आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजोनिवृत्ती म्हणजे काय?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळिशीतील या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने रजोनिवृत्ती म्हणजे काय? ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. या काळात प्रत्येक स्त्रीला जाणवणारी संक्रमण अवस्था आणि त्यासाठी स्वयंपाकघरातील औषधांचा खजिना व्याधीनुसार माहिती असणे गरजेचे आहे. रजोनिवृत्ती म्हणजे मासिक पाळी थांबणे. वयाच्या 12 व्या वर्षापासून सुरू झालेल्या मासिक पाळीचा बंद होण्याचा कालखंड म्हणजे रजोनिवृत्ती होय. रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात महत्त्वाचे बदल जाणवतात. मासिक पाळीत अनियमितता येणे, हाडांची दुखणी उद्भवणे, लठ्ठपणा जाणवतो, चरबी ही कंबरेकडील भागात जास्त जमा झालेली दिसते. व्हासोमोटर असंतुलनामुळे सातत्याने अंग गरम होते, ज्याला ‘हॉटफ्लश’ असे म्हणतात.
नैराश्य, मानसिक कुचंबणा, चिडचिडेपणा, वारंवार जाणवतो. ब-याच महिलांना खूप रडावेसे वाटते. त्वचा कोरडी होण्यास सुरुवात होते. त्वचेवरील चमक कमी होते. बहुधा दर्शनीय त्वचेवर कंद येतात. आत्मविश्वासाची कमतरता जाणवते. अपचनाच्या तक्रारी सुरू होतात. भरपूर महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. योनीला खाज येते. समागमाची इच्छा कमी होते. झोप कमी येते. स्तनांचा आकार लहान होतो. वारंवार लघवीला येते.
हे महत्त्वाचे बदल रजोनिवृत्तीच्या काळात जाणवतात. हे बदल घडवून आणणा-या हार्मोन्सच्या बाबत माहिती असणेसुद्धा महत्त्वाचे आहे.
मासिक पाळीचे चक्र कसे असते ?
स्त्री तारुण्यावस्थेत असताना दर महिन्यात मज्जासंस्था हायपोथलॅमस, पिट्युटरी व बीजाशय यातील अंत:स्रावात बदल होतात. मेंदूच्या तळाशी असणारी पिट्युटरी ग्रंथी बहुतेक सर्वच अंतस्थ ग्रंथीच्या कार्यावर नियंत्रण ठेवते. मेंदूच्या हायपोथलॅमस भागाचे या ग्रंथीवर नियंत्रण असते. हायपोथलॅमसमधील रक्तवाहिन्या सरळ पिट्युटरीच्या अंतर्गत भागातून एफएसएच आणि एलएच हे स्राव बाहेर पडतात. हे संप्रेरक रक्ताद्वारे बीजांडकोशाकडे पाठवले जातात. बीजांडकोश इस्ट्रोजन हे संप्रेरक तयार करून गर्भाशयाच्या अस्तरवाढीसाठी सक्रिय सहभाग घेतात. या काळात जर गर्भधारणा झाली तर गर्भ तयार होऊन गर्भाशयात रुजतो. गर्भधारणा झाली नाही तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या महत्त्वाच्या संप्रेरकाची निर्मिती पाळीच्या 25-26 दिवसापासून थांबते. गर्भाशयातील अस्तर गळून पडते आणि पाळी येते.
इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनमुळे रजोनिवृत्तीच्या काळात विविध व्याधी आणि तक्रारी जाणवतात. त्यांची परिणामकारकता कमी करायची असेल तर त्यासाठी योग्य आहार नियोजन केले तरच रजोनिवृत्तीचा काळ तुम्ही अतिशय सुखकर घालवू शकता.