आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसंख्यावाढीची चिंता : रास्त की अनाठायी?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘जागतिक लोकसंख्या दिन’ या औचित्याचा अर्थ काय? या दिवसाच्या निमित्ताने आपण वाढत्या लोकसंख्येची चिंता करायची की लोकसंख्या नियंत्रणाच्या उपाययोजनांवर गंभीरपणे चर्चा करायची? लोकसंख्या दिन साजरा करायचा की गांभीर्यपूर्वक पाळायचा?
‘दि पॉवर आॅफ पॉप्युलेशन इज सो सुपीरिअर टु पॉवर आॅफ अर्थ टु प्रोड्युस सब्सिस्टन्स फॉर मॅन, दॅट प्रिमॅच्युअर डेथ मस्ट इन सम शेप आॅर अदर विझिट दी ह्यूमन रेस’- एसे आॅन पॉप्युलेशन-थॉमस रॉबर्ट माल्थस (1766-1834)
काय होणार या पृथ्वीचे? कसा पेलवणार लोकसंख्यावाढीचा हा भार? कितीओरबाडणार पृथ्वीला? अशा अनेक चिंता वाहणाºया तमाम लोकांच्या भावनाच जणू माल्थसने त्याच्या नावाजलेल्या निबंधाद्वारे व्यक्त केल्या होत्या. माल्थस हा 19व्या शतकातला इतिहास आणि राजकीय अर्थशास्त्राचा ब्रिटिश अभ्यासक. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरवताना नैसर्गिक स्रोत धोक्यात येऊन, अन्नधान्याचा तुटवडा भासेल आणि त्यातून दुष्काळ, दंगेधोपे, युद्धे अशी अराजकसदृश परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा त्याने लोकसंख्यावाढीचा सिद्धांत मांडताना दिला होता. गेल्या शतकभराचा जागतिक पातळीवरील लोकसंख्यावाढीचा वेग पाहता माल्थसचे म्हणणे खरे ठरत असल्याचे वरकरणी जाणवत होते. त्यातूनच पृथ्वी एवढ्या प्रचंड लोकसंख्येचा भार पेलण्यास समर्थ नसल्याचेही अनेकांनी जाहीर करून टाकले होते.
तब्बल 208 वर्षांपूर्वी, म्हणजेच 1804 मध्ये जगाने लोकसंख्येचा 100 कोटींचा आकडा गाठला होता. परंतु 200 कोटींचा आकडा गाठण्यासाठी पुढची 123 वर्षे (1927) जावी लागली. त्यानंतर मात्र विलक्षण वेगाने जगाची लोकसंख्या वाढतच गेली. 300 कोटींचा आकडा पुढील 32 वर्षांतच(1959) गाठला गेला. पुढच्या 15 वर्षांत (1974) जगाची लोकसंख्या 400 कोटी झाली. 500 कोटींसाठी केवळ 13 वर्षे (1987) पुरली. पुढच्या 11 वर्षांत (1998) हा आकडा 600 कोटींवर पोहोचला आणि गेल्या वर्षी (2012) जगाने 700 कोटींचा टप्पाही ओलांडला. याचाच अर्थ, 1927 ते 2012 या दरम्यानच्या केवळ 85 वर्षांत जगात 500 कोटींची भर पडली! 