आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चलाख राजकारणी (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ए.पी.जे. अब्दुल कलाम हे ‘राजकारणाबाहेरचे’ सद्गृहस्थ आहेत, हा समज आता दूर व्हायला हरकत नाही. म्हणजे ते सद्गृहस्थच आहेत, कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते नाहीत, त्यांच्यावर भ्रष्टाचार वा अन्य कोणताही आरोप नाही आणि ते क्षेपणास्त्रतज्ज्ञ आहेत, हे सर्व खरे आहे. पण ते तसे ‘राजकारणाबाहेरचे’ आहेत, हे विधान मात्र तितकेसे खरे नाही. आपल्याकडे ‘राजकारण’ या शब्दाचा अर्थ फ ार चुकीने आणि गैरसमजाने घेतला जातो. गेल्या काही वर्षांत तर राजकारणी म्हणजे भ्रष्ट, कारस्थानी, कपटी, निगरगट्ट, सत्तापिपासू वगैरे वगैरे ‘सर्वदुर्गुणसंपन्न’ अशी व्यक्ती अशी व्याख्याच रूढ होत आली आहे. असा समज रूढ व्हायला मीडिया जितका जबाबदार, तितक्याच काही राजकीय व्यक्तीही जबाबदार आहेत. चाणक्यकृत व्याख्येनुसार राजकारण म्हणजे सत्तेच्या सारीपाटावरील धूर्त खेळी आणि राजकीय महत्त्वाकांक्षा : सुप्त वा प्रकट! चाणक्यकृत व्याख्येत ए.पी.जे. अब्दुल कलाम चपखलपणे बसतात. त्याचप्रमाणे राजकारणाच्या माध्यमातून विज्ञानप्रसार, राष्ट्रीय भावना आणि सद्भावना रुजवता येते असे मानणा-यांमध्येही कलाम यांचा समावेश करता येईल. म्हणजेच सद्हेतू आणि धूर्तपणा या दोन्हींचे अफलातून मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. त्यांच्या धूर्तपणाचे आणि महत्त्वाकांक्षेचे भरपूर पुरावे गेल्या महिनाभरात सर्वांसमोर आले आहेत. त्यांच्या लवकरच प्रसिद्ध होणा-या ‘टर्निंग पॉइंट्स : ए जर्नी थ्रू द चॅलेंजेस’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकातील जे उतारे प्रसिद्ध झाले आहेत, ते पाहता कलाम हे चलाख गृहस्थ आहेत, हे कुणाच्याही सहज लक्षात येईल. कलाम यांनी पुस्तकात म्हटले आहे की, सोनिया गांधी याच 2004 या वर्षी पंतप्रधानपदाची शपथ घेतील, असे त्यांना वाटत होते. त्यांना पंतप्रधानपद देऊ नये म्हणून कलाम यांच्यावर भाजप व इतरही काही मंडळींचा बराच दबाव होता. कलाम राष्ट्रपती झाले होते तेच मुळी भाजपच्या पुढाकाराने. त्यामुळे भाजपला वाटत होते की, त्यांचा सल्ला कलाम ऐकतील. मात्र कलाम यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, सोनिया गांधींना पंतप्रधानपदाची शपथ न देणे हे घटनाबाह्य कृत्य ठरले असते. परंतु अनपेक्षितपणे सोनिया गांधींनी डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव पंतप्रधानपदासाठी सुचवले. तेव्हा अशा अफवा पसरवल्या गेल्या होत्या की, कलाम यांनीच सोनिया गांधींना ती शपथ घेण्यापासून परावृत्त केले. विदेशात जन्म झालेला असल्यामुळे त्या पंतप्रधान झाल्यास नियम व संकेतभंग होईल, असे कलाम यांनी सोनियांना सुचवले, असे तेव्हापासून आजपर्यंत सांगितले जात होते. सुब्रमण्यम स्वामी यांच्यापासून ते अलीकडे अगदी काही ज्येष्ठ पत्रकार असे सर्व जण सोनिया गांधींचा पंतप्रधानपदाचा त्याग हे सोयीस्कर नाटक आहे, असे सांगत होते. प्रत्यक्षात खरोखरच सोनिया गांधींनी त्या पदाचा त्याग केला होता, हे आता कलाम यांच्या पुस्तकावरून सिद्ध झाले आहे. सोनिया गांधी पंतप्रधान