आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींची मिजास, केशुभाईंचे बंड! (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारणात कुणाचे दिवस कधी कसे फिरतील, काहीही सांगता येत नाही. ज्या गुजरातला हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हणत संघ परिवारातील विविध संघटनांनी येथे एका हातात भगवा ध्वज व दुसर्‍या हातात तलवार घेऊन हिंदू विरुद्ध मुस्लिम असे मतांचे ध्रुवीकरण केले, त्याच गुजरातमध्ये संघ परिवारात वाढलेले हिंदू नेते आता हिंदुत्वाचे मेरुमणी म्हणवणार्‍या नरेंद्रभाईंवरच चाल करून येण्याची जय्यत तयारी करत आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या हातातून सत्ता खेचून घेऊन 10 वर्षांपूर्वी ती संघ परिवाराने नरेंद्र‘भाईं’च्या हातात दिली. त्यानंतर भाईंचा अश्वमेध जो काय वार्‍यासारखा उधळला, तो संपूर्ण देश अनुभवतो आहे. मात्र अश्वमेधाचा बळी त्याच यज्ञात दिला जातो, याची त्या बिचार्‍या घोड्याला तरी काय कल्पना असणार म्हणा! त्यामुळे गोरधनभाई झडपिया, डॉ. करसनभाई कलसारिया या संघाच्या कट्टर स्वयंसेवकांनीच मोदींच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात उघडलेल्या आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी पटेल समाजातील शक्तिशाली नेते केशुभाई मैदानात उतरल्यावर या अश्वमेधासह हिंदू राष्ट्राच्या निर्मितीचा यज्ञ करण्यास सरसावलेला सर्व ‘भागवत’ समुदायच बिथरल्यासारखा झाला आहे. सध्या गुजरात भाजपमध्ये नरेंद्रभाई मोदी विरुद्ध बाकीचा सगळा परिवार, असे उघड तट पडले आहेत. देशाचा विकास एकीकडे आणि गुजरातचा एकीकडे, देशाचा विकास दर 8 टक्के असेल तर गुजरातचा 12-13 टक्के, असे म्हणत ‘टाटा ते बाटा’ आणि ‘अडाणी ते अडवाणी’ या संपूर्ण मांदियाळीकडून पाठ लाल होईपर्यंत ती थोपटून घेणार्‍या मोदींना येणारी निवडणूक फारशी सोपी जाणार नाही, याची पूर्ण कल्पना आली आहे. गेल्या दोन निवडणुका मोदीभाईंनी हिंदुत्वाचा चालणारा हुकमी एक्का वापरून सहज जिंकल्या. मोदींच्या प्रचारात काँग्रेस किंवा सोनिया गांधींपेक्षा मियाँ मुशर्रफ यांच्यावरच भयंकर टीका असायची. जणू काही गुजरात निवडणुकीचा प्रचार सुरू नसून भारत-पाकिस्तान युद्ध सुरू आहे आणि मोदी त्या युद्धात नेपोलियन बोनापार्टसारखे आघाडीवर आहेत, असाच आभास निर्माण केला जात होता. मात्र ‘हिंदू हिंदू सकल बंधू’ म्हणत माणसाच्या ऐहिक इच्छा-आकांक्षा पूर्ण करता येत नाहीत. हिंदुत्वाचा गजर करत मोदींनी काही ठरावीक पैसेवाल्या अडाणी, अंबानी वगैरे हिंदूंच्याच भल्याचे निर्णय घ्यायला सुरुवात केली. कालांतराने तर हिंदू नसलेल्या व पारशी असलेल्या टाटांसाठीही ते हिरिरीने धावून आले. एक पैसा कर गुजरातच्या तिजोरीत भरू नका, पण इथे येऊन उद्योग काढा, असे लोणी उद्योजकांना लावणे सुरू झाले. शेतकर्‍यांच्या हजारो एकर जमिनी अक्षरश: 25 पैसे वाराने त्यांच्याकडून हिसकावून ठरावीक उद्योजकांना दिल्या जाण्याचे एक सत्रच गुजरातेत सुरू झाले. हे कमी की काय, म्हणून मग आदिवासींच्या आश्रमशाळाही खासगी कंपन्यांच्या हातात दिल्या गेल्या. दलित-आदिवासींचा नोकर्‍यांमधील बॅकलॉग उरलाच नाही. कारण ते कार्यक्षम नसल्याने त्यांना नोकर्‍या देण्यात काय अर्थ आहे, असे मनोमन जणू गुजरात सरकारने ठरवूनच टाकले होते. मात्र या सगळ्यालाच 21व्या शतकातील आधुनिक विकास म्हणतात, असा अर्थ डोंबिवली ते सदाशिव पेठेपर्यंतच्या शाळांमधून शिकलेले