आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Team Anna Agitation Going Out Of Track Like A Black Comedy

टीम अण्णाची फसलेली ब्लॅक कॉमेडी (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्लॅक कॉमेडी या कलाप्रकाराची स्वत:ची परिभाषा असते. म्हणजे त्यामध्ये विषय गंभीर असतो, पण त्याची मांडणी विनोदाच्या अंगाने केलेली असते. याचा दुसरा अर्थ विनोदी अंगाने कलाकृतीचे सादरीकरण करताना विषयाच्या गांभीर्याचेही भान असणे गरजेचे असते. वास्तविक समाजातील ढासळलेल्या व्यवस्थेवर जळजळीत भाषेत टीका न करता विनोदाच्या रूपाने ती विसंगती लोकांपुढे ठेवावी व राजकीय-सामाजिक व्यवस्थेचे वाभाडे काढावेत असा हा कलाप्रकार. दोन दिवसांपूर्वी आम्ही दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर चाललेले भ्रष्टाचारविरोधी आंदोलन ब्लॅक कॉमेडीच्या दिशेने चालले आहे, म्हणजेच विषयाचे गांभीर्य हरवल्यामुळे तिचे हसे झाले आहे, असे म्हटले होते. आता ही ब्लॅक कॉमेडी सर्वच पातळ्यांवर फसत चालली आहे. भ्रष्टाचारासारख्या संवेदनशील विषयावर साधकबाधक चर्चा न करता, राजकीय प्रक्रियेत सामील न होता, व्यवस्थेच्या बाहेर राहून सरकारला केवळ धमक्या देत राहिल्याने हे आंदोलन दिशाहीन आणि भरकटत चालले असल्याचे आम्ही यापूर्वी म्हटले होते. त्याचे प्रत्यंतर आता स्पष्टपणे दिसू लागले आहे. या चळवळीतील एक अध्वर्यू शांती भूषण यांना सोमवारी रात्री एकाएकी साक्षात्कार झाला की हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारकडून नव्हे तर खुद्द इलेक्ट्रॉनिक मीडिया हाउसेसच्या मालकांकडून होत आहे. जंतरमंतरवर संपूर्ण देशातून येणारा ‘लाखों’चा जनप्रवाह मीडिया केवळ शेकड्यांमध्ये दाखवत असून या मीडिया हाउसेस सरकारच्या ताटाखालील मांजर झाल्याचा आरोप त्यांनी केला. शांती भूषण यांनी आरोपाच्या पुष्ट्यर्थ न्यूज चॅनल्सच्या टीआरपीचाही मुद्दा उपस्थित केला. शांती भूषण यांनी असा आरोप केल्यानंतर अण्णा समर्थकांना आयते बळ मिळाले. हे आंदोलन सुरू होऊन सात दिवस झाले तरी सरकारचा एकही प्रतिनिधी चर्चेला आला नसल्याने आंदोलकांचा धीर सुटत चालला असल्याने ते पिसाळले. त्यांनी पत्रकारांना शिव्यांची लाखोली वाहिली व त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. मग आंदोलनाचा नूरच पालटून गेला. मूळ मुद्दा राहिला बाजूला आणि मीडिया विरुद्ध टीम अण्णा असे अनपेक्षित रणकंदन प्रेक्षकांना पाहायला मिळाले. अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला सुरुंग लावण्याचे सरकारचे प्रयत्न एक वेळ लोक मान्य करतील, पण ज्यांच्या जिवावर हे आंदोलन गेले दीड वर्ष तग धरून आहे, त्यांच्याच विरोधात जर आंदोलनाचे कर्तेधर्ते बोलू लागले तर कुणाला संताप येणार नाही? नमकहरामी करावी पण ती या पातळीवर! असा संताप टीव्ही पत्रकारांकडून लगेचच व्यक्त होऊ लागला. टीम अण्णा आणि खुद्द अण्णा हजारे यांचा टीआरपी घसरला आहे तो आमच्यामुळे नाही, अशी मल्लिनाथी पत्रकारांना आपल्याच चॅनलवर करावी लागली. देशापुढे दुष्काळ, उत्तर भारतातील गायब झालेली वीज असे महत्त्वाचे प्रश्न असताना त्यांच्या बातम्या आम्ही द्यायच्या नाहीत का? जंतरमंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनाला पहिल्या दिवसापासूनच लोकांनी नाकारले त्यात आमचा दोष काय? गेल्या वर्षी हजारोंच्या घरात गर्दी जमली होती ते आम्ही दाखवले होते. आता गर्दीच नाही तर जमिनीवरील पथा-या दाखवू का, असे हे पत्रकार बोलू लागले. पत्रकारांचा हा त्रागा आणि पवित्रा बघितल्यानंतर टीम अण्णाला आपल्या आंदोलनाचा टेकू जाण्याची भीती वाटली. मग सकाळी उठल्याउठल्या केजरीवाल आणि अण्णांचा माफीनामा सुरू झाला. अण्णांनी आपल्या सहका-यांना गांधींच्या अहिंसेचे महत्त्व पुन्हा पटवून दिले. केजरीवाल यांनी मीडियाच्या मालकांनीच सदसद्विवेकबुद्धी दाखवून भ्रष्ट सरकारच्या मागे उभे राहू नका असा सल्ला दिला. पण या दोघांनी शांती भूषण यांना उपोषणस्थळी आणले नाही वा त्यांच्याकडून माफीनामा वदवून घेतला नाही. वास्तविक टीम अण्णामधील शांती भूषण आणि प्रशांत भूषण यांनी या आंदोलनाला याअगोदरही अडचणीत आणले होते. गेल्या वर्षी प्रशांत भूषण यांनी काश्मीरसंदर्भात वादग्रस्त विधान करून अण्णांनाच तोंडावर पाडले होते. आता त्यांच्या पिताश्रींनी मीडियाच्या विरोधात बोलताना आपल्या सहका-यांशी चर्चा केली नसल्याचे स्पष्ट दिसून आले. टीम अण्णामध्ये एक तर सुसंवाद नाही, त्यांच्याकडे उद्दिष्टे नाहीत. त्यामुळे कोणाच्याही हातात माइक आला की जो तो त्याला वाटेल ते बरळतो, असे या आंदोलनाचे स्वरूप झाले आहे. दुसरीकडे या भ्रष्टाचारविरोधी चळवळीतील आणखी एक ‘क्राउडपुलर’ योगगुरू बाबा रामदेव यांनी तीनएक दिवसांपूर्वी गुजरातेत जाऊन मोदीबाबांच्या चरणी आपल्या निष्ठा वाहून आपला अजेंडा टीम अण्णापेक्षा वेगळा असल्याचे दाखवून दिले होते. बाबा रामदेव यांची रंगमंचावरील मोदीनिष्ठा टीम अण्णांच्या तथाकथित धर्मनिरपेक्ष आंदोलनामध्ये एक पाचर होती आणि त्यामुळे संघवालेही सुखावले होते. संघाने या आंदोलनातील मनुष्यबळ आणि नेपथ्यरचना काढून घेतल्याने टीम अण्णाचे लॉजिस्टिक बिघडले आहे हे दिसून येते. त्यामुळे या बिकट परिस्थितीत बाबा रामदेव यांच्यावर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली तर त्यांच्या कृपाशीर्वादाने सध्या जंतरमंतरवर दिसणारी शेकड्यांमधील गर्दी, टीम अण्णा चौकडीपुरती मर्यादित होण्याची भीती आहे. अशा वेळी जेवढे शक्य आहे तितके दिवस आंदोलन आहे त्या बळावर रेटून न्यायचे इतके मर्यादित उद्दिष्ट टीम अण्णाकडे राहिले असल्याने आणि त्यातच सरकारने आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने भावनिक स्टंट करण्यापलीकडे कोणताही पर्याय टीम अण्णाकडे राहिलेला नाही. आमची सध्याची लढाई ‘आरपार की’ आहे, असे उच्चरवाने बोलणा-या नकलाकार बेदीबाई आणि गर्दी हा काही चळवळीचा उद्देश नाही असे म्हणणारे केजरीवाल यांना यापुढे टीव्हीवाले टीआरपी देण्याची शक्यता नसल्याने हा तमाशा देशव्यापी प्रेक्षकांसाठी दिवसेंदिवस असह्य होत जाणार आहे. ब्लॅक कॉमेडीत पटकथा उत्तम असली तरीही नटमंडळींचे टायमिंग चुकले की चित्रपट फसतो आणि चित्रकर्त्यांच्या मुखभंगासोबतच प्रेक्षकांचा रसभंगही होतो. टीम अण्णाच्या आंदोलनाचे टायमिंग वेगाने बिघडत चालले आहे. विषयाचे गांभीर्य हरवलेली ब्लॅक कॉमेडी फसत चालली आहे.