2011 मध्ये प्रकाशित झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालावर विश्वास ठेवायचा तर 2050 पर्यंत जगाच्या लोकसंख्येत आणखी 230 कोटींची भर पडलेली असेल. त्याच्यापुढील 50 वर्षांत म्हणजे 2100 मध्ये जगाने 1000 कोटींचा आकडा पार केलेला असेल. अर्थात, लोकसंख्येच्या वाढीने या घटकेला वेग घेतलेला असला तरीही याच काळात वाढता जन्म आणि मृत्यूदराचा टप्पा ओलांडून घटत्या जन्म आणि मृत्यूदराचेही आवर्तन अनुभवास आले. येमेनसारख्या देशात जेथे 1970 च्या दशकात एक स्त्री सरासरी 9 मुलांना जन्म देत होती, ते प्रमाण घटून पाचवर आले. चीनने तर ‘एक दांपत्य-एक अपत्य’ ही योजना सक्तीच्या बळावर राबवण्यास प्रारंभ केला. भारतातील जन्मदर 5.9 वरून 2.6 असा स्थिरावला. तरीही पृथ्वीचे काही खरे नाही असे वाटणे काही थांबले नाही. दरम्यानच्या काळात लोकसंख्या विस्फोटाचे दृश्य परिणाम म्हणता येईल अशा अन्नधान्य, पाणी नि इतर नैसर्गिक ऊर्जास्रोतांच्या तुटवड्यातून हिंसक संघर्षाच्या घटना जगभरात वरचेवर नोंदल्या गेल्या. पुन्हा एकदा माल्थसचे भाकीत खरे ठरल्याचा सूर उमटला. लोकसंख्यावाढ रोखली गेली पाहिजे, म्हणणाºयांचा आवाज उंचावला. पण ही परिस्थिती एरवी लोकसंख्यावाढीमुळे उद्भवते, साधनसंपत्तीच्या असमतोल वाटपामुळे उद्भवते, की सामूहिक बुद्धिकौशल्यास म्हणजेच ‘कलेक्टिव्ह इंटेलिजन्स’ला पोषक वातावरण नसल्याने उद्भवते? कायदे करून लोकसंख्यावाढ रोखता येते की जीवनविकासाशी संबंधित घटक म्हणजेच, औद्योगिकीकरण, त्यातून येणारी सुबत्ता, समृद्धी, स्त्रीशिक्षण, उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा यातून लोकसंख्येवर नियंत्रण मिळवता येते आदी विचार करण्यास भाग पाडणारे प्रश्नही पाठोपाठ उपस्थित झाले.
मुळात, माल्थसने जेव्हा लोकसंख्या वाढीतून उद्भवणाºया अराजकाचे भाकीत वर्तवले होते, तेव्हा युरोपात औद्योगिकीकरणाला नुकताच प्रारंभ झालेला होता. ‘कलेक्टिव्ह इंटेलिजन्स’चे थक्क करून सोडणारे आविष्कार दृश्यमान झालेले नव्हते. परंतु औद्योगिक क्रांतीने वेग घेतला तसे त्याचे पडसाद सर्व जगभर उमटत गेले. पाठोपाठ आलेल्या समृद्धी आणि प्रगतीने माल्थसचा सिद्धांत फार काळ टिकणार नाही हेही जाणवू लागले होते. पण त्याच वेळी जगभरातच विषमतेचेही नवे पर्व सुरू झाले होते. जमिनीपासून अन्नधान्य, इंधन, आदींपर्यंतच्या नैसर्गिक-अनैसर्गिक स्रोतांच्या वाटपातही विषमता डोकावत होती. म्हणजेच एका बाजूला लोकसंख्यावाढ होत होती आणि माणसा-माणसांतील संघर्षाला धग देणारी विषमतासुद्धा फोफावत होती. यात लोकसंख्या भाराचा प्रत्यक्षात किती संबंध होता? मधल्या काळात अमेरिकी विचारवंत बकमिन्स्टर फुलर यांनी अस्तित्वात आहे त्यापेक्षा तिप्पट लोकसंख्येचा भार पेलण्याची ताकद पृथ्वीमध्ये असल्याचा युक्तिवाद करून माल्थस समर्थक अभ्यासकांना एक प्रकारे आव्हानच दिले होते. त्यांच्या मते, मानव आणि निसर्ग यांच्यातील सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी