ कुणी सांगायला गेलेच तर त्याला उडवून लावले जाते.
वस्तुत: सार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्तीने सभ्यपणाने कसे वागावे-बोलावे, या संदर्भात जगात निश्चित असे नियम नाहीत, की न्यायालयीन कायदे नाहीत. सार्वजनिक वर्तनाचे हे अलिखित नियम सामाजिक-सांस्कृतिक उत्क्रांतीतून जन्माला येत असतात. माणसाला माणसाविषयी वाटणारी सहवेदना या नियमांचा आधार असते. किंबहुना तशी ती असावी, अशी माफक अपेक्षा असते. परंतु प्रत्यक्षात चारचौघांत वावरताना अनेकांना याचाच विसर पडल्याचे दिसते. सार्वजनिक ठिकाणी हळुवार बोलणे शक्य असताना एकमेकांशी तावातावाने बोलणे, हॉटेलात जेवायला जाणे हा मुख्य उद्देश असताना तिथे गेल्यावर अख्खे हॉटेल डोक्यावर घेणे, आपण कुठे आहोत याचे भान न ठेवता मोबाइलवर तारस्वरात बोलणे, मोबाइलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, आदी वर्तन असभ्य प्रकारांत मोडते, याची जाणीवही अलीकडच्या काळात विरळ झाल्याचे दिसत आहे. सुख-समृद्धीसोबत येणारा हा बदल चिंताजनक खराच. एरवी समोरच्या व्यक्तीला ‘रामराम’ म्हणणे वा ‘नमस्कार’ करणे हीच आपल्याला सभ्यपणा आणि सौजन्याची परिभाषा असल्याचे वाटत असते. परंतु त्यातही श्लेष असा की, हे ‘रामराम’ आणि ‘नमस्कार’ ओळखीतल्या व्यक्तींसाठीच असतात. पाश्चात्त्यांप्रमाणे अनोळखी व्यक्तीचे सुहास्यवदनाने अभीष्टचिंतन करण्याचा ‘माणूसपणा’ आपण सहसा दाखवत नाही. परदेश वारी करून आल्यानंतर पाश्चात्त्यांच्या त्या वर्तनाचे गोडवे मात्र खूप गायले जातात. कृतीत ते कधीही उतरत नाही. संस्कृतीतला फरक हा इथेच खरे तर अधिक ठळकपणे अधोरेखित होत असतो. उच्च न्यायालयासही ‘लाफ्टर क्लब’च्या सदस्यांना खडे बोल सुनावताना व्यापक अर्थाने नेमके हेच अपेक्षित असावे. एकूणच, घरात फ्लॅट स्क्रीन आणि हातात आयपॅड आला, दारात ‘लॅण्ड क्रु झर’ आली म्हणजे आपण आधुनिक, पर्यायाने सभ्य नि सुसंस्कृत झालो, असा गैरसमज करून घेणा-यांची संख्या वा-याच्या वेगाने वाढत असताना ‘लाफ्टर क्लब’च्या सदस्यांनी वर्तनाच्या मर्यादा सांभाळून हसावे, हा न्यायालयाचा आदेश याच तथाकथित ‘सुसंस्कृत’ समाजाला सभ्य वर्तनाचा खराखुरा अर्थ सांगणारा आहे.