आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Municipal Corporation Election Sharad Pawar & Balasaheb Thakaray

ठाकरे, पवार आणि निवडणुकीचा पव्वा !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण भारताचे नसले तरी महाराष्ट्राचे समजले जाणारे दोन नेते शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर दिलखुलास मैत्रीचा खरा-खोटा वग विनातिकीट रंगवतात. निवडणुका जवळ आल्या की यांना परस्परांची कौटुंबिक मैत्री आठवते, सुप्रिया सुळे लहानपणी कशा बाळासाहेबांकडून कोडकौतुक करून घ्यायच्या यापासून ते सुप्रियाच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी बाळासाहेबांनी कशी मदत केली इथपर्यंतच नव्हे तर सामान्य मराठी माणसांना शिवसेनेने मोठे केले, अशी आश्चर्यकारक वाटतील अशी विधाने शरद पवार विविध वृत्तवाहिन्यांवरील मुलाखतीत करीत फिरतात. वृत्तवाहिन्यांचे वार्ताहरही हे अजब राजकीय तर्कट अगदी भक्तिभावाने श्रवण करतात. याचे कारण शरद पवार यांनी आपल्या या सा-या सोयीच्या मांडणीला महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा आणि राजकारणापलीकडच्या मैत्रीचा मुलामा मोठ्या हुशारीने मुलाखतीत आधीच जाहीर केलेला असतो. यात खरी गोची होते ती पक्षनेत्याचा शब्द देवासारखा झेलून काम करणा-या तळागाळातल्या कार्यकर्त्यांची. कालपरवापर्यंत केवळ पक्षाच्या नावावर एकमेकांच्या जिवावर उठलेल्या या कार्यकर्त्यांना काही कळेनासेच होते. मात्र पक्षातील पहिल्या आणि दुस-या फळीतील नेतेमंडळींना नेतृत्वाचे हे सारे खेळ माहीत असतात. याचे कारण या दोन्ही फळींतील नेतेमंडळी तरबेज गडी असतात. ते या खेळाबाबत अचानक टोपीबाज मौन धारण करतात. या आकस्मिक धूळफेकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मात्र एक वेगळाच संदेश जातो. पवारांना आणि बाळासाहेबांना अचानक एकमेकांचा उमाळा का आला हे महाकोडे जनतेपुढे येते आणि राज ठाकरे म्हणतात तशी एक राजकीय संभ्रमावस्था महाराष्ट्रात निर्माण होते. ठाकरे आणि पवारांना नेमके हेच साधायचे असते. ठाकरेंना महायुतीतील भाजपचे नाक दाबायचे असते तर पवारांना सोनियांचा वरचष्मा इथे चालवून घेणार नाही, हे दाखवत काँग्रेसला कोप-यात न्यायचे असते. जमल्यास राज ठाकरेंच्या करिश्म्याने राष्ट्रवादीच्या मुंबई - ठाण्यातील असल्या-नसलेल्या मतपेटीला आणखी तर खिंडार पडणार नाही ना, ही काळजात उठलेली कळही दाबायची असते.
