आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांचा हट्टीपणा की इमोशनल अत्याचार?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्यांसाठी हट्ट धरणार्‍या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अमुक एक गोष्ट नाही मिळाली, तर त्यांच्या वैतागामुळे संपूर्ण घरातील वातावरण बिघडून जाते. आपल्या मागण्यांसाठी पालकांना नाचविणार्‍या मुलांमागे विविध कारणे असली तरी चुकीचे बालसंगोपन हेदेखील महत्त्वाचे कारण असल्याचे मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अशा प्रकारच्या दहा ते बारा केसेस महिन्याला मानसशास्त्रज्ञांकडे येत असतात.

या संदर्भात बाल मानसास्त्रज्ञ डॉ.मोनिका मुळे म्हणाल्या, अशा केसेस निश्चितच वाढत आहेत. हा प्रकार घडतोय म्हणजे त्यामागेही निश्चितच काही कारणे आहेत. प्रत्येक केसप्रमाणे त्याची कारणे व उपचारपद्धतीही वेगळ्या ठरतात. आजकाल मुलांवर शाळेचा, अभ्यासाचा ताण वाढतो आहे. दिवस-दिवस मुलांच्या शाळा चालतात. अधिकतर विभक्त कुटुंब पद्धती आहे. तसेच मुलांना कसे वाढवले जाते , हेही फार महत्त्वाचे ठरते. या सगळ्या बाबींचा विचार करून मुलांसाठी ‘बिहेविअर थेरेपी’ किंवा ‘प्ले थेरेपी’ वापरली जाते. मुलाचे वय, स्वभाव, कौटुंबिक पार्श्वभूमी याचा विचार करून मुलांचे जिथे चुकते तिथे योग्य ती शिक्षा दिली तर मुले चांगली वागतात. अशावेळी बक्षिसी या पद्धतीचाही वापर केला जातो.

मनोविकारतज्ज्ञ डॉ. संजीव सावजी म्हणाले, अशा प्रकारच्या किमान 10-12 केसेंस आमच्याकडे महिन्यातून येतात. अशा पद्धतीने मुलांच्या वागण्यामागे इतर काही कारणे असली तरी मुख्यत: पालकच याला जबाबदार असतात. मुले हट्टी होण्यामागे त्यांना लावलेल्या चुकीच्या सवयी हे एक कारण आहे. मुळात बालसंगोपन ही संकल्पनाच पालकांना माहीत नसल्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण होतात. मुलांना पालकांनी पुरेसा वेळ द्यायला पाहिजे आणि तो देण्यात येत नाही म्हणून त्याचे ‘कॉम्पनसेशन’ पालक पैशात करू पाहतात. वेळ देऊ शकत नाही म्हणून मुले मागतील ते आणून देण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. आजची पिढी हुशार आहे, तिला पालकांनी समजावून घेतले पाहिजे, त्यांच्याशी मोकळा संवाद साधला पाहिजे.

पाच वर्षांच्या बंटीचा हट्टीपणा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. त्याला हवी असलेली गोष्ट मिळाली नाही, तर दिवस-दिवस चिडचिड करतो. जोपर्यंत ती वस्तू त्याला आणून दिली जात नाही, तोपर्यंत तो शांत बसत नाही. कुणाशीही नीट बोलत नाही. हल्ली तर त्याला तोंडातून शब्द निघाल्या निघाल्याच ती वस्तू हवी असते. त्यामुळे त्याचे पालक त्रस्त झाले आहेत.
सात वर्षांच्या विश्वेशला शेजारच्या मुलाने कुठलेही खेळणे आणले की त्यालाही तसेच खेळणे हवे असते. मग त्यासारखे खेळणे त्याच्याकडे असले तरी तो मागणी करतोच. शेवटी पालक वैतागून तशीच खेळणी आणून देतात. अजून एखाद्या शेजारच्या मुलाने दुसरे खेळणे आणले की पुन्हा विश्वेशचा हट्ट सुरू. त्याच्यातील हट्टी प्रकार वाढल्याने पालकांनी शेवटी मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घेण्याचे ठरवले.
हे करून पाहा..

मुलांना चुकीच्या सवयी लावू नका, त्यांच्यावर नियंत्रण ठेवा

मुलांचे सगळेच हट्ट पालकांनी पुरवू नयेत

मुलांना नकार पचवायला शिकवावे

मुलांना पुरेसा वेळ द्या

मुलांशी मोकळा संवाद साधा

त्यांना समजावून घ्या

खरे बालसंगोपन जाणून घ्या