आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एक था टायगर’मुळे पाकचे पित्त खवळले! आयएसआयची बदनामी केल्याचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- सलमान खानचा आगामी चित्रपट ‘एक था टायगर’च्या जाहिराती टीव्हीवर दाखवू नयेत, असे निर्बंध पाकिस्तानने आपल्या केबलचालकांवर घातले आहेत. या चित्रपटात पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयची बदनामी केल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे.
पाकिस्तानातील सर्व उपग्रह टीव्ही वाहिन्या आणि केबलचालकांना मागील आठवड्यात पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी आॅथोरिटीने (पीईएमआरए) पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘एक था टायगर’ जगभरात 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून, चित्रपटाची कथा ‘आयएसआय’ आणि ‘रॉ’च्या कारवायांवर आधारित आहे. मुळात या चित्रपटाची कथा आयएसआयची प्रतिमा खराब करण्याभोवती फिरते, असे या पत्रात म्हटले आहे. सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सेन्सॉरकडून या चित्रपटाला ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय चित्रपटाचे प्रोमो, रिव्ह्यू दाखवू नयेत, या प्रकरणास सर्वाेच्च प्राधान्य देण्यात यावे आणि देशाची प्रतिमा उंचावण्याची काळजी घ्यावी, असे निर्देश पीईएमआरएने दिले आहेत. या चित्रपटात रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंगच्या (रॉ) एका गुप्तहेराची भूमिका सलमान करीत असून पाकिस्तानला क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकणाºया एका प्राध्यापकावर नजर ठेवण्यासाठी त्याला पाकिस्तानात पाठवण्यात येते. कॅटरिना कैफचीही भूमिका असलेला हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट कबीर खानने दिग्दर्शित केला आहे. मार्चमध्ये ‘एजंट विनोद’ या चित्रपटावरही याच कारणामुळे पाकिस्तानात बंदी घातली होती. त्यात सैफ अली खानची मुख्य भूमिका होती. सैफचे काका मेजर जनरल इस्फांदयार अली खान पतौडी आयएसआयमध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत.
बॉलीवूडचाच आधार- स्थानिक चित्रपट दाखवणा-या पाकिस्तानातील चित्रपटगृहांना पैसे कमावण्यासाठी बॉलीवूडच्या चित्रपटांचाच आधार आहे. पाकिस्तानमध्ये सलमान खानच्या चित्रपटांनी नेहमीच चांगला व्यवसाय केला आहे. वाँटेड, दबंग आणि बॉडीगार्ड हे चित्रपट तेथे प्रचंड चालले. यातील ‘बॉडीगार्ड’ हा चित्रपट वितरकांना आणि चित्रपटगृहचालकांना सर्वात जास्त पैसे मोजून खरेदी करावा लागला आणि मागील ईदच्या काळात या चित्रपटाने सुमारे चार ते पाच कोटींचा व्यवसाय केला.