आगामी पालिका निवडणुकांसाठी हा सारा वग ठाकरे व शरद पवार यांनी अचूक टायमिंग साधत उभा तर केला; पण त्याच्या परिणामांचा अंदाज तो दोघेही बांधत असतील त्याप्रमाणे नेहमीसारखा अचूक ठरला नाही. याचे कारण शरद पवार आणि पुतणे अजितदादा हे दोघेही राष्ट्रवादीचे सलामीचे फलंदाज असले तरी त्यांचे ‘गेम’ मात्र एकमेकांनाच ‘रन आऊट’ कसे करता येईल या दृष्टीने खेळले जात होते. त्याचप्रमाणे मुंबईच्या लोकसंख्येची भाषिक टक्केवारी, परंपरागत मतदारांचा कल, प्रथमच मतदान करणार असलेला युवा वर्ग हे सारे चित्र बदलले आहे. पवारांना तर मुंबईत कधीपासून पाय रोवायचे आहेत; पण ते त्यांना जमलेले नाही. राज्यातील सत्तेत भागीदार असूनही आणि दर पाच वर्षांच्या आत मुंबईचा अध्यक्ष बदलूनही पवारांना राष्टÑवादीची ताकद मुंबईत निर्माण करता आलेली नाही. हे त्यांचे राजकीय अपयश आहे की या महानगराची अजब मानसिकता आहे, याचे उत्तर भल्याभल्या राजकीय निरीक्षकांना देता येणार नाही. नोकरी-धंद्यासाठी येथे आलेला पुण्या-साता-याकडचा पश्चिम महाराष्ट्रातील मराठा, काही प्रमाणात बहुजन आणि तोंडी लावायला दलित आणि मुस्लिम मतदार असे गणित पवार मुंबईसाठी जमवतात. मात्र ती ताकदही पालिकेच्या चौदा-पंधरा मतदारसंघांच्या पलीकडे विजयाच्या भोज्याला शिवत नाही. मैत्रीच्या वगातील दुसरे नामी कलाकार ठाकरे यांच्यापुढे काहीही करून पालिकेची सत्ता राखण्याचे आव्हान दर निवडणुकीला बिकट होत चालले आहे. याचे कारण युवा वर्गाला संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास, शिवसेनेने दिलेले लढे, बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले राजकारण हे माहीत नाही, माहीत असण्याचे कारण नाही. ज्या पिढीला दिलखुलास राजकीय निर्णय घेणारे बाळासाहेब माहीत आहेत, ती वय वर्षे पन्नाशीच्या पुढची पिढी आता शिवसेनेच्या गेल्या काही वर्षांतील राजकारणाला कंटाळली आहे. शिवसेनेचा अस्सल वाघ आता थकला आहे हे या पिढीला जाणवते आहे.
या संभ्रमावस्थेच्याच पार्श्वभूमीवर आता मुंबई पालिकेची निवडणूक रंगणार आहे. याआधीच्या पालिका निवडणुकीत शिवसेनेची अर्थात कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची अब्रू काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी न झाल्याने झाकली गेली होती. मात्र या वेळी आघाडी झाल्यामुळे तिचे काय होईल ते शिवाजी पार्कवरील शिवछत्रपतींचा पुतळादेखील सांगू शकणार नाही. महायुती नावाच्या कडबोळ्याचा फैसला ही निवडणूक करणार आहे. मुंबईत भाजपची सद्य:स्थिती जी काही आहे, ती बहुतांशी गुजराती मतांच्या जोरावर आहे. यातील बहुतांश मते गुजरातचा दौरा करून आलेल्या आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी गुफ्तगू करीत मतदारांना राजकीय संदेश पोहोचवणा-या राज ठाकरेंकडे वळली तर आश्चर्य वाटायला नको. महायुतीतील तिसरे भागीदार रामदास आठवले हे दलितांचे स्वयंघोषित नेते आहेत. मात्र त्यांच्या पाठी किती आंबेडकरी जनता आहे, याचा अंदाज केवळ खडकवासल्याच्या निकालावर बांधता येणार नाही. काँग्रेसची म्हणून काही दलित मते आहेत आणि ती अढळ असतात. हे सारे लक्षात घेतले तर मुंबई, ठाण्याचे आणि अन्य शहरी भागातील मतदार सर्व जुना माल टाळून चकाकता फ्रेश मालच पसंत करतील. सध्याच्या भाषेत सांगायचे तर लोकशाहीची चिकनी चमेली निवडणुकीचा पव्वा लावून येते आहे. ठाकरे, पवार आदींनी तिच्याभोवतीचे नाचे आणि नेपथ्याचा माराही मतदारांवर सुरू केला आहे!
maharavindra@gmail.com
शिवसेना-भाजप युती पालिकेचा हिशेब चुकता करणार का?
युती-आघाड्यांची चर्चा सुरू असताना स्वबळाचीही तयारी