आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर लो मीडिया मुठ्ठी में...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'एका बाजूला पाच राज्यांतील विधानसभा आणि 2014मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रंगमंचावरील नाट्य अधिकाधिक तीव्र होत चालले आहे, तर दुसर्‍या बाजूला जनमानसावर प्रभाव असलेल्या न्यूज चॅनेल इंडस्ट्रीत बड्या उद्योगसमूहांच्या वतीने कधी प्रत्यक्षपणे, तर कधी अप्रत्यक्षपणे समभाग खरेदी-विक्री आणि भांडवली हिस्सा वाढवण्याच्या सूत्रबद्ध हालचाली झालेल्या आहेत. याच अनुषंगाने गेल्या दोन वर्षांत टीव्ही-18, नेटवर्क-18, इनाडू हे भिन्न मालकीहक्क असलेले प्रभावी माध्यम समूह उद्योगपती मुकेश अंबानींच्या साम्राज्यछत्राखाली एकटवल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. टेलिव्हिजन मीडियामध्ये अंतर्गत पातळीवर होत असलेले हे बदल लोकसभा निवडणुकीपर्यंत घडून येणार्‍या राजकीय नाट्याचा रोख, पात्र आणि दृश्यरचना निश्चित करणारे ठरणार आहेत, यावर जाणकारांमध्ये दुमत नाही. या पार्श्वभूमीवर न्यूज चॅनेल इंडस्ट्रीतल्या या बदलांवर टाक लेला हा प्रकाशझोत...'

गेल्या दशकभरात प्रत्येक उद्योगाचा चेहरामोहरा पार बदलून गेला आहे. यात माध्यम उद्योग तरी मागे कसे राहणार? खरे तर माध्यमांकडे उद्योग म्हणून पाहण्यास याच काळात प्रारंभ झाला. त्यापूर्वी वृत्तपत्रांकडे व्यवसाय म्हणून नव्हे तर एक समाजसेवेचे, जनजागृतीचे साधन म्हणून पाहिले जात होते. मात्र, हा काळ संपुष्टात आला आणि वृत्तपत्रांना धंदेवाईक वळण घ्यावे लागले. आपल्याकडे एकेकाळी माध्यम उद्योगात वृत्तपत्रांचा वरचष्मा होता. अर्थातच, त्या काळी वर्तमानपत्र हेच प्रमुख माध्यम होते. मात्र, गेल्या दशकात वृत्तपत्रांचा दबदबा कमी होत गेला आणि चॅनेल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वरचष्मा स्थापन झाला. पूर्वी म्हणजे आर्थिक उदारीकरणाचे युग सुरू होण्याअगोदरच्या काळात देशात इंडियन एक्सप्रेस व टाइम्स ऑफ इंडिया ही दोन वृत्तपत्रे आणि ती प्रकाशित करणारे एक्स्प्रेस आणि बेनेट कोलमन अँड कंपनी हे समूह ठसठशीतपणे वाचकांच्या डोळ्यात भरत. हे वृत्तपत्रसमूह त्या काळी माध्यमसम्राट पदावर दावा सांगत होते.अर्थात, त्या काळी ‘माध्यमसम्राट’ हा शब्द काही रूढ नव्हता, त्यामुळे ही उपाधी त्यांना कोणी बहाल केली नाही. हा शब्द जागतिक पातळीवर ओळखला जाऊ लागला, तो ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या व अमेरिकेचे नागरिकत्व घेतलेल्या रुपर्ट मरडॉक यांच्यामुळे. मरडॉक यांची वृत्तपत्रे, चॅनेल, वेबसाइटचे साम्राज्य पाचही खंडात पसरले आहे. भारतात