आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूखंड माफियांना ‘मोक्का’चा फास!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - एकाचा भूखंड दुसर्‍याला, दुसर्‍याचा तिसर्‍याला आणि तिसर्‍याचा कुणा भलत्यालाच विकून ग्राहक आणि तमाम शासकीय यंत्रणेचा ‘केमिकल लोचा’ करणार्‍या भूखंड माफियांच्या मानेभोवती ‘मोक्का’चा फास आवळण्याचे आदेश पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी सोमवारी दिले. भूखंडांचे श्रीखंड खाणार्‍या गोल्डन गँगवर करडी नजर ठेवणार असल्याचा गर्भित इशारा आयुक्तांनी दिला.

भूखंड माफियांकडून दिवसेंदिवस फसवेगिरीचे प्रमाण वाढत आहे. दीडशे नागरिकांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रारी केल्या असून, त्यांच्या समस्या लक्षात घेऊन बनावट दस्तऐवज तयार करून भूखंड गिळंकृत करणार्‍या टोळ्यांविरुद्ध आता थेट मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. शहरात भूखंडप्रकरणी फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्यामुळे पोलिसांनी स्वतंत्र सेल स्थापन केला असून, दोन महिन्यांत 17 प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले.

थेट माझ्याशी संपर्क साधा : भूखंड अथवा मालमत्तेसंबंधी कोणावर अन्याय होत असेल तर अशांनी थेट माझ्याशी संपर्क साधवा, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.
गोल्डन गँगवर ठेवणार करडी नजर - भूखंड प्रकरणात झटपट पैसे कमावणार्‍यांमध्ये तरुणांचा मोठा सहभाग आहे. काही तरुण दादागिरी करून भूखंडाच्या बनावट व्यवहारात गुंतलेले दिसून येत आहेत. गळ्यात सोन्याची साखळी, मनगटात ब्रासलेट, सर्व बोटांमध्ये अंगठय़ा घालून शहरातील चौकाचौकांत डिजिटल बॅनर लावणार्‍यांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे.