आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांती चौक उड्डाणपुलाला शिवरायांचे नाव देण्याचा प्रस्ताव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - क्रांती चौक उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव शिवसेना-भाजप युतीच्या सदस्यांनी शुक्रवारी महापौर अनिता घोडेले यांच्याकडे सादर केला आहे. महापौरांनी हा प्रस्ताव येत्या मंगळवारी होणार्‍या सभेत मान्यतेसाठी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या 30 वर्षांपासून या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा असून आता तेथेच झालेल्या या पुलाला त्यांचेच नाव देण्यात यावे. शहरातील अनेक आंदोलनांचे केंद्र म्हणून या चौकाकडे बघितले जात असल्याने त्यांचेच नाव सयुक्तिक असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. प्रस्तावाचे सूचक राजू वैद्य, नारायण कुचे, बाळासाहेब मुंडे, संजय चौधरी, विजय वाघचौरे आणि बबन नरवडे असून विकास जैन, संजय केणेकर, अनिल मकरिये, पंकज भारसाखळे, साधना सुरडकर, सुनीता सोनवणे आणि कमल नरोटे हे अनुमोदक आहेत. त्याआधी भाजपचे शहराध्यक्ष बसवराज मंगरुळे यांनीही महापौरांकडे वरील मागणीचे निवेदन दिले. सभागृहात युतीचे बहुमत असल्यामुळे हा प्रस्ताव मंजूर होणार हे स्पष्ट आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या चौकातील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यात यावी, असा अशासकीय प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात 15 लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी, असे सूचक संगीता अहिरे आणि अनुमोदक डॉ. जफर खान व शेख असद पटेल यांनी ठेवलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.