आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली सोडून मुंडे गल्लीत दाखल!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - परळी नगर परिषद निवडणुकीत पुतणे धनंजय मुंडे यांनी बंड केल्याने काका असलेले खासदार गोपीनाथ मुंडे आता ताक फुंकून पिऊ लागले असून एरवी दिल्लीच्या राजकारणात असलेले मुंडेसाहेब सध्या मात्र परळी तालुक्यातील गावागावात फिरू लागले आहेत. जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर वीस वर्षांत प्रथमच मुंडेंनी मतदारांच्या भेटी गाठी सुरू केल्या आहेत.
परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत बहुमत असतानाही आमदार धनंजय मुंडे यांनी बंडाचा झेंडा हाती घेत काँग्रेस राष्ट्रवादीला बरोबर घेऊन भाजपचा व्हिप झुगारला आणि अपक्ष असलेले दीपक देशमुख यांना नगराध्यक्ष केले. या घडामोडीमुळे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी पुतणे धनंजय यांच्याशी माझे कोणतेही नाते शिल्लक नसल्याचे जाहीर केले. आता सामान्य कार्यकर्त्यांशी माझे नाते असून त्यांच्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यानच्या काळात खासदार मुंडेंनी भगवानगडवर भगवानबाबांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते पंडितराव मुंडे यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले होते. त्यानंतर ज्येष्ठ नेते पंडितराव मुंडे यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन मुंडेंनी आम्हाला चाळीस वर्षे नोकरासारखे राबवले असे सांगून भावनेला मोकळी वाट करून दिली. त्यानंतर खासदार मुंडेंनी दिल्लीत जाण्यापेक्षा परळी तालुक्यात दौरे सुरू केले आहेत. गेल्या वीस वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आल्या की खासदार मुंडे यांच्या फक्त सभा होत असत. सभेसाठी लागणारी तयारी पंडितराव मुंडे आणि धनंजय मुंडे करीत असत. दोघा पिता-पुत्रांकडेच नियोजन असाचे. खासदार मुंडे यांना स्वत:हून कोठे जावे लागत नसे. फार कमी कार्यकर्ते प्रत्यक्ष त्यांच्याकडे जात असत. सध्या मात्र चित्र बदलले आहे. शनिवारी व रविवारी विधानसभा मतदारसंघात येणा-या जिल्हा परिषद गटांतील प्रमुख गावांत कन्या पंकजा मुंडे-पालवे यांना बरोबर घेऊन कार्यकर्त्यांच्या घरी भेटी दिल्या.
उजनी, बर्दापूर, घाटनांदूर, धर्मापुरी, मांडवा, पोहनेर, नागापूर, कन्हेरवाडी येथील कार्यकर्त्यांनाही भेटले. भेटीदरम्यान त्यांच्याबरोबर जिल्हाध्यक्ष आर. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष जीवराव ढाकणे, रामराव आघाव, श्रीहरी मुंडे, शिवाजी गुट्टे, हिंदुलाल काकडे, शाम आपेट ही कार्यकर्त्यांची फळी होती. रविवारी परळी तालुक्यातील सिरसाळा येथे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी सायंकाळी जाऊन कार्यकर्ते व मतदारांच्या भेटी घेतल्या.
निष्ठावंतांना मोठे करू - मी आतापर्यंत तालुक्यात जे काही दिले ते फक्त दोघांनाच सामान्य कार्यकर्त्यांना काहीच देता आले नाही. तरीही कार्यकर्ते माझ्यासोबत निष्ठेने राहिले. त्यांनी गुत्तेदारांची फौज निर्माण केली आहे. मी दिलेला शब्द पाळत आलो आहे. या निवडणुकीत कार्यकर्त्यांना मोठे करून त्यांनाच संधी दिली जाणार आहे.’’ - गोपीनाथ मुंडे, खासदार
आमदार पंकजा पालवे आजपासून परळी दौ-यावर - पहिले दोन दिवस आमदार पंकजा पालवे यांनी ग्रामीण भागाचा दौरा केला होता. त्यानंतर खासदार गोपीनाथ मुंडे हेही दोन दिवस परळी तालुक्यात फिरले. कार्यकर्त्यांना भेटले. मंगळवारपासून पंकजा पालवे याही तालुक्यात फिरणार आहेत. प्रत्येक गावाला त्या भेट देणार आहेत. कार्यकर्ते, मतदारांची मते जाणून घेणार आहेत.