व कुणाच्या तरी ओळखीपाळखीने नोकर्‍या मिळवलेले पत्रकार-प्राध्यापक नावाचे स्वयंघोषित तज्ज्ञ काढू लागले. त्यामुळे गुजरात वगळता देशातील इतर जनतेला मोदींकडे काहीतरी जादू असल्याचा आभास काही काळापुरता निर्माण झाला, हे मान्य करावेच लागेल. मात्र भावनगरमध्ये निरमा कंपनीला कारखाना काढण्यासाठी हजारो एकर जमीन देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या डॉ. करसनभाई कलसारिया यांनी भावनगर ते गांधीनगर असा लाखभर शेतकर्‍यांचा मोर्चा काढला. भावनगर, जामनगर, जुनागड, अमरोली अशा अनेक जिल्ह्यांतून शेतकर्‍यांच्या जमिनी स्वस्तात लाटण्याच्या विरोधात लोक संघटित होऊ लागले. गुजरातच्या किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांतून अडाणी बंधूंना बंदरे बांधण्यासाठी अत्यंत हुशारीने स्वस्तात जमिनी दिल्या जात होत्या, त्याच्या विरोधात कोळी बांधव एकत्र झाले. हा सर्व विरोध एकत्र होत असल्याचे मोदीभाईंच्याही चाणाक्ष नजरेतून सुटत नव्हते. त्यांनीही त्या दृष्टीने राजकीय पावले टाकायला सुरुवात केली होतीच. त्यातूनच मग गुजरात वाचवायचे असेल तर मला किमान पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून तरी जाहीर करा, असा दबाव भाईंनी संघामार्फत भाजप नेत्यांवर टाकायला सुरुवात केली. दरम्यान, केशुभाईंच्या हातातील राज्यकारभार मोदीभाईंच्या हातात गेल्यावर गुजरातमधील कडवा व लेवा या दोन्ही पटेल समाजात अत्यंत मानहानीची भावना पसरली होती. त्यात मोदीभाईंनी पटेलांचे राजकारण संपवण्यासाठी अनेक पटेल नेते व कार्यकर्त्यांचे पद्धतशीर खच्चीकरण करायला सुरुवात केली. त्यामुळे गेल्या निवडणुकीच्याच वेळी प्रत्येक पटेलाने आपल्या गाड्यांवर ‘पाटीदार’ असा स्टिकर चिकटवून स्वत:च्या अस्तित्वाची पहिली चुणूक दाखवली होती. यंदा मात्र गुजरातच्या ग्रामीण भागातून मोदीभाई व त्यांच्या कॉर्पोरेट मित्र कंपनीला असलेल्या सत्ता-संपत्तीच्या राक्षसी भुकेविरोधात प्रचंड आक्रोश उभा राहिला आहे. नेमक्या याच वेळी गेली 10 वर्षे अपमान सहन करत बसलेल्या केशुभाईंनी दिल्लीतील पक्षाच्या नेत्यांना जाऊन अल्टिमेटम दिला की, मोदीभाईंचा निकाल लावा; अन्यथा माझ्याशीच लढायला तयार राहा. परंतु देशाला हिंदुत्ववादी पंतप्रधान मिळण्याची स्वप्ने पाहणार्‍या भागवत संप्रदायाला त्याचे काही पडले नव्हते. त्यामुळे केशुभाईंनी सध्या मोदीभाईंच्या अश्वमेधाचा बळी देण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. राजकोट, अहमदाबादच्या सीमेवर पटेलांचे लाखांचे मेळावे आयोजित करून झालेत. त्यातच कडवे संघप्रचारक व गुजरातचे माजी गृहमंत्री झडपिया, भाजपचेच नेते डॉ. करसनभाई यांची केशुभाईंना साथ आहेच. भाजपच्या प्रयोगशाळेचे वासेच आता ढिले पडण्यास सुरुवात झाली आहे. मुसलमानांच्या विरोधात सर्वच जाती-जमाती एकत्र करून 10 वर्षे सत्ता राबवणार्‍या मोदीभाईंना आता लोकसंख्येच्या 10 टक्के असलेल्या व भाजपचा पारंपरिक मतदार असलेल्या पटेल समाजाकडूनच आव्हान मिळण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण गुजरातच्या बरोबरीने आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला व अहमदाबाद, बडोदा, सुरत या महत्त्वाच्या शहरांमध्ये जनाधार असलेला हा पटेल समाज संघाच्या प्रयोगशाळेचेच अग्निकुंड बनवून अश्वमेधाचा बळी मागू लागलाय. हिटलरची चाल खेळल्यावर अंतही त्याच पद्धतीने होतो, हेच दुर्दैवाने काही जणांच्या लक्षात राहत नाही...!