आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजिंक्य योद्ध्याचे अद्भुत चरित्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेशवाईमधल्या पहिल्या बाजीरावाकडे आजच्या काळातही मुद्दाम बारकाईने पाहावे अशी त्याची खासियत काय होती? सबंध जगातल्या पाच अजिंक्य योद्ध्यांमध्ये त्याचे नाव घेतले जाते; याचे नेमके कारण काय? त्याने जिंकलेली निजामाविरुद्धची पालखेडची लढाई लोकविलक्षण का मानली जाते? मराठ्यांचेच एक सेनापती त्रिंबकराव दाभाडे यांच्या विरोधात त्याला का लढावे लागले आणि या डभईच्या लढाईत कोणते अविस्मरणीय नाट्य घडले? जगविख्यात सेनानी फील्ड मार्शल माँटगोमेरी यांनी बाजीरावाची वाहवा नेमक्या कोणत्या शब्दांत केली? आणि इतिहासाच्या व्यापक परिप्रेक्ष्यात बाजीरावाचे कर्तृत्व कसे दिसते? अशा विविध अंगांवर झगझगीत प्रकाश टाकणारे जयराज साळगावकरांचे नवे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे.
आपल्याच समाजातल्या विलक्षण व्यक्तींच्या कहाण्या आपण किती चटकन विसरतो! ‘पहिला बाजीराव’ हे नाव आपण कुठेतरी ऐकलेले असते; पण जगातील पाच अजिंक्य योद्ध्यांच्या पंक्तीत त्याचा समावेश होतो, हे आपल्या गावी नसते. त्याच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत तो सतत मुस्लिम, पोर्तुगीज, हबशी व इंग्रजांशी लढत राहिला. त्याने एकापेक्षा एक उत्तुंग विजय मिळवले आणि त्याचा एकदाही पराभव झाला नाही.
फील्ड मार्शल माँटगोमेरीसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सेनापतीने बाजीरावाच्या युद्धकौशल्याची वाहवा केली आहे! पण आपल्याला त्याची काहीच माहिती नाही. आपल्याला पहिला बाजीराव आणि दुसरा बाजीराव यांच्यातला फरकही ठाऊक नाही. त्याचे मस्तानी प्रकरण तेवढे आपल्याला ढोबळपणे ठाऊक असते; आणि तेवढ्यावरून तो रंगेल गडी होता, असा समज करून आपण मोकळे होतो.
पण पहिल्या बाजीरावाचे ऐतिहासिक मोल किती अद्भुत आहे, हे जयराज साळगावकरांनी आपल्या नव्या पुस्तकात अंगोपांगाने उलगडून दाखवले आहे. ते सरळसोट चरित्र नाही, तर त्यापेक्षा बरेच अधिक आहे. सुबोध, रसाळ, नाट्यपूर्ण आणि अद्भुत अशी ही जीवनकहाणी अथपासून इतिपर्यंत अत्यंत वाचनीय आहे.
या पुस्तकाच्या पानापानावर इतकी विलक्षण माहिती आपल्यापुढे येत राहते की आपण विस्मयचकित होऊन वाचत राहतो. पहिल्याच प्रकरणात लेखक सांगतो, ‘निसर्गातील पंचमहाभूतांचा वापर करून घेणारे सेनानी सहसा कधी हरत नाहीत. बाजीराव आयुष्यात कधीही युद्ध हरले नाहीत. निसर्गाचा उपयोग करून घेताना शत्रूवर हल्ला करून कधी-कधी ते खोटी माघार घेत. ही माघार म्हणजे शत्रूच्या मृत्यूचा पिंजरा असे.’
शिवाजी महाराज आणि बाजीराव यांच्या युद्धनीतीत कोणते साम्य होते हेही मुद्दाम वाचण्यासारखे आहे : ‘शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीत शत्रू हा मध्यबिंदू होता. शत्रूला कोणकोणत्या भल्या व बु-या मार्गाने विस्थापित व विच्छिन्न करून अडचणीत आणता येईल, याचा विचार करून त्याची कार्यवाही ते प्रत्यक्षात आणत. हाच छत्रपतींच्या गनिमी काव्याचा खरा अर्थ होय. याच युद्धतंत्राने 35 वर्षांच्या मोहिमांमध्ये ते सदैव यशस्वी राहिले. त्यांच्यानंतर काही प्रमाणात संभाजी महाराज यांनी हे तंत्र यशस्वीरीत्या वापरले, पण दुर्दैवाने ते अल्पायुषी ठरले. पहिले बाजीराव यांनी या तंत्राचा संपूर्ण अभ्यास करून मराठ्यांची सत्ता हिंदुस्थानभर वाढवत नेली.’
पण मग बाजीराव शिवाजीएवढे मोठे का ठरले नाहीत? लेखक सांगतो, ‘एवढं सगळं कर्तृत्व असतानाही बाजीरावला शिवाजीसारखा महान विधायक लोकोत्तर पुरुष मानता येत नाही. आपल्या रयतेसाठी कायम हितकारक ठरेल अशा प्रकारे आपल्या राज्याच्या राजकीय व्यवस्थेला आकार देण्याचा किंवा ती सुधारण्याचा
प्रयत्न त्याला दुर्दैवाने करता आला नाही आणि हे करण्यासाठी त्याला पुरेसा वेळ मिळाला नाही.’
बाजीरावाची ही अलौकिक जीवनकहाणी पुस्तकाच्या पहिल्या 100 पानांमध्ये संपते. पुढची पाने सात परिशिष्टांनी व्यापली आहेत.
अजिंक्य योद्धा बाजीराव
जयराज साळगावकर
परममित्र प्रकाशन
225 रुपये.