आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परखड आणि स्पष्टवक्ती मल्लिका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला उद्ध्वस्त व्हायचंय, असं बिनधास्तपणे म्हणणार्‍या मल्लिका अमर शेख या कवियत्रीबद्दल आणि तिच्या जगण्याबद्दल मला कमालीचं कुतूहल होतं. प्रवाहाच्या विरोधात खळबळ माजवणार्‍या सर्वांबद्दलच असतं ना, तसंच. आपल्या साहित्यातून त्यांनी समाजव्यवस्थेतल्या भ्रामक संकल्पना, पक्षपाती रूढी-परंपरा आणि ढोंगी पुरुषी मानसिकतेवर कोरडे ओढले आहेत. येडा होऊन पेढा खाणार्‍या वृत्तीवर तर त्या हातचं न राखून ठेवता तुटून पडतात. त्यांची ही शैली प्रामाणिक तळमळीतून आलेली आहे. त्यांच्या अभिव्यक्तीमधला हा मनस्वीपणा मला खूप आवडतो. लेखिका म्हणून त्यांना समजून घेण्यासाठी त्यांची मुलाखत घेण्याचं मनात होतं; खूप आटापिटा केल्यावर संधी मिळाली. गंमत म्हणजे मल्लिका माझ्याशी इतक्या मनमोकळेपणाने बोलल्या की, मला वाटलंच नाही की मी त्यांच्याशी पहिल्यांदा बोलतेय म्हणून.
संयुक्त महाष्ट्राच्या चळवळीत पहाडी आवाजातील जोशपूर्ण पोवाड्यांनी प्रबोधन करणारे सुप्रसिद्ध शाहीर अमर शेख यांच्या घरी 16 फेब्रुवारी 1957 रोजी मल्लिकाचा जन्म झाला. सांस्कृतिक, वैचारिक चळवळीचं केंद्र असणार्‍या मुंबईतील त्यांच्या घरात सतत कवी, विचारवंत, गायक, कलाकारांचा राबता असे. घरात पुरोगामी विचारसरणीचे वातावरण, त्यामुळे सतत शब्दांची, विचारांची आणि माणसांची वर्दळ असे. कधी प्र. के. अत्रे, कधी अण्णाभाऊ साठे, कधी विंदा करंदीकर, केशरबाई, गव्हाणकर, अशा गप्पा. कधी गाण्याच्या मैफिली तर कधी मुद्दे खोडून तत्त्वापर्यंत पोहोचणारे वादविवाद. सतत काही तरी नवं, चैतन्यदायी चालायचं. या सगळ्या गोष्टी, मल्लिका तिच्या लहानपणी टिपून घेत असे. घरात हे असे जीवन समृद्ध करणारे धडे घेत असताना तिला शाळेत जाऊन शिकण्याऐवजी हे सगळे ऐकणे, पाहणं खूप आवडायचं. घरामध्ये वडिलांची शब्दांची सतत होत असलेली झटापट मल्लिका जवळ बसून पाहायची. त्यामुळे अगोदरच्या सृजनाच्या कळा आणि नंतरचा सृजनोत्सव, निर्मिती प्रक्रियेतील हे अनुपम सुंदर क्षण तिला जवळून अनुभवायला मिळायचे. त्यातून स्फूर्ती घेऊन मग ती वडिलांच्या आणि कुसुमाग्रजांच्या कविता साभिनय सादर करायची. या उत्साही सृजनशील वातावरणाचा परिणाम कळतनकळत मल्लिकावर होऊ लागला. ती वाचू लागली. शब्दांच्या सानिध्यात रमू लागली. त्यांच्या नादाने नादावली. त्यांचे भावार्थ कायमचे काळजात वस्तीला आले. आयुष्याला पुरून उरले. नंतर तर व्यक्त होणं ही गरज होऊन बसली.
वयाच्या सातव्या वर्षी मल्लिकाने पहिली कविता लिहिली. तिने शाळेत लिहिलेला निबंध वर्गात वाचून दाखवला जायचा. गाण्यावर नाच करता-करता नाटकात काम करावं वाटू लागलं. पुढं नाटकं, एकांकिका लिहिल्या. वय वाढू लागलं तसंतसं त्यातील चिंतनाची लांबी, रुंदी, खोली वाढली. कुटुंबाकडून वारसाहक्काने मिळालेला परखड स्पष्टवक्तेपणा, विचारांचं स्वातंत्र्य आणि वादविवादातून विषयाच्या मुळाशी जाण्याची वृत्ती आयुष्यात पुढे फार उपयोगी पडली. डाव्या विचारसरणीचं वाचन, सकारात्मक वैचारिक बैठक तयार होण्यासाठी साहाय्यभूत ठरलं. कारण पुढच्या आयुष्यात अनेक वादळं आली, मनोविश्वाची उलथापालथ करणार्‍या घटना घडल्या, पण त्यांचा स्वत:वरचा विश्वास कधी ढळला नाही. याचं श्रेय मल्लिकाताई त्या बालवयातील समृद्ध, संस्कारक्षम जडणघडणीला देतात.