वृत्तपत्रांमध्ये विदेशी गुंतवणुकीला परवानगी नसल्याने मरडॉक यांच्या मालकीची वृत्तपत्रे नसली तरी चॅनेल मात्र आहेत. मरडॉक यांच्यासारखा भारतात एखादा माध्यमसम्राट जन्म घेईल का? असा प्रश्न अनेकांना आजवर पडला होता, मात्र देशातील माध्यमसम्राट म्हणून आता धीरूभाई अंबानी यांचे थोरले पुत्र मुकेश अंबानी यांचा उदय होत असल्याची चाहूल माध्यम जगताला लागली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

गेल्या काही वर्षांत माध्यम क्षेत्रात घडत गेलेल्या बदलांकडे बारकाईने नजर टाकल्यास हे लक्षात येईल की, गेल्या पाच वर्षांत मुकेशभार्इंनी हे क्षेत्र काबीज करण्याचा नियोजनबद्ध सपाटा लावला आहे. खरे तर 1990च्या दशकात मुकेश व अनिल या दोघा भावंडांनी प्रसिद्धी माध्यमांचे त्या काळी असलेले महत्त्व ओळखून प्रथम निरलॉनच्या मालकीचे ‘विकली कॉमर्स’ ताब्यात घेतले. ते दैनिक करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यानंतरच्या काही काळातच ‘जयको’कडे मालकी असलेले ‘संडे ऑब्झर्व्हर’ हे साप्ताहिक पत्र विकत घेतले व नंतर राजकीय व आर्थिक विषयाला वाहिलेले ‘ऑब्झर्व्हर ऑफ बिझनेस अँड पॉलिटिक्स’ हे गुलाबी कागदावरील दैनिक मोठा गाजावाजा करून सुरू केले. परंतु त्या वेळी अंबानी समूहाचा हा प्रयोग काही यशस्वी झाला नाही आणि काळाच्या ओघात हे दैनिकही लुप्त झाले. परंतु माध्यम उद्योगातील पदरी आलेल्या अपयशाने खचून न जाता मुकेश अंबानी यांनी बदलत्या काळाला अनुरूप अशा इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रवेश करण्याची योजना आखली. ‘ऑब्झर्व्हर’चे अपयश पचवून 15 वर्षांचा काळ लोटला होता आणि या काळात माध्यम उद्योगात आमूलाग्र बदलही झाले होते. या दरम्यान अंबानी यांची आर्थिक ताकदही वाढली होती. रिलायन्स हा समूह केवळ देशातच नव्हे, तर विदेशातही पसरला होता. वस्त्रोद्योग, प्लास्टिक, पेट्रोकेमिकल्स, रसायन, वीज, वित्तीय, रिटेल या उद्योगात बाजारपेठ काबीज केल्यावर अंबानी यांना स्वत: आपण माध्यमात असण्याची गरज भासू लागली होती. त्यामुळे अंबानींनी सुरुवातीला माध्यमांना आर्थिक अडचणींच्या काळात पैशाचा पुरवठा करून त्यांना आपल्या छत्रछायेखाली आणले व नंतर त्यांच्या कंपन्यांतील भांडवल खरेदी करून प्रत्यक्ष ताबा मिळवण्याचा सपाटा लावला.
परिणामी आज स्टार, झी या कंपन्यांच्या चॅनेल्सच्या व्यतिरिक्त शिल्लक राहिलेल्या बहुतांश न्यूज व करमणुकीच्या चॅनेल्सचा अप्रत्यक्षपणे अंबानींनी ताबा घेतल्याचे दिसत आहे. उद्योगविश्वातील जाणकारांच्या मते, 2006मध्ये आर्थिक अडचणीच्या काळात मुकेश अंबानी यांनी आंध्र प्रदेशातील इनाडू समूहाला काही हजार कोटींची आर्थिक मदत देऊ केली.

