आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी साहित्यातला ‘सर्व सुर्वे’नंतरचा ऐतिहासिक प्रयोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी साहित्यात नवा प्रवाह ठरेल व त्याची दखल घ्यावी अशा या दीर्घ समीक्षाग्रंथात मराठीतील सर्व नव्या-जुन्या सर्व समीक्षक आणि अभिरुचीच्या उदाहरणार्थ डॉ. सदानंद मोरे, सुधीर रसाळ, दि. पु. चित्रे, सूर्यनारायण रणसुभे, अरुणा ढेरे, वसंत आबाजी डहाके, दासू वैद्य, आर. आर. पाटील, शरद पाटील, एन. डी. पाटील आदी सर्व प्रांतातल्या आघाडीच्या 105 वर मान्यवरांनी तीन भागांत खास मराठवाडी आघाडीचे कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितांवर लिहिले आहे. मराठी साहित्यातील सर्व सुर्वे या अपवादात्मक टीका समीक्षा ग्रंथानंतर म्हणजेच दोन दशकांनंतर इंद्रजित भालेराव यांची कविता: आकलन, आस्वाद आणि आक्षेप, हा 760 पानांचा ऐतिहासिक समीक्षाग्रंथ तयार झाला. त्याची मराठी साहित्यविश्वाला नोंद घ्यावी लागेल. येत्या 24 रोजी या समीक्षाग्रंथाचे प्रकाशन परभणीत होत आहे त्यानिमित्ताने या ग्रंथाची कशी निर्मिती झाली, काय अडचणी आल्या, काय वाटते या वेगळ्या प्रयोगाविषयी संपादक, कवी, प्रकाशक यांना वाचा त्यांच्याच शब्दात...


तसा मी भाग्यवान कवी
तसा मी भाग्यवान कवी आहे. माझ्या कवितेला मोठा न्याय मिळत आहे. आणि अगदी प्रारंभापासून पु. ल. देशपांडे, शांताबाई शेळके, विजय तेंडुलकर, भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्यांनी माझ्या कवितेला मन:पूर्वक दाद दिली. सुधीर रसाळांसारख्या थोर समीक्षकांनी पहिल्या पुस्तकांपासूनच पाठराखण केली शरद जोशींसारख्या चळवळीतल्या एन.डी. पाटलांसारख्या राजकारणातल्या माणसानं, आर. आर. पाटलांनीही मन:पूर्वक दाद दिली. शिवाय संशोधकांनीही सखोल संशोधन केलेय. सहा जणांनी पीएचडी तर बारा जणांनी एम.फिल. केलंय. शालेय अभ्यासक्रमापासून विद्यापीठांपर्यंत कविता अभ्यासाला आहेत. त्यांना नेहमीच (शिकवणार्‍यांना) माझ्या कवितेचे संदर्भ लागतात. ही गरज लक्षात घेऊन साक्षात प्रकाशनाने असा हा ग्रंथ सिद्ध केलेला आहे.

संपादक प्रा. भगवान काळे, परभणी आणि प्रकाशक रमेश राऊत गेल्या दोन वर्षांपासून या ग्रंथावर मेहनत घेत होते. यात अनेक मान्यवर समीक्षकांनी माझ्या कवितेचे नव्याने मूल्यमापन केले आहे. इंद्रजित भालेरावांसारखा कवीच झाला नाही ते त्यांना कविताच लिहिता येत नाही. या दोन टोकांच्या मधली ही समीक्षा आहे. इतकी सखोल आपल्या कवितेची दखल घेतली याचा कवी म्हणून मला नक्कीच आनंद आहे. असा धाडसी (पुस्तक चालेल न चालेल) उपक्रम हाती घेतल्याचे प्रथम कळाले तेव्हा आनंद तर वाटलाच मात्र कृतार्थ वाटलं. प्रामुख्याने शेतकर्‍यांच्या जीवनावर शेतातला कवी व शेतकर्‍यांवरील कविता आहे त्यामुळे त्यात निसर्ग हा ओघानेच आला. माझ्या कवितेवर बहिणाबाई चौधरी, नारायण सुर्वे यांचा प्रभाव असलेल्या माझ्या कवितेवर लोकलयीचा प्रभाव आहे. इंग्रजी व इतर 14 भारतीय भाषांत अकादमीने कविता अनुवादित केल्या. प्रदीर्घ समीक्षाग्रंथ हा एक माझा मोठा सन्मानच समजतो.

समीक्षाग्रंथ हा गौरवग्रंथ न ठरता संदर्भग्रंथ ठरेल
मोठमोठय़ा समीक्षक, साहित्यिकांचे लेख असूनही मला हे आव्हान पेलताना दडपण मुळीच आले नाही. कारण अनेकांचे सहकार्य व इंद्रजित भालेराव सरांचा खुलेपणा, स्वातंत्र्य व माझ्या कार्यास मान्यता यामुळे ते सोपे झाले. असा समीक्षाग्रंथ काढण्यामागची भूमिका ही सर्वज्ञातच आहे. सर्व विद्यापीठांत सरांची कविता अभ्यासक्रमात आहे तसेच विविध विद्यापीठांमध्ये भालेराव सरांच्या साहित्यावर संशोधन करणार्‍यांना सलग सर्व साहित्य समीक्षा एकत्र उपलब्ध व्हावी, विद्यार्थ्यांना कवितेचे र्मम कळावे आणि सरांची कवितेची वाटचाल जडणघडण जवळून पाहिलेली असल्यामुळेही हे करावेसे वाटेल. हा प्रकल्प राबविला. बहुधा असा पहिलाच प्रयत्न असावा.