पुढे दलित पँथरची स्थापना करणारे प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांच्या प्रेमात पडून लग्न होतं; पण नामदेव ढसाळ म्हणजे सुधारणावादी नवविचाराने भारावलेला अस्थिर झंझावात. सतत काही तरी खळबळजनक चळवळी चाललेल्या असत. त्यामुळे या दोघांचा संसार म्हणजे केवळ विचारांवर आधारलेला विश्वासू प्रपंच. कारण दोघंही आपापले विचारस्वातंत्र्य जपणारे. दोघंही प्रतिभावंत कवी. सडेतोड भूमिका घेताना तडजोड नाकारणारे.
त्यामुळे नुसत्या प्रेमानं पोट भरतं असं म्हणण्याचा समंजसपणा दाखवला तरी ते भरत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि याचा प्रत्यय या दोघांच्या संसारातदेखील येतो. शाब्दिक चकमकी झडू लागल्या. इतर नवराबायकोपेक्षा मुद्दे जरी निराळे असले तरी वास्तव निराळं नव्हतं. आणि मग त्यातून येणार्‍या उद्विग्नतेतून हे व्याकूळ मन मला उद्ध्वस्त व्हायचंय म्हणू लागलं. चळवळीतल्या नेत्यांचं कौटुंबिक सहजीवन सांसारिक आणि कलावंताच्या मनातील अनेक चढउतार, मानसिक ताणतणाव या सर्व भावना ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’मधून अतिशय पारदर्शीपणे व्यक्त झाल्या आहेत. हे आत्मकथन खूप गाजलं; पण त्याअगोदर आपले विचार रोखठोकपणे व्यक्त करणारी निर्भीड कवयित्री म्हणून मल्लिका अमर शेख हे नाव साहित्यवर्तुळात प्रस्थापित झालं होतं.
शालेय जीवनापासून सुरू झालेल्या लेखनप्रवासात अनेक कथासंग्रह, एकांकिका, नाटकं, चित्रपट संहिता, अशा विविध वाङ्मयप्रकारात पाच तपांहून अधिक काळ त्या लेखन करत आहेत. वाळूचा प्रियकर, देहऋतू, महानगर आणि माणूसपणाचं भिंग बदलल्यावर या संग्रहातील कविताही वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. वर्गव्यवस्था, वर्णव्यवस्था, लिंगभेद न पाळता विचारांची बंडखोरी करणारी कवयित्री म्हणून त्यांची समीक्षकांनी नोंद घेतली आहे. आपल्या मतांची पायमल्ली होऊ न देता आपलं विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लेखकानं जपलं पाहिजे या मताचा आदर करणारी त्यांची कविता म्हणूनच आपल्या अंगभूत वेगळेपणाने उठून दिसते. तसं पाहिलं तर कुठल्याही सृजनशील लेखकाच्या लिखाणातून त्याची वैयक्तिक मतं, अनुभव प्रकट होत असतात. मात्र, प्रत्येक लिखाणामागे तळमळ, तडफड, आच असेल तर मुद्दाम काही करण्याची गरज पडत नाही, असं प्रामाणिक मत आपल्या लेखनामागे असल्याचं मल्लिका यांचं मत आहे.
आपल्या कवितेतून समाजात होणारे बदल जसे त्यांनी टिपले तसेच स्त्री-पुरुष संबंधातील बदलत जाणारे संदर्भही नोंदवले आहेत. सामर्थ्यशाली ठिकाणी दुर्बल घटक कसा पिचला आहे, स्त्रियांच्या जीवनाला समाजाने बंधनांची पाचर कशी मारून ठेवलीय, समाज स्त्री-पुरुष संबंधांबाबत पक्षपाती भूमिका कशी घेतो याची अनेक मासलेवाईक उदाहरणं त्यांनी कवितांमधून दिली आहेत. त्या म्हणतात,
नाक्यावर, बसमध्ये ऑफिसमध्ये
पुरुष उभे, कंबर वाकडी करीत, डोळा मारीत,
तरी त्यांना कोणी वेश्या म्हणत नाहीत.
