आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक राष्ट्रपती झरदारींच्या प्रवक्त्याचे मेल अकाउंट हॅक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानचे राष्ट्रपती असीफ अली झरदारी यांच्या प्रवक्त्याचा ई-मेल हॅक करण्यात आल्याचे उघड झाले असून त्यात ‘मेमोगेट’ प्रकरणाचा संदेश होता, असे सांगण्यात येते. दरम्यान, पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत हुसैन हक्कानी यांना या प्रकरणामुळे पद सोडावे लागले आहे.
झरदारी यांच्या प्रवक्त्याचे नाव फरहातुल्लाह बाबर असे आहे. विशेष म्हणजे हक्कानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बाबर यांचा मेल हॅक झाल्याचे सांगण्यात येते. ही घटना मंगळवारी रात्री घडली. पाकिस्तानी-अमेरिकन उद्योगपती मन्सूर इजाझ यांनी अमेरिकेचे माजी लष्करप्रमुख माईक मुलेन यांना केलेल्या गुप्त पत्रव्यवहार प्रकरणी राजीनामा देण्यासंबंधी विचारणा करणारा हा मेल होता. पंतप्रधान युसूफ रजा
गिलानी यांच्याकडून हा मेल आला होता. हा पत्रव्यवहार इजाझ यांनी मीडियाला दिला.
मेल हॅक झाल्यानंतर बाबर यांनी तातडीने केंद्रीय गुप्तहेर यंत्रणेकडे धाव घेतली. या संदर्भात तपास करण्याची मागणी त्यांनी यंत्रणेकडे केली आहे. बाबर यांनी तातडीने तक्रार केल्यानंतर गुप्तहेर यंत्रणा कित्येक तास बाबर यांचे अकाऊंट रिस्टोर करण्याचा प्रयत्न करत होती. नंतर त्यांना त्यात यश आले.
आता तपास अधिकारी हॅकरचा शोध घेत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मेमोगेट प्रकरणी हक्कानी यांना मंगळवारी राजीनामा द्यावा लागला होता. लष्कराकडून सत्ता पालट करण्याच्या भीतीने राष्ट्रपती झरदारी यांनी मदत मागितली होती. या संदर्भातील पत्र हक्कानी यांनी पाठवल्याचा त्यांच्यावर संशय आहे.