आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - राजकीय पक्षात रुजलेल्या घराणेशाहीत गैर ते काय, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. कालच भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर टीका केली होती.
मुंडे म्हणाले, काही घराण्याच्या तीन पिढ्या राजकारणात आहे. पक्षनिष्ठा असेल तर घराणेशाहीत गैर ते काय असे म्हणत, गडकरी कॉँग्रेसच्या घराणेशाहीवर बोलले असा अर्थही त्यांनी सांगितला. धनगर समाजाचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश शेंडगे यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे आपणास माहिती नाही, राजीनामा दिला असेल तर त्यांचे मन वळवले जाईल, असेही मुंडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे रविवारी रात्री शेंडगे आणि मुंडे मुंबईत एकत्र होते. मुंडे म्हणाले, शेंडगे नाराज असण्याचे कारण नाही. पक्षातील ते एक सक्रिय नेते आहेत. पश्चिम महाराष्ट्रात त्यांना मोठा जनाधार आहे. त्यांच्याशी बोलून मन वळवले जाईल. त्यांनी राजीनामा का दिला असावा, याचे कारणही मला माहिती नाही.
कारवाई व्हावीच
धनंजय मुंडे यांनी पक्षासोबत द्रोह केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावीच, असे मुंडे यांनी सांगितले. पक्षापेक्षा कोणी मोठे नसतो. मराठवाड्यातील 4 जिल्हा परिषदा युतीच्या ताब्यात येतील, असा दावा मुंडे यांनी केला. युतीचे जागावाटप लवकरच पूर्ण होऊन 18 जानेवारीला अधिकृत घोषणा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.