खरं तर हा प्रश्न समाजातील सर्व जाणत्या लोकांना छळणारा आहे; पण तरीही सभ्य समजल्या जाणार्‍या आपल्या संस्कृतीत, पुरुषांचं असं विकृत वागणं सहन केलं जातं. सोयीस्करपणे त्याकडे कानाडोळा केला जातो. त्यांना धडा शिकवण्याऐवजी मुळातच संकुचित असलेलं स्त्रियांचं जगणं आणखीनच सीमित केलं जातं. आणि कालांतराने स्त्रियांनाही ते अंगवळणी पडतं. पण माणूस म्हणून जगू पाहणार्‍या मनस्वी मल्लिका अमर शेख यांना समाजाच्या दुटप्पी धोरणाचा तिरस्कार वाटल्याशिवाय राहत नाही. या कोडग्या मनोवृत्तीबद्दल त्यांना चीड येते, त्या लिहितात,
रात्री नवर्‍याच्या मिठीत असतानाच, माझं एकाएकी मांजरीत रूपांतर झालं
कुठूनही, कुठंही फेकलं तरी अज्जात, पायावर उभं राहणार्‍या,
अन पोत्यातून, गाडीतून कितीही दूर सोडून
आलं तरी अचूक नेमकेपणाने
परत घरी येणार्‍या.
मी नवर्‍याचे कान, गाल चाटले,
पंजा पालथा घालून ओला केला,
नंतर सगळं अंग चाटून स्वच्छ केलं घराप्रमाणे.
आताशा तो मला पोत्यात भरून जंगलात सोडून येत नाही, कंटाळलाय.
कदाचित मीच त्याच्या आधी घरी येईन
अशी त्याला भीती वाटत असावी म्हणून.
मला वाटतं समस्त स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणारी ही प्रतीकात्मक मांजर आहे. नवर्‍याच्या मागंमागं करणार्‍या, त्याचा शब्द झेलण्यासाठी तत्पर असणार्‍या, त्यानं टाकून बोललं, झिडकारलं तरी पुन्हापुन्हा लोचटपणा करणार्‍या या स्त्रिया स्वत:वरचा अन्याय दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न का करत नाहीत, या प्रश्नानं व्यथित झालेलं मन अशा उपरोधिक शैलीचा आधार घेऊन मनातला राग व्यक्त करतं.
माणूसपण क्षीण होत जाणार्‍या अवस्थेत माणसातील पशूला जाग येत असते आणि पारंपारिक मूल्यव्यवस्था त्यावर अंकुश ठेवून असते. मग धड माणूसपण नाही आणि पशुत्व नाही अशा विचित्र कैचीत सापडलेल्या व दुभंगत जाणार्‍या माणसाचे अवकाळग्रस्त जिणे आणि त्याच्या अस्तित्व वेदना त्यांच्या महानगर या एकाच विषयावरील बावन्न कवितांमधून प्रभावीरीत्या प्रकट झाल्या आहेत. काव्यलेखनासाठी पारंपरिक रंजनवादी शैली टाळून कल्पनारम्यतेला नकार देऊन आशयाला थेट भिडणारी वास्तववादी कविता त्यांनी लिहिली. त्यांच्या कवितेत कुठेच प्रतिमांचा सोस जाणवत नाही. तर त्यांनी व्यक्त होण्याची निकड म्हणून स्वाभाविक भावमूलक भाषेचा वापर केला आहे. मल्लिकातार्इंचं अवघं आयुष्य मुंबईसारख्या महानगरात गेलं. सभोवताली संवेदनाशून्य समकालीन समाजवास्तव, मिथ्यानिष्ठेचं जीवन जगणारी माणसं पाहिली पण त्यांच्या कवितेत महानगरीय जीवनशैलीची औपचारिकता, कृत्रिमता कुठेच जाणवत नाही. आपापल्या परीने जगणं सुंदर व्हावं म्हणून प्रयत्न करणार्‍यांमध्ये मला उद्ध्वस्त व्हायचंय असं बेधडकपणे म्हणायलाही मोठं धाडस लागतं. लपाछपीच्या कुबडीवर तोललेलं दुबळं आयुष्य जगणारे लोक पाहिले की केलेल्या चुका मान्य करून जबाबदारी स्वीकारणार्‍या लोकांचा मनाचा मोठेपणा भावल्याशिवाय राहात नाही. म्हणूनच गुळगुळीत मूल्यहीन औपचारिक जगणार्‍यांच्या जीवनशैलीला दोन शिव्या हासडून गावरान बाईनं कानउघाडणी करावी तशी मल्लिका अमर शेख यांची कविता वाचकांच्या मेंदूला झिणझिण्या आणते.
tadegawkarsanjiwani@yahoo.com