आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरो कपचा थरार! (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तमाम विश्वाला आकर्षित करून घेणारा युरो कप रविवारी संपला. स्पेनने विश्वविजेतेपदापाठोपाठ सलग दुस-यांदा युरो कपवर आपले नाव कोरले. लॅटिन अमेरिका आणि काही अंशी आफ्रिकन फुटबॉल वगळता जगातील फुटबॉलचे वर्चस्व युरोप खंडातच एकवटलेले आहे. त्यामुळे युरो कपला मिनी विश्वचषक फुटबॉल म्हणण्यापेक्षाही पर्यायी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा म्हणणेच योग्य ठरेल. आज अमेरिका आपल्या बेसबॉल या खेळाला वर्ल्ड सिरीज संबोधते. अमेरिकन फुटबॉलचा एवढा बाऊ केला जातो की ‘सुपर बॉल’ नावाने मार्केटिंग करण्याचा प्रयत्न होतो. मात्र विश्व फुटबॉल संघटनेची (किफा) विश्वचषक स्पर्धा आणि युरोपियन युनियन फुटबॉल असोसिएशनचा (युएफा) युरो कप या स्पर्धा ख-या अर्थाने विश्व दर्जाच्या आहेत. जगातील पहिल्या 20 क्रमांकांच्या संघांत 10-12 संघ तर युरोपातलेच असतात. एवढेच कशाला, ब्राझील व अर्जेंटिना यांच्यासारखे अपवाद वगळले तर टॉप टेनमध्येही अन्य संघ युरोपातलेच आहेत. दोन वर्षे पात्रता स्पर्धांचे मंथन करून त्यातून 16 रत्ने बाहेर काढली जातात. युरोपीय फुटबॉल शैली आणि यंत्रणा यांच्या कसोटीची ती चार वर्षे असतात. ग्रीस किंवा तुर्कस्तानसारखा संघदेखील मोठ्या संघांना धक्का देऊन जातो. धक्काच का, ग्रीसने तर 2004 च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली होती. 2008 च्या युरो कपपासून स्पेनलाही विजयाचा परीसस्पर्श गवसला. 2010 चा विश्वचषक जिंकून त्यांनी आपल्या फुटबॉल वर्चस्वावर पुन्हा एकदा मोहोर उमटवली. 2012 च्या युरो कप स्पर्धेच्या विजेतेपदासाठीचे स्पेन दावेदार मानले गेले असले तरीही त्यांचा विजेतेपदापर्यंतचा प्रवास सहज झाला नव्हता. सुदैवाने स्पर्धेतील वाईट लढत सलामीलाच त्यांच्या वाट्याला आली. तीदेखील इटलीविरुद्धच आणि सुदैवाने स्पर्धेतील सर्वाधिक सुदैवी लढत त्यांच्या नशिबी आली अंतिम फेरीत; तीदेखील इटलीविरुद्धच. इटलीविरुद्ध सलामीच्या लढतीत त्यांचा अनुभवी बचावपटू व्हिया जायबंदी झाला. त्यांनी चेंडूवर नियंत्रण ठेवण्यात चूक केली नव्हती, परंतु त्यांचे पासेस एवढे कच्चे होते की त्यांना गोलपोस्टपर्यंत चेंडू नेणेही जमले नाही. इटलीने या कच्च्या दुव्याचा फायदा घेतला नाही. स्पेनला साखळीतील ती लढत 1-1 अशा बरोबरीत सोडवण्यात यश आले. अंतिम फेरीत त्याच्या अगदी उलट घडले. दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील विश्वविजेता स्पेनचा संघ या वेळी वाटत नव्हता. तरीही सर्व तज्ज्ञांना आणि टीकाकारांना चुकीचे ठरवून स्पेन विजेता झाला. या यशापाठी त्यांच्या देशातील फुटबॉल सिस्टिम आहे. स्पेनची स्पॅनिश फुटबॉल लीग प्रतिष्ठेची आहे. रिअल माद्रिद किंवा बार्सिलोना यासारख्या क्लबमध्ये जगातील मान्यवर खेळाडू खेळतात. त्यांच्या देशात आपल्या संघावर प्रेम करणारे चाहतेही मोठ्या प्रमाणावर आहेत, जे त्यांच्या सर्व सामन्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. देशभक्तिपर समूहगीते गाऊन सतत आपल्या संघाला प्रोत्साहन देत राहिले. स्पेनच्या फुटबॉल संघाची खेळण्याची शैली कंटाळवाणी आहे, असे म्हणणा-यांना त्यांनी स्पर्धा जिंकून चपराक लगावली. मात्र सर्वांनाच त्यांची शैली नकारात्मक वाटली नाही. त्यांच्या कपाटातील जगातील महत्त्वाच्या स्पर्धांची ओळीने पटकावलेली विजेतेपदेच त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देताहेत. विश्वचषक फुटबॉलएवढीच लोकप्रियता युरो कपने मिळवली आहे. पोलंड आणि युक्रेन या दोन देशांतील स्पर्धांमुळे एक नवा अध्याय लिहिला गेला. रशियातून विभक्त झाल्यापासून युक्रेनच्या फुटबॉलला हवी असलेली संजीवनी या युरो कपने दिली. पोलंड आणि युक्रेनमधील फुटबॉल स्टेडियम व अनेक सुविधांमध्ये वाढ झाली. 