आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Master Blaster Sachin Tendulker And Actress Rekh In Rajyasabha

राज्यसभेत सचिन-रेखा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेतील सन्माननीय राखीव जागांसाठी सचिन तेंडुलकर आणि रेखा अशा समाजमान्य नागरिकांची नेमणूक झाली आहे. त्यावरून आता वाद सुरू आहेत. सचिनला ‘भारतरत्न’ द्यावे असे अनेक जण म्हणत राहिले खरे, पण ते होणे नव्हते. सचिननेदेखील आपला ‘असा’ सन्मान व्हावा किंवा कसे, याविषयी मौन बाळगणे पसंत केले होते. पण त्याने राज्यसभेत खासदार होण्याची तयारी दर्शवली. हे राजकीय शहाणपण आपल्याला कसे सुचले नाही, यावर काँग्रेस सोडून उर्वरित ‘राष्ट्रीय पक्ष’ आत्ममग्न अवस्थेत चिंतन करू लागले असले तरी त्यांचे उतू गेलेले दूध परत मिळणारे नाही. सचिनचे फाजील कौतुक काँग्रेसने कधी केले नाही. डाव्या समाजवादी गटांना त्याचा ‘आपल्याला’ काही उपयोग नाही असे वाटणे स्वाभाविक होते! तर भाजपने एक छान क्रिकेटपटू यापलीकडे त्याच्याकडे कधी पहिले नाही. शिवसेनेने केवळ मी मराठी आणि मी महाराष्ट्राचा... वगैरे मानण्यास ‘तो’ तयार ‘होत’ नव्हता, म्हणून त्याच्यावर भरपूर टीका केली. मी सा-या राष्ट्राचा हे सचिनचे एकेकाळचे विधान देशातील तमाम वृत्तपत्रांमध्ये फ्रंट पेजवर झळकले होते. तरी या गुणी आणि खिलाडू वृत्तीच्या सभ्य गृहस्थाला या मराठी प्रांतातच असभ्य भाषेतील टीकेला सामोरे लागले होते. हे आजही सुरू आहे आणि अशी उथळ टीका ब्रेकिंग न्यूजवरून कोणताही विधिनिषेध न ठेवता प्रसारितही झाली आहे. पण सचिनचे भारतीयत्व त्यास पुरून उरले हेही खरे आहे. सचिनला त्याच्या अखिल भारतीयत्वाची पावती मिळाली, एवढाच त्याच्या निवडीमागील अर्थ लावता येईल.
रेखा ही साठ-सत्तरीच्या दशकात गाजलेली नर्तकी आणि अभिनेत्री. व्यक्तिगत जीवनातील कडू अनुभव तिने एका मर्यादेबाहेर चर्चेत आणले नव्हते. अनेक चित्रपट कलावंत पुरेसा पैसा आणि प्रसिद्धी मिळाली की आपण होऊन बाजूला होतात. लग्न वगैरे करून संसाराला लागतात. रेखादेखील वलयांकित होती. आजही आहे. एकाच वेळी वलय आणि प्रलय सांभाळत ती तगून राहिली, हे तिचे वैशिष्ट्य. कोणत्याही राजकीय वादात नसणारी रेखा आता राज्यसभेत बसणार आहे. तिची निवड म्हणजे अमिताभ बच्चनला चपराक असल्याची वार्ता काही जण करतीलही. ते तसे खोटेही नाही. कारण बच्चन कुटुंब आणि इंदिरा गांधी-नेहरू कुटुंबीय यांचे जिव्हाळ्याचे संबंध कोणे एकेकाळी होते. पण चपराकीची अन्य कारणेही आहेत. अमिताभने राजकारण सोडले असले तरी तो हिंदू कौटुंबिक जीवनशैली आणि कॉर्पोरेट जगत यांची मोट बांधण्यात कमालीचा यशस्वी ठरला. हे उत्तरायण मराठी प्रांतात कधी शिरले ते विभक्त कुटुंब पद्धती स्वातंत्र्यपूर्व काळापासून मनोमन स्वीकारणाºया मराठी जनांना आणि त्यांच्या स्वयंभू नेतेमंडळींना कधीच कळले नाही. इंग्रजीत किंवा हिंदीत लिहून दिलेली मराठी वाक्ये धीरगंभीर आवाजात बोलून गेला की अमिताभचा आणि मराठीचा संबंध संपतो. त्यानंतर तो आपल्या पित्याची ‘मधुशाला’ गात सारा हिंदुस्थान फिरला तरी त्याचे कोणी काही मनावर घेत नाही. यापूर्वी असे प्रयोग राज कपूरनेदेखील केले होते. पण त्या काळात देशात एकीकडे अविभक्त कुटुंबातील एखाद-दुसरी व्यक्ती स्वातंत्र्यलढ्यात नाहीतर राजकारणात येत असे. पण कष्टकरी समाजातील लोकांचे व्यापक स्थलांतर सुरू झाले होते. म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती रुजत होती. विभक्त कुटुंब पद्धतीत व्यक्तिवादाचा शिरकाव झाला तो साठीच्या काळात. पण जीवनमूल्यांचा संघर्ष सुरूच होता. देशी राजकारणाविषयी (म्हणजे काँग्रेस) चिडीने बोलणारा कच्चा मध्यमवर्ग या काळात विकसित होत होता. त्याचेच प्रतिनिधित्व करत अमिताभने ‘संतापलेल्या तरुणाची’ भूमिका चित्रपटातून साकारली. ‘जंजीर’ आणि ‘शोले’सारखे चित्रपट खरे तर तत्कालीन राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे अस्सल चित्रपट होते. त्यात ‘शोले’ तर ऐन आणीबाणीच्या काळात आला होता. पण त्यावर आणीबाणी नव्हती हे विशेष. आता त्या काळातील संतापलेला मध्यमवर्ग आज पूर्णपणे निवांत आहे. अमिताभदेखील निवांत आहे. या मध्यमवर्गाकडे आता बरीच सुखसंपदा आल्यामुळे ज्या भरल्या नजरेने हा वर्ग ‘कौन बनेगा...’ किंवा सीडीवर ‘शोले’, ‘जंजीर’ पाहतो, त्याच नजरेने अण्णा हजारे नामक संतापलेला वृद्ध पाहतो. पण अमिताभने अण्णा प्रकरणावर, भ्रष्टाचार-लोकपाल प्रकारावर काहीही भाष्य आजतागायत केले नाही. हा प्रश्न अमिताभला कोणी विचारणारही नाही. तोदेखील त्याचे उत्तर देणार नाही.
राज्यसभेत सचिन क्रिकेट खेळणार नाही, रेखा नाचणार नाही की मधुबालाची आठवण जागवणारा निरागस अल्लडपणा करणार नाही. दोघांनीही खासदारकीला होकार देऊन आपल्या काल्पनिक प्रेमिकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यांची निवड सार्थ आहे. सचिन आणि रेखा या सभ्य नागरिकांचे त्यासाठी मन:पूर्वक अभिनंदन!