इनाडू समूहाच्या ताब्यात प्रादेशिक भाषांतली डझनभर चॅनेल्स, आंध्र प्रदेशातील तेलुगूतील सर्वाधिक खपाचे ‘इनाडू’ हे दैनिकही होते. खरे तर या समूहात ब्लॅकस्टोन या विदेशी गुंतवणूकदार कंपनीने 26 टक्के गुंतवणूक केली होती. मात्र, त्यांनी कालांतराने ही गुंतवणूक विकण्याचा निर्णय घेतला. आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी इनाडूच्या प्रवर्तकांना ही कंपनी अंबानींनी स्थापन केलेल्या स्वतंत्र ट्रस्टला विकण्याशिवाय अन्य काहीच पर्याय राहिला नाही. त्या वेळी ही गुंतवणूक खरेदी करण्यासाठी रिलायन्ससह अन्य कुणीही पुढे आले नाही, असे निरीक्षण जाणकारांनी नोंदवले आहे. मात्र,रिलायन्सच्या वतीने या व्यवहाराची अधिकृत घोषणा तब्बल सहा वर्षांनी म्हणजेच, 2012मध्ये झाली. अशा प्रकारे इनाडू समूहावर ताबा मिळविल्यावर रिलायन्सने ‘इन्फोटेल’ नावाची उपकंपनी स्थापन करून आपला मोर्चा अन्य चॅनेल्सकडे वळविला. टीव्ही-18, नेटवर्क 18 मीडिया (यात सीएनएन-आयबीएन, आयबीएन-7, सीएनबीसी-सीएनबीसी आवाज, कलर्स आदींचा समावेश आहे.) या कंपनीला ताब्यात घेण्यासाठी त्यांनी टीव्ही-18च्या प्रवर्तकांशी करार केला. या कराराची रिलायन्सने 2012मध्ये अधिकृत घोषणाही केली. उद्योगविश्वातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार हा करार एवढा क्लिष्ट होता, की नेमका हा व्यवहार काय आहे, याचा अनेकांना पत्ताच लागला नाही. नेटवर्क 18च्या माध्यमातून रिलायन्सने इनाडू समूहातील आपली गुंतवणूक वाढवली आणि नेटवर्क 18वरही ताबा मिळवला. परंतु ही थेट गुंतवणूक करण्यापेक्षा अप्रत्यक्ष गुंतवणूक करण्याकडे रिलायन्सचा कल जास्त होता. एकीकडे मुकेशभाई माध्यम उद्योगात जोरदार धडका देत असताना, अनिल अंबानी यांनीदेखील करमणुकीच्या क्षेत्रात आपले बस्तान बसविण्याचा मोठा प्रयत्न केला. चित्रपट व विविध करमणुकीच्या कार्यक्रमांची निर्मिती करण्यासाठी अनिल यांनी रिलायन्स एंटरटेनमेंट ही कंपनी स्थापन केली होतीच. त्यात त्यांनी मनमोहन शेट्टीच्या मालकीची अ‍ॅडलॅब ही चित्रपट उद्योगातली बडी कंपनी ताब्यात घेतली. बिग टीव्ही हा एक आघाडीचा ब्रँड बनवला. जागतिक कीर्तीचे नामवंत निर्माता-दिग्दर्शक स्पिलबर्ग यांना चित्रपट निर्मितीसाठी करारबद्ध केले, त्या वेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनिलभार्इंची वित्तीय कंपनी रिलायन्स कॅपिटलने ब्ल्यूमबर्ग युटीव्ही या चॅनेल्सच्या कंपनीत 18 टक्के भांडवल खरेदी केले. अशा प्रकारे अनिल अंबानी यांनी करमणूक क्षेत्रावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले असताना त्यांनी करमणुकीच्या चॅनेल्समध्ये गुंतवणूक केली. मात्र, मुकेश अंबानी यांनी केवळ करमणुकीच्याच नव्हे तर न्यूज चॅनेल्सवर ताबा मिळविण्याचे लक्ष्य ठरविले आहे. काही हिंदी न्यूज चॅनेल्समध्येही त्यांनी मोठ्या प्रमाणात बेनामी गुंतवणूक केल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर एकेकाळी रिलायन्स समूहावर 1980च्या दशकात तोफ डागणार्‍या एका इंग्रजी व भाषिक दैनिकाच्या समूहातील त्यांची गुंतवणूकही केवळ गॉसिप पातळीवर नव्हे तर वास्तवात असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा प्रकारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या मुकेश अंबानी यांनी गेल्या काही वर्षांपासून आपल्या ताब्यात माध्यम येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. नव्या माध्यमसम्राटाच्या उदयाची चाहूल देणारी ही घटना केवळ भारतीय माध्यम नव्हे तर उद्योग क्षेत्राचाही चेहरामोहरा बदलणारी ठरणार असली तरीही, देशात मोठ्या प्रमाणात बिझनेस इंटरेस्ट असलेल्या रिलायन्ससारख्या एकाच बड्या समूहाच्या उपकंपन्यांकडे चॅनेल्सचे नियंत्रण येणे, मीडियातील लोकशाहीसाठी कितपत योग्य आहे, हा प्रश्न माध्यमतज्ज्ञांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारा ठरणार आहे.
(Prasadkerkar73@gmail.com)