आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जनशील 'गिरीश कुलकर्णी'

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या गिरीश कुलकर्णी या गुणी कलावंताला नुकताच देऊळ या चित्रपटासाठी अभिनेता म्हणून राष्‍ट्रीय अवॉर्ड मिळालं तेव्हा सगळ्या बॉलीवूडच्या नजरा उंचावल्या आणि हा आहे तरी कोण असा प्रश्न त्यांना पडू लागला. कारण दुसरीकडे डर्टी पिक्चरसाठी अभिनेत्री म्हणून विद्या बालनला सन्मान मिळाला होता. गिरीशने मात्र नेहमीप्रमाणे आपल्या शांत आणि संयमी स्वभावानुसार या सगळ्याला मी माहीत असणं अपेक्षितच नाहीये आणि ते बरंही आहे, असा प्रतिसाद दिला.
खरं तर गिरीशच्या विहीर या गाजलेल्या सिनेमाला अमिताभ बच्चनच्या एबी कॉर्पचे आर्थिक साहाय्य होते. तरी देखील बॉलीवूडच्या लोकांना तो माहीत नसावा हे आश्चर्य आहेच. पण यावरूनच त्यांचं चांगल्या सिनेमाविषयी व कलावंताविषयी असलेलं प्रेमही दिसून येतं. खरं तर याआधीही गिरीशला राष्‍ट्रीय पारितोषिक मिळालेलं आहे. त्याने एफटीआयआयला असताना केलेल्या गिरणी या लघुपटासाठी त्याला 2005 सालचं सर्वोत्तम नॉन-फिचर फिल्म असं पारितोषिक मिळालेलं आहे. याशिवाय महाराष्‍ट्र शासनाचा पुरस्कारही मिळालेला होता. म्हणूनच की काय आम्ही शांतपणे आमच्या पद्धतीने सिनेमा तयार करतो. बरंय आम्ही मुंबईपासून लांब आहोत असं एकदा गिरीशने म्हटलं होतं ते यासाठीच.
गिरीश मूळचा पुण्याचा. पुण्याच्या गल्ल्याबोळांमध्ये तो वाढला. त्यांनंतर त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा लातूरमधून पूर्ण केला. लातूरमध्ये शिकत असताना तो त्याला स्थानिक नाट्य स्पर्धा, संस्था येथे जाऊ लागला. तेव्हा त्याला नाटक, सिनेमा यांची आवड निर्माण झाली. परंतु नोकरी करणे पैसे कमावणे तर भाग होते म्हणून डिप्लोमा झाल्यावर तो एका खासगी कंपनीमध्ये काम करत होता. पण त्याने नोकरी सोडली आणि लेखक म्हणूनच करिअर कराण्याचा निर्णय घेतला.
एफटीआयआयमध्ये असताना त्याने गिरणी हा लघुपट तयार केला. तो चांगलाच गाजला आणि त्याला राष्‍ट्रीय पारितोषिकही मिळालं. तेव्हा त्याचं नाव चर्चेत आलं. त्यानंतर त्याचा वळू हा सिनेमा तयार केला. त्यात त्याची व उमेश कुलकर्णी यांची कथा आणि पटकथा होती. गिरीशने त्यात कामही केलं होतं. हा सिनेमा वेगळ्या पठडीचा, नर्मविनोदी होता. तोदेखील प्रेक्षकांना आणि समीक्षकांना आवडला. त्यानंतर गिरीशने शेतक-यांच्या आत्महत्या या विषयावर असलेल्या गाभ्रीचा पाऊस या सिनेमातही काम केलं होतं. हा सिनेमा सतीश मनवर याने दिग्दर्शित केला होता. त्याच्या पटकथालेखनातही गिरीशचा मोलाचा वाटा होता. गाभ्रीचा पाऊस नंतर गिरीशने विहीर हा सिनेमा तयार केला. त्याच्या प्रगल्भतेची साक्ष या सिनेमात पाहायला मिळाली. काहीसा अमूर्त असलेला हा सिनेमाला चांगलाच वाखाणला गेला होता. बर्लिन फिल्म महोत्सवात विहीरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.
देऊळमध्ये गिरीशने मुख्य भूमिका साकारली आहे. गाव, गावातलं राजकारण, देव आणि त्याच्याभोवतीची अर्थव्यवस्था, राजकारण अशा अनेक गोष्टी या सिनेमात दाखवल्या गेल्या आहे. या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता गिरीशला कष्टांना राष्‍ट्रीय पारितोषिकही मिळालं आहे. त्याच्यावर जी. ए. कुलकर्णी, चिं. त्र्यं. खानोलकर यांचा प्रभाव असल्याचं तो सांगतो. सिनेमाचं वेगळंच क्षेत्र गिरीशने आज अनेक तरुणांसाठी अधिक विस्तृत केलं आहे. कारण गिरीश हा केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठी काम करत नाही. तर त्यामागे कष्ट, सर्जनशीलता असते हे आपण लक्षात घ्यायला हवं!