जगण्यालायक भूप्रदेश आणि माणसे (सध्या 20 देशांत जगातली 70 टक्के लोकसंख्या सामावली आहे, तर 196 देशांतील जमिनीवर निव्वळ 30 टक्के लोकसंख्येचा भार आहे.) यांचे योग्य वाटप होणे गरजेचे आहे. या घटकेला आपला शेजारी असलेला बांग्लादेश (जन्मदरात 6.8 वरून 2.7 अशी घट होऊनही) हा कमी क्षेत्रफळावर अधिक लोकसंख्या असलेला जगातील सर्वात गजबजलेला देश आहे. याउलट कॅनडाची लोकसंख्या महाराष्ट्राच्या एक तृतीयांश म्हणजेच तीन कोटींच्या आसपास आहे. परंतु क्षेत्रफळ मात्र महाराष्ट्राच्या तब्बल नऊपट मोठे आहे. जे कॅनडाच्या बाबतीत तेच थोड्याफार प्रमाणात 2 कोटी लोकसंख्येच्या ऑस्ट्रेलियासही लागू आहे. या दोन्ही देशांतील जगण्यायोग्य भूभाग वापरात आणायचा म्हटले तर आताच्या दहापट लोक तेथे वास्तव्य करून साधनसंपत्तीचा उपभोग घेऊ शकतात. प्रत्यक्षात असे झाले तरच पृथ्वीच्या विशिष्ट भागावर पडत असलेल्या भाराचेही योग्यरीत्या संतुलन साधता येऊ शकते. जगाच्या संतुलनाचा विचार मांडणाºया फुलर यांच्या मताला पुष्टी देताना ब्रिटिश जीवशास्त्र अभ्यासक मॅट रिडली यांनी त्यांच्या गाजलेल्या ‘रॅशनल आॅप्टिमिस्ट’ नावाच्या ग्रंथात निराशावाद्यांना वाटत असलेली लोकसंख्यावाढीची भीती अनाठायी आहे, हे सोदाहरण पटवून दिले आहे. शिवाय ‘माल्थुसियन ट्रॅप’ हा विनाकारण चकवा निर्माण करणारा आहे, असे आग्रही मतही त्यांनी नोंदवले आहे. त्यांच्या मते, माल्थसला अपेक्षित असलेली अराजकसदृश परिस्थिती जेव्हा कधी निर्माण झाली त्यामागे लोकसंख्यावाढ नव्हे, तर मानवाच्या बुद्धी आणि कार्यकौशल्याच्या (कलेक्टिव्ह इंटेलिजन्स) मर्यादा हेच महत्त्वाचे कारण होते.
कमी लोकसंख्येमुळे जगात सुख-शांती नांदेल ही कल्पना फसवी आहे. मर्यादित लोकसंख्या मानवी प्रगती आणि समृद्धीला प्रसंगी घातकही ठरू शकते, असेही रिडली यांना ठामपणे मांडायचे आहे. या संदर्भात युक्तिवाद करताना ते असेही म्हणतात की मर्यादित लोकसंख्या बुद्धी आणि कार्यकौशल्याच्या आदान-प्रदानावरही मर्यादा आणते. एकदा माणूस स्वत:ला स्वयंपूर्ण मानू लागला की संकल्पना विकासाचे मार्गही खुंटतात. एरवी कितीही विपरीत परिस्थिती आली तरीही संकल्पना-आविष्काराच्या आदान-प्रदानातूनच जग तरत असते. त्यातूनच माणूस नियोजन, दूरदृष्टी आणि विवेकबुद्धीच्या बळावर वाळवंटी प्रदेशात पाण्याचे झरे निर्माण करतो आणि ओसाड जमिनीवर अन्नधान्यही पिकवतो. आतासुद्धा जगाची लोकसंख्या 700 कोटी आहे. म्हणजे, फक्त खाणारी तोंडे वाढलेली नाहीत तर श्रमणारे हातही वाढले आहेत आणि मानवी अस्तित्वासाठी आवश्यक संकल्पना देवाण-घेवाणीचे क्षेत्रही विस्तारले आहे.