आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेती व्यवस्थेचा मार्गदर्शक ग्रंथ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘द कंडिशन ऑफ इंडिया पिझंट्री’ या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद असलेल्या एकूण 94 पृष्ठांच्या या पुस्तकात बावन्न तक्त्यांच्या आधारे आणि तितक्याच मुद्द्यांच्या आधारे विश्लेषण करण्यात आले आहे. पाच रेखालेख, सहा विभाजित वर्तुळाकृती, अकरा स्तंभालेख आणि अठरा परिशिष्टांचे साह्य सांख्यिकीय माहितीच्या विश्लेषणासाठी उपयोगात आणल्याचे प्रथमदर्शनी जाणवते. या पुस्तकास अत्यंत बोलके आणि जिवंत मुखपृष्ठ लाभल्यामुळे चेहरा मनाचा आरसा असतो असे म्हणतात, त्याप्रमाणे या पुस्तकातील आशय मुखपृष्ठावरूनही आपण ताडून पाहू शकतो.
हे पुस्तक म्हणजे सांख्यिकी आणि नियोजन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाºया राष्ट्रीय नमुना पाहणी संघटनेने देशातील शेतक-यांच्या स्थितीचे जे मूल्यमापन केले होते त्या सर्वेक्षणाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण आहे. राष्ट्रीय नमुना पाहणी संघटनेने शेतकरी कुटुंबाचा उपभोग खर्च, शेतकरी कुटुंबाचा कर्जबाजारीपणा, शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज या मुद्द्यांच्या आधारे सर्वेक्षण केले होते. त्याचाच भारतातील राज्यनिहाय आकडेवारीसह ऊहापोह या पुस्तकात केला आहे.
एकूण जमिनीपैकी शेतीसाठी राज्यनिहाय वापरासोबतच त्यातील आदानांचा वापर, कुटुंबाची संख्या, कुटुंबातील सदस्यसंख्या, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, ऊर्जा वापर या सर्वांचा तपशीलवार गोषवारा प्रस्तुत पुस्तकातून घेण्यात आला आहे. अनुवादित पुस्तक वाचताना सहज लक्षात येणारी एक गोष्ट म्हणजे, एखाद्या संस्थेच्या लघुरूपाशिवाय इंग्रजी शब्द किंवा वाक्यांश कटाक्षाने अनुवादकर्त्याने गाळलेला आहे. अत्यंत किचकट सांख्यिकीय माहिती सोप्या आणि प्रासादिक शब्दयोजनेमुळे समजण्यास सोपी झाली आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये 52 मुद्द्यांच्या आधारे विश्लेषण करून भारतीय शेती म्हणजे जणू पत्त्यांचा डाव असल्याचे सूचित होते. खेळात जशी अनिश्चितता असते तसेच भारतीय शेतीजीवनही बेभरवशाचे, अनिश्चित आहे. जी. एस. भल्ला हे नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून कार्य केलेले अर्थतज्ज्ञ आहेत. ज्या सर्वेक्षणाधारे त्यांनी ही मांडणी केली, त्या अहवालामुळे देशातील विविध राज्यांमधील कृषी क्षेत्राविषयीच्या अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. जसे की, शेतक-याची त्याच्या व्यवसायाबद्दलची निराशा, भविष्याच्या दृष्टिकोनातून नियोजनशून्यता, शासनाचा बेजबाबदारपणा तसेच सहकारी आणि इतर संस्थांच्या कामकाजाच्या ढिसाळ पद्धती. शेवटी राष्ट्रीय नमुना पाहणी संघटनेच्या सर्वेक्षणावरून असे लक्षात येते की, भारतातील जवळपास सर्व राज्यांमधील लहान आणि सीमांत शेतक-यांची स्थिती अतिशय गंभीर आहे आणि देशातील कृषी क्षेत्राची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. ही परिस्थिती बदलली जावी याकरिता काही महत्त्वपूर्ण सूचना - योजनाही या पुस्तकातून पाहावयास मिळतात. शेवटी आपणास असे म्हणता येईल की, ‘भारतीय शेतीची अवस्था’ हे पुस्तक शासनास कृषी क्षेत्राचे धोरण ठरवताना, शेतकºयांना वर्तमानस्थिती बदलवण्यास आणि जिज्ञासू वाचक व संशोधकांना एक मौलिक दस्तऐवज म्हणून उपयोगी पडणार आहे. या पुस्तकातून सुचवलेल्या धोरणात्मक शिफारशी शासनस्तरावर विचारात घेतल्या गेल्या, तर शेतकरी वर्गाची स्थिती सुधारून शेतकरीदेखील कर्जबाजारीपण टाळून चांगले जीवनमान जगू शकेल हे निश्चित. या पुस्तकाच्या अनुषंगाने डॉ. मारोती तेगमपुरे यांनी अनुवादरूपाने विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. ग्रामीण शेतकरी कुटुंबाची जाण आणि इमान निश्चितच त्यांच्याकडे असल्यामुळे भावी काळातदेखील त्यांच्याकडून उत्तमोत्तम ग्रंथानुवादाची अपेक्षा ठेवणे गैर ठरणार नाही!
भारतीय शेतीची अवस्था
नॅशनल बुक ट्रस्ट, दिल्ली, मूळ इंग्रजी लेखक : जी. एस. भल्ला
मराठी अनुवाद : मारोती तेगमपुरे, पृष्ठे : 94, किंमत : 60 रुपये
purushottamjunne@rediffmail.com