ग्रामीण कविता साचेबद्ध झाली असं म्हटलं जातं ते खोडून काढता आलं. पीकपाणी, काबाडाचे धनी या संग्रहातील प्रारंभीच्या कविता ते अगदी अलीकडे प्रकाशित झालेल्या भूमीचे मार्दव, या संग्रहातील कविता हा जो सगळा कवितेचा प्रवास आहे हा चढत्या श्रेणीचा आहे, असं मला वाटतं. खेड्यापाड्यांतील निसर्गकवितेत सरांनी अतिशय सर्मथपणे टिपलाय असं वाटतं. सूर्यनारायण रणसुभेंनी मुन्शी प्रेमचंदांच्या साहित्याबद्दलचा जो अभिप्राय यानिमित्ताने व्यक्त केला तो अभिप्राय भालेरावांच्या कवितेलाही लागू होतो. हा तुलनात्मक मुद्दा वा भाग पहिल्यांदा समोर आला. नव्याने कविता कळली. या समीक्षाग्रंथात मान्यवर साहित्यिकांनी स्वत:च्या दृष्टिकोनातून इंद्रजित यांना पाहिले हे वेगवेगळे पैलू पुष्पगुच्छप्रमाणे रेडिमेड वाचकापुढे आले आहे. आम्हाला जे वाटत होतं ते स्वप्न यानिमित्ताने पूर्ण झालं. आणि विशेष म्हणजे त्याला निव्वळ गौरवग्रंथाचे स्वरुप मुळीच आलं नाही याचा आनंद वाटतो. मराठी साहित्याला यातून काही वेगळे मिळेल असे वाटते. बाकी समीक्षकांनी भालेरावांच्या कवितेबद्दल भरभरून म्हणजे र्मयादा व ताकद सांगत कठोरपणे लिहिलंय. मात्र आम्हाला समाधान आहे हा संदर्भग्रंथ ठरेल तो अनोखा असेल. त्याचं मूल्यमापन आताच काय ते सांगता येणार नाही.

मराठी साहित्य, कवितेवरील प्रेमापोटी समीक्षाग्रंथ काढला
एवढा मोठा समीक्षाग्रंथ काढला. धाडस वगैरे काही नाही. याचं कारण प्रारंभापासून वाचन करत आलोच होतो यामुळे मराठी साहित्याची, कवितेची आवड प्रारंभापासूनच लागली यामुळे कवितेच्या निस्सीम प्रेमापोटीच हा समीक्षाग्रंथ साक्षाततर्फे मी काढला. एखादे पुस्तक प्रकाशित करताना फायदा-तोट्याचा विचार मी कधीच केला नाही.

संकल्पना आवडली म्हणून हे पुस्तक केलं. असं असलं तरी आपण जर चांगलं पुस्तक प्रकाशित केलं तर वाचक त्याला नक्कीच प्रतिसाद देतात, असा माझा अनुभव आहे. यापूर्वीही मी अनुवादित कवितांचं कवितांतरण, नावाचं एक मोठं (500 पानांचं, हार्ड बाऊंड) पुस्तक प्रकाशित केलं. त्यावेळेसही असा विचार केला नाही. आणि लोकांनी त्यालाही प्रतिसाद दिला. अलीकडे तुलसी परब यांच्या कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती छापली. त्यालाही प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत जे केलं ते साहित्याच्या प्रेमापोटीच.

इंद्रजित भालेराव यांच्याकडे ग्रामीण भागातील आणि तळागाळातील लोकांचे अनुभव मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यांना ग्रामीण माणसाचं मनही चांगल्या प्रकारे कळालेलं आहे. ते स्वत: कविता व साहित्यावरील प्रेमापोटी महाराष्ट्रभर फिरून कार्यक्रम करत असतात. या कार्यक्रमातून त्यांना जे मानधन मिळते. त्यातून त्यांनी राज्यातील अनेक वाड्मयीन नियतकालिकांना देणग्याही दिलेल्या आहेत यामुळे या त्यांच्या कवितेच्या कमिटमेंटपोटीही मला त्यांच्या कवितांवरील हा समीक्षाग्रंथ काढावा वाटला. यात प्रा. भगवान काळे यांनीही अपार मेहनत घेऊन मान्यवरांचे लेख राज्यभरातून गोळा केले आहेत. त्याचाही उल्लेख करावा वाटतो.

जवळजवळ दीड वर्ष हे काम चालले. भालेरावांवर आणि त्यांच्या कवितेवर निस्सीम प्रेम करणारे अनेक आहेत त्यांच्या कवितेवर मुळातच विपुल समीक्षा प्रकाशित झाली होती ती विखुरलेली समीक्षा एकत्रित करून रसिक व अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावी या हेतूने हे पुस्तक प्रकाशित केलं. अर्थात या ग्रंथात सर्वच समीक्षा जुन्या नसून अनेक मान्यवरांकडून नवीन लेख लिहून घेतले आहेत. मला वाटते की पुस्तकांची नुसती पृष्ठसंख्या मोठी असून चालत नाही तर त्यात मान्यवरांचे लेखही असावे लागतात. या पुस्तकात रा. ग. जाधव, वसंत आबाजी डहाके यांच्यासह चार-पाच संमेलनाध्यक्ष, विविध वृत्तपत्रांचे संपादक आदि अनेकांचा समावेश आहे.