झाल्यास आपण ‘मुंडण’ क रून घेऊ, संन्यास घेऊ आणि त्यांच्याविरोधात देशव्यापी आंदोलन उभारू, असा आक्रोश आणि बेभान वल्गना क रून उमा भारती व सुषमा स्वराज तसेच नरेंद्र मोदी आणि प्रवीण तोगडिया यांनी वातावरण तापवायला सुरुवात केली होती. पण प्रत्यक्षात त्यांच्या तथाकथित आंदोलनाची धमकी येण्यापूर्वीच सोनिया गांधींकडे डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव सुपूर्द केले होते. त्यामुळे त्या ‘आंदोलनाला घाबरल्या’ आणि ‘हिंदुत्ववादी गर्जनांसमोर नरमल्या’ हा प्रचारही किती पोकळ व निराधार होता, हे आता उघड झाले आहे. परंतु आपला सर्व प्रचार हा विद्वेषातून आला होता, हे अर्थातच संघ परिवार जाहीर करणार नाही. मात्र मुद्दा फक्त तेवढाच नाही. मुख्य मुद्दा हा की, कलाम यांनी ही बाब गेली आठ वर्षे गुलदस्त्यात का ठेवली? जेव्हा धडधडीत खोट्यानाट्या गोष्टी प्रसिद्ध होत होत्या आणि अफवांचे पीक आले होते, तेव्हा या राष्ट्रपतिपदावर असणा-या सद्गृहस्थाने मुग्धता का पाळली? या एका प्रश्नावरून सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारख्या विद्वेषी (की खुनशी?) राजकारण्याने देशभर काहूर माजवले असताना कलाम यांनी हे सत्य का सांगितले नाही? याचा अर्थ असाही होतो की, आणखीही ब-याच गोष्टी ‘गैरसोयीच्या’ असल्याने त्यांनी तेव्हा सांगितल्या नाहीत वा आजही आत्मचरित्रातून सांगणार नाहीत. ही ‘अळीमिळी गुपचिळी’ हे राजकारणच नव्हे काय? शिवाय ते जर राष्ट्रपतिपदाचे उमेदवार असते तर त्यांनी पुस्तकातील हा भाग असा प्रसिद्धीस दिला असता काय? आणि समजा राष्ट्रपती म्हणून निवडून आले असते तर त्यांनी हा गौप्यस्फोट कधी केला असता? नव्या राष्ट्रपतिपदाची मुदत संपल्यावर? कलाम भ्रष्ट नाहीत, सद्गृहस्थ आहेत, वैज्ञानिकही आहेत. पण म्हणून राजकारणी नाहीत, असे आता कोणीच म्हणू शकणार नाही. राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीवरून त्यांनी जो मतलबी घोळ घातला, त्यातही महत्त्वाकांक्षेचे राजकारण स्पष्ट दिसू लागले होते. आपल्या नावाची चर्चा त्यांनी सुमारे महिनाभर होऊ दिली. जेव्हा हे स्पष्ट झाले की आपल्याला एकमुखी समर्थन मिळत नाही, इतकेच नव्हे तर 55 टक्के मतेही मिळण्याची शक्यता नाही, तेव्हा कलाम यांनी शहाजोगपणे सांगितले की, आपल्याला ‘दुस-यांदा राष्ट्रपती होण्यात स्वारस्य नव्हते’. जर त्यांना स्वारस्य नव्हते तर त्यांनी ते नाव चर्चेत का चालू ठेवले? ममता बॅनर्जींनी त्यांचे नाव सुचवल्यानंतर त्यांना पुन्हा राष्ट्रपती भवनात जाण्याची इच्छा व चिन्हे दिसू लागली. हे तर त्यांच्या वक्तव्यातून दिसू लागले होते. कलाम यांनी त्यांच्या आत्मकथनात असेही म्हटले आहे की, गुजरातच्या मुस्लिमविरोधी दंगलीनंतर आपण गुजरातला जाऊ नये, असे तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी आपल्याला सुचवले होते. ही गोष्टसुद्धा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे आणि कलाम यांनी तब्बल 10 वर्षांनी जाहीर केली आहे. एखादी व्यक्ती काय बोलते, केव्हा बोलते, कसे बोलते यात जसे राजकारण असते, तसेच न बोलण्यातही ते असते. त्या निकषाच्या आधारे कलाम वैज्ञानिकच नव्हे, तर चलाख राजकारणीही आहेत, हेच सिद्ध झाले आहे.