2016 ची स्पर्धा फ्रान्समध्ये होणार आहे. त्या स्पर्धेतील सहभागी संघांची संख्या 16 वरून 24 पर्यंत वाढवली जाणार आहे. 2010 मध्ये युरो कपचा हीरक२महोत्सव असेल. त्या वेळी ही स्पर्धा युरोपातील अनेक देशांमध्ये आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या स्पर्धेच्या यशामुळे युरोपियन युनियन फुटबॉल असोसिएशन तसे धाडस करण्यास धजावली आहे. खेळाडूंमधील एकमेकांबरोबरचे संघर्षाचे प्रकार कमी कमी व्हायला लागले आहेत. युरोपियन लीगमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना झालेल्या मनोमिलनामुळे आणि दुखापतींपासून स्वत:ला दूर ठेवण्याचे तंत्र अधिक विकसित झाल्यामुळे खेळाडूंमधील संघर्ष कमी पाहायला मिळाले. युरो कप ही स्पर्धा जगाच्या फुटबॉलचे प्रतिबिंब मानले जाते. या स्पर्धेत घडणा-या घटना आणि खेळाची शैली याचे परिणाम तमाम फुटबॉल खेळावर झालेले पाहावयास मिळतात. मिशेल फ्लाटिनी किंवा झिनेदिन झिदान यांच्यासारखे खेळाडू फ्रान्सला मोठ्या उंचीवर घेऊन गेले होते. या वेळी फ्रान्सचा प्रभाव पडला नाही. विश्वचषक किंवा युरो विजेतेपदाची झेप घेण्याइतकी सक्षम स्थानिक फुटबॉल यंत्रणा त्यांच्याकडे नाही. युरोपातील स्पेन, इटली, हॉलंड व अन्य युरोपीय देशांमधील स्थानिक फुटबॉल दर्जेदार फुटबॉलपटू तयार होण्याची प्रक्रिया सतत चालू ठेवत असते. त्यामुळे युरोपातील कोणता संघ पुढे जाणार याबाबत कुणीही भाकीत करू शकत नाही. इंग्लंडसारख्या देशात तर युरोपातील अव्वल क्रमांकाची फुटबॉल यंत्रणा आहे. त्यांचे क्लब फुटबॉल वरच्या दर्जाचे आहे. तरीदेखील इंग्लंड संघ ग्रीस, स्पेन यांच्यासारखे विजयाचे चमत्कार करत नाही, याचेच आश्चर्य वाटते. याचे प्रमुख कारण म्हणजे इंग्लंडमधील फुटबॉल लीगला क्लब कल्चरने ग्रासले आहे. आपापल्या क्लबसाठी जीव ओतून खेळणारे तेच खेळाडू इंग्लंडच्या संघासाठी तेवढ्याच जिद्दीने, ईर्ष्येने खेळतात का, हा प्रश्न कायम उपस्थित केला जातो. क्लबकडून खेळाडूंना प्रचंड पैसा मिळतो हे सत्य आहे. युरोपातील अन्य देशांमध्ये खेळणा-या क्लबमधील खेळाडूही त्यांच्या गुणवत्तेनुसार कोट्यवधींचे मानधन घेत असतात. मात्र देशासाठी खेळताना त्यांची शंभर टक्के निष्ठा पाहावयास मिळते. असे ब्रिटनच्या संघाबाबत बोलले जात नाही. फुटबॉल हा खेळ लोकप्रियतेच्या बाबतीत ब्रिटनमध्ये अगदी वरच्या स्तरावर असतानाही, ब्रिटनच्या फुटबॉल संघाने त्यांच्या चाहत्यांची नेहमी निराशाच केली आहे. स्पेनच्या बाबतीत असे यंदा घडले नाही. त्यांनी युरो कप जिंकून 2008 पासून आपल्याबाबत निर्माण केलेल्या अपेक्षांना तडा जाऊ दिला नाही. 2008 च्या युरो कप स्पर्धेच्या विजेतेपदानंतरचे अभिवादन कदाचित यंदाच्या युरो कप विजेतेपदानंतर त्यांना मिळणारही नाही. त्यांनी सनसनाटी निर्माण करून यंदा काही केलेही नसेल. 2008 आणि 2010 चा विश्वविजेता स्पेन संघ आणि आजचा स्पेन संघ यात निश्चितच फरक आहे. हा संघ कदाचित ग्लॅमरस नसेल, पण युरोपातील अन्य संघांपेक्षा पुढे आहे एवढे निश्चित.
स्पेन युरो चॅम्पियन !, फायनलमध्ये इटलीवर केली 4-0 ने मात