आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - स्वत:च्या अनुभवाद्वारे शब्द मांडणे तसे अवघड आहे, पण नवी पिढी हा वारसा समर्थपणे जपत असून असा मोठा तरुण कवी वर्ग केवळ मराठवाड्यामध्ये असल्याचा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक व पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांनी व्यक्त केला.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शनिवारी समाधान इंगळे यांच्या ‘शब्द झाले श्वास’ आणि ‘चिकित्सा : अनुराधा पाटील आणि नीरजा यांच्या कवितेची’ या पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मसापचे उपाध्यक्ष डॉ. दादा गोरे, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त मधुकरराव मुळे, प्रसिद्ध कवी फ. मुं. शिंदे, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे प्रा. डॉ. पी. विठ्ठल यांची उपस्थिती होती.
डॉ. पानतावणे या वेळी म्हणाले की, समाधान इंगळे हे कविता आणि समीक्षा अशा दोन प्रांतांत आपले पाय रोवणारे कवी आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील बदलत्या संस्कृतीचे वास्तव कवितेतून मांडले आहे. कवीचे कवित्व, विद्वत्ता याचा कविता वाचून प्रत्यय येतो असेही ते म्हणाले. चांगला लेखक, कवी होण्यासाठी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा, असे मत मधुकरराव मुळे यांनी व्यक्त केले. इंगळे यांची कविता संस्कारित करणारी
असल्याचे प्रा. फ. मुं. शिंदे यांनी सांगितले. इंगळे हे अवलिया कवी असून त्यांच्या वाङ्मयातून त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडते, असे पी. विठ्ठल म्हणाले.
या वेळी इंगळे यांच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले. ‘शब्द झाले श्वास’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय समारोप डॉ. गोरे यांनी केला. सूत्रसंचालन महेश अचिंतलवार यांनी केले, तर आभार अमरजित यांनी मानले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.