आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इतिहास गाळायचा नसतो तर जपायचा असतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - इतिहास गाळायचा नसतो, उगाळायचा नसतो, तर तो जपायचा असतो. डॉ. शशी धर्माधिकारी यांना लिहिलेल्या पुस्तकामुळे नगरची सुल्ताना चांदबिबी अजरामर झाली आहे. तिच्या कर्तृत्वाची ओळख या पुस्तकाच्या निमित्ताने जगाला होईल.. हे सांगत होते बांधकाम क्षेत्रात नवा इतिहास घडवणारे उद्योगपती डॉ. डी. एस. कुलकर्णी.

मूळचे नगरचे, पण गेली चार दशके फ्रान्समध्ये वास्तव्यास असलेल्या डॉ. धर्माधिकारी यांनी आठ वर्षे संशोधन करून लिहिलेल्या ‘सुल्ताना चांदबिबी’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी रात्री डीएसके यांच्या हस्ते झाले. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात झालेल्या या दिमाखदार कार्यक्रमाला नगरमधील साहित्यिकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. गुलाबपुष्प देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले. शब्बीर शेख यांनी तयार केलेल्या नगर जिल्ह्यातील साहित्यिकांची सूचीही यावेळी प्रकाशित करण्यात आली. ही दोन्ही पुस्तके नगरच्या दीक्षा पब्लिकेशनने प्रकाशित केली आहेत.

डॉ. धर्माधिकारी यांनी प्रयत्नपूर्वक लिहिलेल्या या पुस्तकाचे कौतुक करून डीएसके म्हणाले, हे पुस्तक इंग्रजी आणि फ्रेंचमध्येही अनुवादित करावे. यातील चित्रे अतिशय देखणी व दुर्मिळ असून त्यामुळे हे पुस्तक लाखमोलाचे झाले आहे.

हजारो वर्षे या देशाचा कारभार महिलांच्या हाती होता. अनेक स्त्रियांनी उत्तम राज्य कारभार करून दाखवला, असे सांगून डीएसके म्हणाले, चांगले राज्य करणारी चांदबिबी परत इथे निर्माण व्हायला हवी. नगर सुधारायचे असेल, तर इथली सूत्रे महिलांच्या हाती द्यायला हवीत..

संतांची भूमी असलेल्या नगर जिल्ह्यातीलच मी आहे. मी जरी पुण्यात वाढलो असलो, तरी माझ्या वडिलांचा जन्म इथला आहे. नगरमध्येच पोलिस दलात ते होते, असे डीएसके यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रवींद्र साताळकर म्हणाले, इतिहासातून प्रेरणा घेऊन वर्तमानात काम केले, तरच भविष्यात प्रगती करता येते. दुर्दैवाने इतिहासाविषयी आपल्याकडे अनास्था दिसते. चांदबिबी ही नगरची ओळख असून या पुस्तकातून तिच्या कर्तृत्वाचा परिचय रंजक व अभ्यासपूर्णरित्या करून देण्यात आला आहे.

या पुस्तकाच्या निर्मितीविषयी डॉ. धर्माधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. चांदबिबीविषयी विविध ठिकाणच्या ग्रंथालयांचा, संग्रहालयांचा धांडोळा घेऊन, विविध इतिहासकारांची मते विचारात घेऊन हे पुस्तक लिहिल्याचे त्यांनी सांगितले. या पुस्तकाच्या संपादनासाठी साहाय्य करणारे भूषण देशमुख यांनी चांदबिबीविषयी सांगितले. नगरमध्ये या शूर वीरांगनेचे स्मारक नाही. जिथे हा इतिहास घडला, तो नगरचा भुईकोट किल्ला जतन व्हायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविक दीक्षा पब्लिकेशनचे चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केले, तर आभार उदय एजन्सीजचे वाल्मिक कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. ज्ञानेश कुलकर्णी यांनी तयार केलेली नगरसंबंधीची डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली.

पुढचे पुस्तक छत्रपती शिवरायांच्या दुर्मिळ चित्रांसंबंधी
छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक अप्रकाशित चित्रे फ्रान्समध्ये आहेत. माझे पुढचे पुस्तक या दुर्मिळ चित्रांसंबंधी असेल, असे डॉ. धर्माधिकारी यांनी सांगितले. टाळ्यांचा कडकडाट करून त्यांच्या या घोषणेचे नगरकरांनी स्वागत केले. या पुस्तकाचे प्रकाशन नगरच्या दीक्षा पब्लिकेशननेच करावे आणि ते जगभरात वितरित करावे, असा मौलिक सल्ला डीएसके यांनी दिला. कार्यक्रम पुस्तक प्रकाशनाचा असला, तरी सहकार सभागृह भरले होते. याचा विशेष उल्लेख निवेदक सुधीर गाडगीळ आणि डीएसके यांनी आपल्या भाषणात केला. पुण्यातील साहित्य परिषदेच्या सभागृहात मोजक्या 58 खुच्र्या असतात, पण त्यातील बर्‍याचशा रिकाम्याच असतात, असे डीएसके यांनी सांगितले.